# विकेंड टास्क (२१/१२/२५)
#विषय – लग्न म्हणजे सोशल स्टेटस शो.
वरील विषयाला धरून कथालेखन.
कथेचे शीर्षक : – ” फ्रेम” च्या पलीकडे…
” थोडं थांबा…. अजून एक शॉट, प्लीज…”
स्टेजवर उभ्या असलेल्या सुमेधा आणि सुमेध कडे फोटोग्राफरने पुन्हा हात केला. समोर शुभेच्छा देण्यासाठी पाहुणेमंडळी ताटकळत थांबलेली होती. ड्रोन वरून गिरट्या घालत होता. एलईडी स्क्रीनवर त्यांच्या नावाखाली हृदयाचे चिन्ह चमकत होते. अधून मधून त्री वेडिंग चे फोटोही झळकत होते. पण दोघांनाही अजून एकमेकांकडे निवांत पाहण्याची उसंत मिळालीच नव्हती.
सुमेधाने हळूच विचारलं,” आपण थोडा वेळ बाजूला जाऊन सगळ्यांना भेटूया का?”
सुमेध तिच्या कानाशी झुकून म्हणाला,” अगं! आधी हा व्हिडिओ पूर्ण होऊ दे! हे आपल्यासाठीच सुरू आहे ना.”
आयुष्यभरासाठी हा क्षण टिपला जाणार आहे.
सुमेधा काहीच बोलली नाही. तिला रागही आला होताच पण तिच्या मनात स्टेजच्या झगमगटा आड दडलेला एक चेहरा सतत डोकावत होता तो तिच्या बाबांचा.
लग्नाआधी आठवडाभर घरात सतत चर्चेला उधाण आलं होतं. त्यात प्रेम, सहजीवन, समज यासाठी वेळ नव्हताच फक्त खर्च, हॉल, डेकोरेशन, नृत्य आणि फोटोग्राफी यांचीच यादी होती.
” हा हॉल घेतलाच पाहिजे,”मावशी ठामपणे म्हणाली होती.
” आजकाल लग्न म्हणजे ब्रॅण्डिंग असतं”.
सुमिधाचे बाबा शांतपणे म्हणाले,” पण ते आपल्या बजेटच्या बाहेर जातंय ना!”
” लोक काय म्हणतील? ” लगेच प्रतिप्रश्न आलाच.
” मुलीचे लग्न आहे हो! काही कमी पडता कामा नको”
त्या रात्री सुमेधाला झोपच येईना. ती आईजवळ बसली आणि बोलू लागली,” आई ग! एवढा दिखावा आवश्यक आहे का ग? खरंतर दोघांमधील बॉण्डिंग महत्त्वाचं.
आई क्षणभर शांत झाली. मग म्हणाली,” करोना काळात किती साधी लग्न झाली होती. माणसं कमी, खर्च कमी, दिखावाही कमी तरीही सर्व समाधानी होते. आजकाल मात्र साधेपणाला कमी लेखलं जातंय खरं!”
सुमेधाला पहिल्यांदाच जाणवलं…. प्रश्न पैशाचा नसून प्राधान्यांचा आहे.
लग्न पार पडलं दुसऱ्या दिवशी सकाळी सुमेध फोन मध्ये गढलेला म्हणाला,” आपली रील अपेक्षा इतकी चालली नाही, खर्च तर भरपूर केला होता तरीही!”
सुमेधा म्हणाली,” काल आजीने तुला काय सांगितलं ते आठवतंय का?
” काय!”
” एकमेकांची बाजू घेता आली पाहिजे, एकमेकांना सांभाळून घेता आलं पाहिजे. लग्न दोन कुटुंबांचा भावनिक बंध आहे. लग्न दाखवण्यासाठी नसतं ते अनुभवण्यासाठी आणि एकमेकांना साथ देण्यासाठी असतं”
सुमेध क्षणभर गप्प झाला, त्याला जाणवलं काल आपण आजीच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं.
काही दिवसांनी बँकेतून फोन आला…
” कर्जाच्या पहिल्या हप्त्याची तारीख जवळ आली आहे”
सुमेधने फोन ठेवला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. टेन्शनमध्ये दिसू लागला. म्हणाला,” लग्नासाठी मोठं कर्ज काढलं आता घर खर्च, प्रवास, भविष्य… सगळच थांबलय. हे सर्व कसं निभावायचं, हा मोठा प्रश्नच!”
सुमेदाने धीर करून थेट विचारूनच टाकलं,” आपण लग्न एका दिवसासाठी केलं की आयुष्याची नव्याने सुरुवात करण्यासाठी! की सोशल मीडियाला दाखवण्यासाठी लग्न केलं?
तिचे प्रश्न सुमेधला अस्वस्थ करून गेले. तो निरूत्तर.
या घटनेला महिना उलटून गेला. सुमेधाला तिच्या नातेवाईकांचा फोन आला,” सुमेधा, तुमचं लग्न फार ग्रँड होतं ! किती खर्च आला ग?”
ती क्षणभर थांबली आणि म्हणाली,” खूपच!”
काही वेळानी फोन ठेवला. हे काय? लोक अजूनही त्यांच्याच लग्नाची चर्चा करीत होते. संसारात रुसलीस का? तुम्ही दोघे कसे आहात? अशी काही विचारणा होईना. म्हणजे माणसांपेक्षा माणसांच्या भावनांपेक्षा लिखाव्याला आणि झगमगाठीलाच महत्व लोक देताना तिला दिसले. थोडं वाईटही वाटलं.
एके दिवशी सुमेध आणि सुमेध त्यांच्या कॉमन असलेल्या मित्राच्या लग्नाला गेले. तिथे त्यांच्या लग्नापेक्षाही मोठा हॉल, अधिक झगमगाट, उत्कृष्ट लाइटिंग रात्रीच्या वेळी तर खूप सुंदर दिसत होतं.
सुमेध चटकन म्हणाला,” आपल्यापेक्षाही मोठं आहे ना?”
सुमेधा म्हणाली,” खरं आहे आणि यानंतर होणारी लग्न याहीपेक्षा मोठी, ग्रँड होतील!मग?…. ही स्पर्धा कुठे थांबते?
सुमेध खजील झाला, त्याच्याकडे आताही काही उत्तर नव्हतंच. मात्र त्याला जाणवलं खरंच ह्या “शो ” ला शेवट नसतोच. कुठे थांबायचं हे आपण परिस्थिती बघून ठरवायचं.
एके दिवशी संध्याकाळी वीज गेली. दोघेही मग बाल्कनीत चहा पिता पिता गप्पा मारू लागले. घरातल्यापेक्षा बाल्कनीत उजेड होता म्हणून सुमेधा म्हणाली,” सुमेध आपण अल्बम पाहूया का रे?
फोटो परफेक्ट होते. फोटोतलं हसणं, पोज, प्रकाश सर्व उत्तम. पण एक फोटो पाहताना सुमेध थांबला. सुमेधा वाकून आजीला नमस्कार करताना काही बोलत होती तो हा फोटो. हा फोटो इथे कसा? कॅमेऱ्यामध्ये सांगितलेलं नव्हतं. सुमेध म्हणाला.
सुमेधा म्हणाली अरे,” सर्व काही कॅमेऱ्याच्या दृष्टीने पाहू नये. माणसं जपण्यासाठी, त्यांच्या प्रेमासाठी ही वागाव असं! म्हणूनच हा फोटो आजीचा प्रेमळ आशीर्वाद लक्षात राहतो.
सुट्टीच्या दिवशी दोघे सुमेधाच्या घरी गेले तिथे गप्पांच्या ओघात तिचे बाबा म्हणाले,” आमचं लग्न अंगणामध्ये झालं. साधंच होतं साक्षात ईश्वराने केलेलं औक्षण. एकमेकांसाठी केलेली सुरेख गुंफण. नात्यात स्थैर्य होतं”सुमेधने मान डोलावली, त्याला जाणवलं लग्न एक दिवसाचं असलं तरी नाती, जबाबदारी, प्रेम आणि आपुलकी मात्र आयुष्यभराचीच!
” तुमचं लग्नही सुंदर दिसलं, आता ते सौंदर्य, जबाबदारीने निभवा म्हणजे झालं. तेच महत्त्वाचं आमच्या दृष्टीने” सुमेधाची आई बोलली.
घरी परतल्यावर सुमेध म्हणाला,” सोशल मीडियावर कमी आणि एकमेकांची जास्त बोलू या नात्याला वेळ देऊया, हो ना ग सुमेधा!
सुमेधा हसली म्हणजे आता,” आपलं खऱ्या अर्थी खरं लग्न सुरू होईल!”.
हिशोबाच्या वह्या दोघं चालत बसले. सुमेध म्हणाला ही कर्ज आपण लवकरच फेडू या.
पुढचं आयुष्य जास्त साधं, संयमाने, समाधानाने, जबाबदारीने स्थिरपणे जगूया.
सुमेधा म्हणाली सुमेध! अंथरूण पाहून हात पाय पसरावे माणसाने! मोठेपणा, खोटेपणा आणि दिखावा नको तर आयुष्यात समजूतदारपणा महत्त्वाचा असतो असं मला वाटतं. यावर मात्र दोघांचं एक मत झालं त्या क्षणी दोघांना उमगलं….
मंडप उरतो, पोस्ट हरवतात,
पण नातं रोज उभ करावं लागतं.
संदेश:-
लग्न फ्रेम मध्ये बसवण्यासाठी नसतं, ते दोन माणसांनी जबाबदारीने एकमेकांसाठी उभ राहण्याचा निर्णय असतो.
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®

अप्रतिम कथा