#माझ्यातलीमी
#वीकएंड_टास्क (२/१/२०२६)
#पुणेरी_पाट्या
#विनोदी_कथा
पुणेरी पाट्या : विनोदी कथा
पुणेरी पाट्या जगप्रसिद्ध आहेत. एखाद्याला चूक टोमण्यातून भाषेच्या योग्य उपयोग करून कसे लक्षात आणून द्यायची, याचे स्तुत्य उदाहरण म्हणजे पुणेरी पाट्या. याचा अनुभव अनिकेत आणि अनघाला लॉकडाउनच्या काळात आला.
लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी अनघा आणि अनिकेत अमेरिकेतून पुण्यात आले होते आणि नेमका लॉकडाउन सुरू झाला. आता आली का पंचायत? आज गाडीतले पण पेट्रोल संपले. थोडा वेळ लॉकडाउन उठलाय तोपर्यंत पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल भरून सामान घेऊन येण्याच्या उद्देशाने दोघे पेट्रोल पंपावर गेले. तिथून येता येता किराणा सामानाच्या दुकानात आले. समोरची पाटी बघूनच अनघाची हसून हसून पुरे वाट झाली.
“#सॅनिटायझर फूट पंपाला गाडीचा एक्सलेटरवर समजून पाय वारंवार दाबत बसू नये… एकदा दाबल्यानंतर हात साफ करण्यासाठी पुरते चार थेंब पुरेसे सॅनिटायझर येते… आपल्याला हात साफ करायचे आहेत, आंघोळ करायची नाही.
दोघेही हात सॅनिटायझ करून आत गेले. दोघांच्या तोंडावर मास्क होता. “काका, मला ओळखलं का?” असं म्हणताच दुकानदाराने त्यांना वर न बघताच पाटीकडे बघा, अशी खूण केली. अनिकेत पाटीकडे बघत वाचू लागला:
“#दुकानात आल्यावर मास्क लावून ‘मला ओळखलं का?’ वगैरे फालतू प्रश्न विचारू नये. चेहरा झाकलेला असताना डोळे पाहून ओळखायला आम्ही सीबीआय ऑफिसर नाही… किंवा तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघायला प्रियकर-प्रेयसी सुद्धा नाही.”
अनिकेत अनघाच्या डोळ्यात डोळे घालून बघून हसत हसत टाळ्या देणार इतक्यात त्याचं लक्ष दुसऱ्या पाटीवर गेलं:
“#आमच्याकडे बरोबर सहा फूट लांबीची घड्याळाची काठी मिळेल. ती जवळ ठेवल्यास बाहेर भेटणाऱ्यांशी बरोबर अंतर राखून बोलता येईल!”
दोघांनी आपल्यातील अंतर राखून दुकानदार काकांना विचारलं, “काल पण आम्ही आलो होतो, पण दुकान बंद होतं. म्हणजे लॉकडाउन उठला होता ना? म्हणून आलो होतो. साधारण एक वाजता आलो होतो.” त्यावर परत एकदा मास्क खाली घेऊन बोलण्याची तसदी न घेता एक कागद पुढे सरकवला:
“#आमच्याकडे वर्षानुवर्षे दुपारी एक ते चार दुकान लॉकडाउन करण्याची परंपरा आहे. ती आम्ही पाळणारच. या वेळेत ‘उगाच आता लॉकडाउन उठला होता, दुकान बंद का ठेवलं? इतके दिवस बंदच होतं ना?’ वगैरे विचारून अपमान करून घेऊ नये.”
आता अनिकेतला राग आला होता. तो सरळ दुकानातून बाहेर पडणार तेवढ्यात त्याला पाठीमागून सहा फुटी काठीचा स्पर्श झाला. आणि अजून एक पाटी दुकानात आहे, याची जाणीव करून देण्यात आली:
“#दुकानात आल्यावर एकदा तरी लांबूनच मास्क काढून चेहरा दाखवा व पुन्हा मास्क घाला. त्यामुळे ओळख पटण्यास मदत होईल आणि पूर्वीची उधारी आहे की नाही, याची शहानिशा ही करता येईल.”
अनिकेतने मास्क खाली केला का तर दुकानदाराला तोंड दाखवण्यासाठी दात विचकून हसून दाखवलं. त्यांनी फक्त मांडणी केली. दोघेही सामान घेताच घरी निघाले. “चला, आधी हॉटेलला जाऊ. पार्सल घेऊन घरी जाऊ.” पण हॉटेलच्या दर्शनीय भागातील पाटी बघून दोघेही एकदाच उडाले:
“#येथे ऑर्डर नुसार फक्त पार्सल मिळेल. ‘बडीशेपेचेही पार्सल द्या’ अशी मागणी करू नये. वेगळा चार्ज पडेल. (उद्या हा धुण्यासाठी पाणीही पार्सलमध्ये मागाल… अहो, घरचं पाणी वापरा.)”
दोघेही हॉटेलमधून पार्सल घेऊन बाहेर पडले. तेवढ्यात अनघा म्हणाली, “आता आलोच आहोत तर पलीकडच्या दुकानातून माझ्या मापाचे दोन-तीन ड्रेस घेऊन जाऊ. रील बनवताना – म्हणजे शूट करताना – वेगवेगळे ड्रेस घालता येतील.” दुकानाच्या पायरीवर पाटी होती:
“#खरेदीला एकट्यानेच यावे. ट्रायलसाठी परवानगी नाही. ‘ट्रायल रूम नाही आहे का?’ असं वारंवार विचारू नये. दोन हजाराची चेंज व कपड्यांचं एक्सचेंज येथे होत नाही.”
“चल, आता घरी जाऊ.” तिथे काय झालं ते काय माहिती? नेमका अनिकेत रस्ता चुकला. आता काय करायचं? समोरच एक काका मास्क लावून पायरीवर बसले होते. त्यांच्या हातात पेपर होता. “काका, जरा पत्ता सांगता का?” त्यांनी बाण असलेली काठी एका पाटीकडे दाखवली. त्यावर लिहिले होते:
“#पत्ता विचारायचे पैसे लागतील. पत्ता दहा किमी असेल तर ५० पैसे, दहा किमीच्या बाहेर असेल तर एक रुपया असेल. आणि हे असं का लिहिलं आहे, विचारण्याला एक हजार रुपये द्यावे लागतील.”
शेवटी एकदाचा पत्ता सापडला. सोसायटीच्या आवारात शिरताना अजून एक पाटी त्यांची वाट पाहत होती. ती तर फारच बोलकी होती, कारण तिला पाटीला माहितीच नव्हती की त्यांचं दोघांचं लग्न झालंय. म्हणून तर गेटवर अशी पाटी लावली होती:
“#तरुण मुला-मुलींनी सोसायटीच्या आवारात परस्परांशी बोलताना सीसीटीव्ही दिसेल असं सुरक्षित अंतर राखून थोडा वेळ मास्क काढून बोलावे. मास्कमुळे ओळख लपवून पालकांकडून बेनिफिट ऑफ डाउट घेऊ नये.”
दोघांनी मास्क काढले आणि दोन मिनिटं का होईना, श्रद्धांजली पाळण्यासारखं सीसीटीव्हीत बघत एकमेकांना “#आय लव्ह यू” म्हटलं. बस झालं! आता घराच्या दारावर एक पाटी लावून टाकतो. सध्या लॉकडाउन चालू आहे, केव्हा उठेल माहित नाही.
“बापरे अनघा, काय या पुणेरी पाट्या! चल, लवकर दुसरी कुठली पाटी लागणार? आधी ब्लॉकमध्ये जाऊया.”
#शब्दसंख्या: ६८२
#०५_०१_२०२६_सोमवार
©️®️ #सौअपर्णाजयेशकवडे
