#माझ्यातलीमी
#लघुकथालेखनटास्क(१९-०१-२०२६)
“माझा तो ‘महागडा’ सोबती”
रात्रीचे दोन वाजले होते. शांत रस्ता, सोसाट्याचा वारा आणि माझ्या मनात चाललेली घालमेल. आईची तब्येत अचानक बिघडली होती आणि घरात मी एकटाच होतो. तिला हॉस्पिटलला न्यायला हवं होतं, पण माझी जुनी दुचाकी सुरूच होत नव्हती. रिकाम्या रस्त्याकडे बघताना डोळ्यांत पाणी आलं. वाटलं, आज ही सुन्न रात्र माझ्या आईला माझ्यापासून हिरावून नेणार की काय?
तेवढ्यात लांबून एक हेडलाईटचा प्रकाश दिसला. मी हात केला. एक मुलगा थांबला, कदाचित तो डिलिव्हरी बॉय असावा. चेहऱ्यावर थकवा होता, पण त्याने माझी अवस्था पाहून क्षणात गाडी वळवली. “दादा, काळजी नका करू, आईला बसवा मागे, मी धरतो त्यांना,” तो शांतपणे म्हणाला.
हॉस्पिटलला पोहोचवेपर्यंत त्याने एक शब्दही उच्चारला नाही, पण त्याच्या गाडीचा वेग माझ्या काळजाच्या ठोक्यांशी स्पर्धा करत होता. आईला स्ट्रेचरवर टाकल्यावर मी थबकलो. घाईघाईत पाकीट काढलं, काहीतरी द्यावं या भावनेने.
तो मुलगा फक्त हसला आणि त्याने माझा हात बाजूला केला. म्हणाला, “भावा, आज तुला पैशांची नाही, सोबतीची गरज आहे. ही नोट खिशात ठेव, आई बरी झाली की सांगा.”
तो गेला, पण मला एका गोष्टीची जाणीव करून देऊन गेला— की जगात श्रीमंती बंगल्यात नसते, ती माणसाच्या काळजात असते. आज मला समजलं की…
“खूप गरज असल्यास निस्वार्थ मनाने धावून येणारी व्यक्ती करोडो पेक्षाही महाग असते.”
✍️र सि का
©️®️रसिका चवरे
PC Google Source

