माझे २०२५

inbound75005080079346218.jpg

#माझ्यातलीमी
#विकएंडटास्क(२६/१२/२५)
#गुडबाय२०२५
@everyone
#ब्लॉगलेखन
#माझे२०२५

💗 माझे २०२५ 💗

माझ्यासाठी २०२५ हे वर्ष खूप मोठ्या उपलब्धींचं वर्ष ठरलं. या वर्षाची सुरुवात अतिशय सकारात्मक आणि आनंददायी झाली. दररोज सकाळी ऑनलाइन योगवर्ग करून दिवसाची सुरुवात करणे ही एक सुंदर सवय बनली. रविवारीसुद्धा मी योगा चुकवला नाही. विशेषतः रविवारी होणारी फेस योगा आणि श्वसनाची सत्रे खूपच अप्रतिम आणि लाभदायक होती.

दर महिन्याला होणाऱ्या ५ दिवसांच्या सूर्यनमस्कार चॅलेंजमध्ये मी सलग तीन वेळा सहभागी झाले. त्याचबरोबर शुगर डिटॉक्स, लिव्हर डिटॉक्स, मुद्रा, मर्मा स्टिम्युलेशन यांसारख्या सत्रांनी माझ्या आरोग्यप्रवासाला खूप मोठा आधार दिला. अजूनही काही उत्तम सत्रांना उपस्थित राहता आलं नाही, याची थोडी हुरहूर आहे. या योगप्रवासात माझ्यासोबत २९ जणांना जोडण्याचं भाग्य मला मिळालं. त्याबरोबरच योगा टी-शर्ट भेट म्हणून मिळणं हा आनंदाचा क्षण होता. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तब्येतीच्या कारणामुळे काही सत्रे चुकली, पण सौरभ सर आणि संपूर्ण हॅबिल्ड योगा टीमचे मनापासून आभार मानते, कारण त्यांनी मला केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही चांगल्या सवयींचे महत्त्व शिकवले.

या वर्षातील दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या लेखनात झालेली मोठी वाढ. कविता, ब्लॉग, कथा अशा विविध प्रकारच्या लेखनात मी सातत्य ठेवू शकले. याचे संपूर्ण श्रेय ‘माझ्यातली मी’ या समूहाला आणि त्याच्या अ‍ॅडमिन संगीता मॅडम यांना जाते. या लेखनप्रवासात मला अनेक प्रमाणपत्रे मिळाली आणि रोज काहीतरी लिहिण्याची सवय लागली. माझा स्वतःचा ब्लॉग सुरू करण्याचं धैर्यही मला मिळालं, त्यामागेही संगीता मॅडम यांनी घेतलेल्या कंटेंट रायटिंग वर्कशॉपचा मोठा वाटा आहे.

शैक्षणिकदृष्ट्याही हे वर्ष अतिशय यशस्वी ठरलं. एम. ए . च्या परीक्षेत दोन्ही सेमिस्टरमध्ये मी कॉलेजमध्ये टॉपर आले. तसेच जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त कॉलेजमध्ये झालेल्या निबंध लेखन स्पर्धेत मला प्रथम पारितोषिक मिळालं.

माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मंचावर उभी राहून अनेक लोकांसमोर मी स्वतःची कविता सादर केली. तसेच कॅमेऱ्यासमोर येऊन ऑनलाइन कविता वाचन कार्यक्रमात सहभागी होणं हा देखील माझ्यासाठी खूप आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होता.

पुण्याला केलेला ५ दिवसांचा प्रवासही खूपच संस्मरणीय ठरला. आयुष्यात पहिल्यांदाच पुण्यातील शनिवार वाडा पाहण्याचं माझं बालपणीचं स्वप्न पूर्ण झालं. राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान पाहणं हा अनुभव विशेष भावला.

जसं आयुष्यात सकारात्मक गोष्टी असतात, तसंच काही दुःखद प्रसंगही आले. माझा एक चुलत भाऊ, आमचे कुटुंबीय डॉक्टर आणि माझी आवडती अभिनेत्री प्रिया मराठे या सर्वांनी या जगाचा निरोप घेतला, ही वेदना मनात राहून गेली.

एकूणच पाहता, २०२५ हे वर्ष समाधान, आनंद आणि अभिमान देणारं ठरलं. पुढील २०२६ हे वर्ष आणखी आनंददायी, यशस्वी आणि समृद्ध जावो, अशी मनापासून अपेक्षा आहे. योगातील सातत्य आणि लेखनातील अधिक प्रगती याकडे मी उत्साहाने पाहत आहे.

२०२५ ने मला स्वतःला चांगल्या सवयी कशा लावायच्या आणि त्यात सातत्य कसे ठेवायचे ते शिकवलं .. थँक यू २०२५ .. वेलकम २०२६

©️®️ मनिषा चंद्रिकापुरे (२७/१२/२५)

error: Content is protected !!