,# माझ्यातलीमी
# पुस्तकरिव्ह्युटास्क
पुस्तकाचे नांव : द गेम आॕफ अफेअर
लेखिका : उर्मिला देवेन
प्रेम म्हणजे एक अनमोल भावना जी दुसऱ्या व्यक्तीबद्दलची सखोल काळजी, आदर, आणि समज असते. हे एक जिव्हाळ्याचे, निस्वार्थी आणि आपुलकीने भरलेले नातं आहे, जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांशी मनापासून जोडले जातात. प्रेमाने जणू आपल्या जीवनात रंग भरले जातात आणि ते सर्व गोष्टींमध्ये सुंदरता आणते.प्रेमाने अनेक नाती जोडली जातात ;पण एक असे नाते जे लग्नबाह्य संबधाने जोडले जाते त्याला अफेअर या शब्दाने गोंजारले जाते आणि जीवनात काहूर माजवते जाते. स्री आणि पुरुष यांच्यात मैत्रीची भावना असू शकते मग नात्याला लागलेले अनपेक्षित वळण जीवनाला वेगळी कलाटणी देते. कित्येक लोक यामध्ये जळताना पाहिलेले आहेत ही आग मनात धुमसत असताना या कादंबरीचे बीज जन्मते आणि समाजातील एका जळजळीत निखा-यातील वास्तव लेखिका समाजासमोर मांडते.
द गेम आॕफ अफेअर : वास्तववादी विषयाला प्रभावी लेखनाने फोडलेली वाचा …!!
‘ द गेम आॕफ अफेअर ‘ ही कादंबरी प्रेमाचा मांडलेला डाव शेवटपर्यंत वाचकाला वाचण्यास प्रवृत्त करणारे कथानक आहे. राधव व सुधा यांचे नवरा बायकोचे सुंदर नाते ; पण याच नात्यात मोहिनीचा प्रवेश होतो आणि राघवच्या जीवनात लग्नबाह्य संबधाचे जाळे विणले जाते.राघव यात पूर्णतः गुरफटून जातो. मोहिनीची प्रत्येक अदा त्याला प्रेमात कैद करते.इकडे सुधा मात्र आपल्या पतीवर म्हणजे राघवर जीवापाड प्रेम करत असते.परंतू राघव तिच्या प्रेमाला समजू शकत नाही त्यामुळे बैचैन झालेल्या सुधाला संदिपसारखा कलाकार मित्र भेटतो त्यामुळे सुधा आयुष्यात पुन्हा उभारी घेऊ शकते.सुधाला आपल्या आयुष्यातून कायमचे हद्दपार करण्याचा कट राघव करता असतो ; पण संदिपच्या सहवासात राहून द गेम आॕफ अफेरचा मनसुबा पार उधळून लावते. राघव, सुधा,मोहिनी,संदिप या पात्रांच्याभोवती फिरणारी ही कथा वाचकांना खिळवून ठेवते. शेवटी सुधा धाडसाने गेम आॕफ अफेअरचा डाव जिंकते. संयम व संस्काराने जीवनाची लढाई जिंकता येते आणि अस्थिर व चचंल मनाने हतबल होऊन जीवन उध्वस्त होते हे राघवच्या जीवशैलीमुळे समजते अशा रहस्यमय कथानकाला लेखिकेने आपल्या कसदार लेखणीने अजरामर केले आहे.
धाडसी व वास्तववादी विषय
लग्नबाह्य संबधाचा समाजावर पगडा असल्यामुळे यावर परखड भाषेत भाष्य करणे गरजेचे आहे ; पण लेखिकेने याची दखल घेऊन समाजातील घडणाऱ्या गोष्टींचे कथानकाला मुर्त स्वरुप देऊन संसाराची कशी धुळदान होते हे राघव व मोहीनीच्या अफेअरातून दाखवून दिले आहे. समाजातील अशा विषयाला रोखठोक भाषेत सांगण्याचा लेखिकेचा प्रयत्न खूपच प्रभावी आहे.
सुधा या व्यक्तिरेखेतून संस्कार व नितीमुल्यांची जपणूक
राघव व सुधा यांचा संसार सुखात चाललेला असतो याचवेळी राघवच्या आयुष्यात मोहिनीचे आगमन होते.त्याचे प्रेमात रुपांतर होते यामध्ये राघव ओढला जातो.त्याला सुधा नकोशी वाटते तो सुधाला संपवण्याचा कट रचतो अशावेळी सुधा संयमाने व धीराने याचा सामना करते.राघववर तिचे खूप प्रेम असते.राघवचे आपल्यावरील प्रेम कमी झाल्याचे तिला जाणवते. याचवेळी तिला संदिपसारखा मित्र भेटतो त्याच्याशी ती निरागस मैत्री करते.अत्यंत संयमाने राघवचा कट उधळून लावते आणि गेम आॕफ अफेअरचा डाव जिंकते. या सगळ्या उलथापालथीमध्ये सुधाचे वागणे हे संस्कारक्षम वाटते. आपल्या समाजातील स्रीला नजरेसमोर ठेऊन सुधाची व्यक्तीरेखा साकारली आहे यातून लेखिकेचे समाजअवलोकन व स्रीचे प्रतिबिंब अधोरेखित होते.
स्री पुरुष मैत्रीचा आशावाद
मानवी जीवनात स्रीचे महत्व अफाट आहे. अनेक नाती स्रीमुळे निर्माण झाली आणि ती बहरली आहेत ;पण पुरुषाबरोबर तिची जवळीकता वाढली की समाजाचे डोळे विस्फारले जातात आणि स्रीला दोषी ठरवले जाते. या कादबरीत सुधा आणि संदीप यांची मैत्री म्हणजे स्री पुरुषातील संवादाचा सेतू आहे. लेखिकेचा हा नवा दृष्टीकोन समाजाचा बुलंद आशावाद आहे. स्री पुरुष यांच्यात निरपेक्ष मैत्री असू शकते हे लेखिकेने ठासून सांगितले आहे.
संवाद व सुरेख भाषाशैलीचा प्रभाव
द गेम आॕफ अफेअर या कादंबरीतील संवाद खूपच प्रभावी आहेत. सुधा, राघव, मोहिनी ,संदिप व नमा यांच्यातील संवाद कथानकाला जिवंतपणा देतात. संवादात वाचक हरवून जातो. ओघवत्या भाषाशैलीत कादंबरीचे रेखाटन मनाला उजाळा देते.
कथानक मांडणीत निटनेटकेपणा
लेखकाचे खरे कसब कथा मांडणीत असते हे कार्य उर्मिलाजी यांना सहज जमले आहे. कथानकाची सुरवात छान झाली आहे. कथानक कुठेही भरकलेले नाही. सुत्रबद्ध मांडणीमुळे कादंबरी वाचकांच्या पसंतीला उतरली आहे.
लाईफ इज आॕल अबाऊट द चॉईसेस
तुमची निवड तुमचं आयुष्य ठरवते हे आयुष्याचे सार सांगणार वाक्य कथानकाचे बीज आहे. तुमची निवड जर योग्य असेल तर आयुष्य सार्थकी लागते आणि आयुष्य बहरते. परंतू निवड जर चुकली तर पश्चाताप व संघर्षाला पर्याय नसतो. वारंवार याची प्रचिती या कादंबरीत येते. जीवनाचे हे सत्य लेखिकेने सहज मांडले असून समाजाला सूचक संदेशही यातून दिला आहे.
कुटुंबातील जबाबदार व्यक्तीने कौटुंबिक हित जोपासले पाहिजे
भारतीय संस्कृंती ही संस्कारक्षम आहे. अनेक नात्यांची घट्ट वीण संस्कृतीमुळे टिकून आहे. आपल्या कुटुंबात मुलांचा सहभाग मोलाचा आहे. प्रस्तुत कादंबरीत सुधा व राघव यांचा संसार सुरळीत चाललेला असतो.त्यांच्या संसारवेलीवर नमा ही गोंडस मुलगी त्यांचा जीव की प्राण असते. राघव आणि मोहिनी यांचे अफेअर चालू असते.नमा शाळेत गुंग असते. राघव आपल्या व्यस्त कामातून तिला वेळ देऊ शकत नाही. मोहिनीच्या विळख्यात सापडलेला राघव याला आपल्या कुटुंबाचा विसर पडतो. कुटुंबात लहान मुले असताना लग्नबाह्य संबधाचा त्यांच्या मनावर परिणाम होईल का ? याचे भान राघवसारख्या समाजातल्या जबाबदार व्यक्तींना नसणे हे निश्चितच चिंतनिय आहे. मुलांच्या मानसिकतेचा घरातील व्यक्तींनी जरुर विचार करायला हवा. अफेअरच्या चर्चा, संवाद यांचा मुलांच्या वागण्यावर परिणाम होतो त्याचे अनुकरणही ती लवकर करतात प्रसंगी पुढील पिढीवर याचे विपरीत परिणाम होणार याचे भान पालकांनी राखले पाहिजे तरच समाज सुधारला जाईल. लेखिकेने लग्नबाह्य संबधाचा उहापोह केलेमुळे अशा गोष्टींचा मुलांच्या मनावर होणारा परिणामांचा विचार जरुर करावा लागतो.
कथानकाला रहस्यमय वळण
द गेम आॕफ अफेअर लग्नबाह्य संबधावर आधारलेल्या कादंबरीने वाचकांना आकर्षित केले आहे. कादंबरीचे कथानक अंतर्बाह्य प्रेमातील वेगळ्या नात्याने गुंफले आहे. राघव आणि सुधा यांचा जीवनप्रवास सुखद चाललेला असतो. कंपनीचा व्याप सांभाळण्यासाठी मोहिनी त्याला मदत करते .वारंवार भेटीगाठी व संवाद यामुळे मोहिनी राघवच्या प्रेमात पडते. दोघेजण प्रेमात वेडे होतात. त्यामुळे राघवला सुधा आयुष्यात नको असते. यासाठी तो वेगवेगळ्या योजना आखतो पण यामध्ये त्याला सपशेल अपयश येते. गेम आॕफ अफेअरचा डाव त्याच्याच अंगलट येतो .हताश राघव हतबल होतो.इकडे सुधा सयंमाने सारे प्रसंग हाताळते. संदिपबरोबर तिची छान मैत्री जमते.यातून ती सावरली जाते. राघवचा अफेअरचा डाव ओळखते व जिंकतेही ..! लेखिकेने अनेक नाट्यमय प्रसंगातून कथानकाला कलाटणी दिली आहे. राघव जिंकणार की सुधा जिंकणार यामध्ये वाचक गुंतुन जातो इतकं कथानक प्रभावी आहे. रहस्य, उत्कटता , प्रेमातील अगतीकता यांचा सुरेख संगम आणि समाज अफेअरच्या विळख्यातून बाहेर पडावा असा लेखिकेचा प्रयत्न खूपच चांगला आहे.
परदेशात राहून मराठी भाषेचा गौरव
उर्मिलाजी या नोकरीनिमित्त जपानला स्थाईक असून कामाच्या प्रचंड व्यापातून त्यांनी लेखनासारखा छंद जोपासला आहे. भारतातील समाजाचे उत्तम निरिक्षण करुन समाजातील वास्तव लेखनातून मांडून मराठी भाषेला समृद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न मराठी साहित्याला उजाळा देणारा आहे. निश्चितच त्यांचे मराठी भाषेवरील प्रेम व आदर अनुकरणप्रिय आहे.
सुबक छपाई, आकर्षक मुखपृष्ठ यामुळे ‘ द गेम आॕफ अफेअर ‘ ही नचिकेत प्रकाशन केलेली कादंबरी साहित्यक्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवेल असे वाटते.वाचकांनी याचा पुरेपूर लाभ घेऊन कादंबरीला प्रतिसाद द्यावा.
©नामदेव पाटील

छान समीक्षा