******* माझे गुरु… माझा शिक्षक वृंद ******
….. ना मिळे ज्ञान गुरूविणा…..
ना मिळे सन्मान ज्ञानाविणा
तरुन जाऊ भवसागर या जीवनी
करुनी वंदना या गुरु पद चरणी 🙏
लहानपणापासून आपल्याला समाजात काय चालू आहे ते समजते.’ गुरु ‘हा शिष्याला ज्ञानी करून त्यांना स्वतःच्या पायावर उभा करतो व संस्काराचे धडे देऊन सुसंस्कृत बनवितो.
माझे शिक्षण ५ ते १० पर्यंतचे जिल्हा परिषद शाळा मोर्शी येथे झाले. त्या शाळेचा इतिहास सांगायचा झाला तर ते शब्दात मांडणे शक्य नाही. तालुकास्तरावरची शाळा…… मी जे अनुभव मांडते आहे त्यावर कोणाचा विश्वासच बसणार नाही. कारण मोठ्या शहरांसोबत लहान शहरातील शाळा सुद्धा आपल्याला शिखरावर नेऊन पोहोचवते याला कोणी तयार होणारच नाही.
येथील शिक्षक वृंद व मुख्याध्यापक कडक शिस्तीचे होते. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांचा पाया मजबूत झाला. पालकांच्या तक्रारींना सुद्धा त्यांना तोंड द्यावे लागायचे. त्यामुळे त्यांना सुद्धा राग घ्यायचा व तो राग ते विद्यार्थ्यांवर काढायचे पण तो सुद्धा स्नेहापोटीच. माझ्या शिक्षणाची पाळेमुळे याच शिक्षक वृंदांमुळेच रुजली कारण त्यात शिक्षकांनीच घातलेले संस्काराचे खतपाणी. माझ्यावर( चित्रकला शिक्षक) यांनी मेहनत करून मला मिळूवून दिलेले चित्रकला स्पर्धेचे राज्यस्तरीय बक्षीस व त्यावर मुख्याध्यापकांची पाठीवर पडलेली थाप अजूनही आठवते.
मला क्रीडा क्षेत्राची खूपच आवड होती. बॅडमिंटन, कबड्डी, हॉलीबॉल,लंगडी व खोखो या सगळ्या खेळांमध्ये मी बाजी मारली ती केवळ प्रत्येक खेळाच्या कोचच्या मार्गदर्शन, मेहनत व प्रोत्साहनाने. यात याच शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करणारे ‘माझे बाबा “( प्रख्यात इंग्रजी विषयाचे शिक्षक ) हे बॅडमिंटनचे कोच म्हणून मला लाभले. त्यांचे मार्गदर्शन व मिळणारे त्यांचे प्रोत्साहन मी कधीच विसरू शकणार नाही.
आम्ही खेळलो, बागडलो, स्नेहसंमेलनात भाग घेऊन बक्षिसे मिळविली याचे सगळे श्रेय मी शिक्षक वृंदांना व मुख्याध्यापकांनाच देते. काही वेळेस शिक्षकांचा आमच्यावर रागाचा भडीमारही व्हायचा पण तोही त्यावेळेस हवाहवासा वाटायचा.
या त्यांच्या आठवणीत मी रिमझिम पडणाऱ्या पावसाप्रमाणे भिजायचे. याच शिक्षकांनी नव्या जगात आम्हाला आत्मविश्वासाने चालायला शिकविले व शिक्षणाचा पाया पक्का केला. उडान टप्पू मुलांना सुद्धा योग्य वळणावर आणून आदर्श विद्यार्थी म्हणून घडविले.
…… असा हा आमचा… माझा गुरु…. माझे शिक्षक वृंद यांना शतशत नमन 🙏
…….. अंजली आमलेकर…….. १०/७/२५
