#लघुकथा (५/१/२०२६)
#” काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही”. या विचाराला अनुसरून कथालेखन.

लघुकथेच शीर्षक :- ” मोड”.

विनायक ने त्याच्या आयुष्यातील दहा वर्ष एकच स्वप्न पाहिलं होतं ते म्हणजे” जिल्हाधिकारी होण्याचं !”घरची अत्यंत गरिबी, वडिलांचे कष्ट आणि गावकऱ्यांच्या अपेक्षा या सर्वांचा भार त्याच्याच खांद्यावर होता. शेवटचा प्रयत्न केला. रात्रीचा दिवस करून अभ्यास केला. त्याला खात्रीच होती की हे पद मला मिळेल त्यामुळे माझं आणि पर्यायाने गावचं आयुष्यच बदलेल.

निकाल लागला. पण यादीत विनायक चे नाव नव्हते. अवघ्या दोन गुणांनी त्याचे स्वप्न भंगले होते. पूर्णपणे खचून गेला. जे मिळवायचे होते ते,’ नाही मिळाल्यामुळे’ आता आयुष्यच संपले असे वाटू लागले. शांतपणे गावी परतला अत्यंत निराश मनाने. समोर पूर्ण अंधार. त्यातून सावरल्यानंतर जाणवले गावकरी पाण्याअभावी आणि माहिती अभावी अत्यंत हवालदिल झालेले.

विनायकाने प्रशासकीय अभ्यासातून मिळवलेले ज्ञान शेतीसाठी वापरायचे ठरवले. त्याने अल्प भांडवलात,’ जलसंधारण, आधुनिक शेती’ यांचा मेळ घालून नवनवीन प्रयोग सुरू केले. दोन अडीच वर्षातच त्याला यश येऊन गाव सुजलाम सुफलाम बनले. आज विनायक जिल्हाधिकारी झाला नसला तरी त्याचं गाव,” मॉडेल व्हिलेज” म्हणून पहायला, भेट द्यायला जिल्हाधिकारी येत.

एके दिवशी विनायकाने त्या सुविचाराकडे पाहिलं त्याला जाणवलं की आपल्याला जिल्हाधिकारी हे पद मिळाले असते तर त्याचे वैयक्तिक आयुष्य बदलले असते पण……
” नाही मिळाले” म्हणून आज हजारो शेतकऱ्यांचे आयुष्य बदलले होते. काही गोष्टी आपल्या आयुष्याचा प्रवास पूर्णपणे बदलून टाकतात कधी यश म्हणून तर कधी नवीन वाटेची संधी म्हणून. विनायक च्या आयुष्याने एक असाच “मोड “घेतला होता ज्याने त्याला शून्यातून विश्व निर्माण करायला शिकवलं.

आणि म्हणूनच म्हणावसं वाटतं, आयुष्यात काही गोष्टी मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही आयुष्य मात्र बदलून जातं!

शब्द संख्या 208.
सौ .स्मिता अनिल बोंद्रे .
©®
.

error: Content is protected !!