माझ्यातलीमी

‘नवी क्षितिजं’
पुण्याच्या एका गजबजलेल्या पेठेतला तो जुना वाडा. भिंतीवरच्या घड्याळाची टिक-टिक आणि बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज… शुभांगी आज पुन्हा बाल्कनीत चहाचा कप घेऊन एकटीच बसली होती. दहा वर्षांपूर्वी याच ऋतूने तिच्या आयुष्यातलं ‘कुंकू’ पुसलं होतं. पण आज तिच्या डोळ्यांत दुःख नव्हतं, तर एक अनामिक भीती होती.
खोलीत मयुरी तिचा लॅपटॉप बंद करून बाहेर आली. तिने पाहिलं, आईच्या चहाच्या कपसोबत दुसरी एक रिकामी खुर्ची तिला जणू चिडवत होती. मयुरीने खंबीरपणे आईचा हात धरला.
“आई, हे बघ आनंद काकांचं प्रोफाईल. त्यांनी होकार दिलाय.”
शुभांगी दचकली. “मयुरी, काय वेडेपणा आहे हा? लोक काय म्हणतील? या वयात मी नवरी म्हणून उभी राहिले, तर समाजात तोंड दाखवायला जागा उरेल का आपल्याला? सासरचे लोक, नातेवाईक… सगळे हसतील ग!”
मयुरीने आईला आरशासमोर उभं केलं. “आई, लोक तेव्हा कुठे होते जेव्हा तू रात्रभर जागून माझं आजारपण काढलं? समाज तेव्हा कुठे होता जेव्हा तू एकटीने कर्ज फेडण्यासाठी ओव्हरटाईम केलास? आज समाज फक्त तुझ्या पांढऱ्या साडीवर लक्ष देतोय, पण तुझ्या मनाच्या कोपऱ्यातल्या एकाकीपणावर नाही. ‘लोक काय म्हणतील?’ या भीतीपेक्षा ‘तू कशी जगशील?’ हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.”
मयुरीच्या या शब्दांनी समाजाची ती जुनी आणि गंजलेली चौकट एका क्षणात मोडीत काढली.
लग्नाचा दिवस उजाडला. हॉलमध्ये मोजकीच माणसं होती. नातेवाईकांच्या नजरेत प्रश्न होते, काहींच्या ओठांवर कुजबुज होती. पण शुभांगीने आज भरजरी साडी नेसली होती आणि डोळ्यांत एक नवीन चमक होती. गुरुजींनी विचारलं, “मुलीचं कन्यादान करायला वडील किंवा मामांना बोलवा.”
सगळ्यांची नजर शुभांगीच्या भावाकडे गेली, पण मयुरी उठली. तिने खंबीर आवाजात सांगितलं, “गुरुजी, आज आईचं कन्यादान मी करणार!”
संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. जुन्या विचारांच्या काकूंनी कपाळावर आठी घातली, पण मयुरी डगमगली नाही. तिने आईचा हात धरला आणि तो आनंद यांच्या हातात दिला. तिने आईला निरोप दिला नाही, तर आईला एका हक्काच्या सोबत्याकडे सुपूर्द केलं. हा केवळ विधी नव्हता, तर तो एक ‘सामाजिक बदल’ होता.
काही दिवसांनंतर, पुन्हा तीच बाल्कनी होती. पण यावेळी तिथे चहाचे दोन कप होते. आनंद आणि शुभांगी एकमेकांच्या आवडीनिवडीवर गप्पा मारत होते. मयुरी बाहेरून आली आणि तिने पाहिलं, आईच्या चेहऱ्यावर आता शून्यात पाहण्याची ती जुनी सवय राहिली नव्हती.
शुभांगीने मयुरीकडे पाहून स्मितहास्य केलं. तिला जाणवलं की, तिने फक्त लग्न केलं नव्हतं, तर तिने स्वतःच्या जगण्याचा अधिकार पुन्हा मिळवला होता.
पुन्हा एकदा…
“कोऱ्या कागदावर उमटली, पुन्हा सुखाची ओळ
लेकीनेच मांडला आज, मायेचा हा खेळ
लोक काय म्हणतील? याची भीती आता सरली
उरलेल्या आयुष्याची नवी, उमेद मनात भरली
कन्यादान लेकीचे असते, ही तर जुनीच रीत
पण आईचे घर सावरण्यात, मयुरीचीच जीत
बाल्कनीतला तो चहा, आता एकटा नसतो
सोबतीला हात अन्, संवाद गोड असतो
आयुष्य संपत नाही, फक्त वळण घेत असतं
पुढचं पान उलटण्याचं धाडस मात्र
आपल आपल्यालाच करावं लागतं.”
✍️र सि का
©️®️रसिका चवरे

error: Content is protected !!