.#माझ्यातलीमी
#विकेंडटास्क
#कथालेखन(२५/७/२५)
#मनभावनश्रावण
@everyone
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
कथेच नाव
आठवणीतील श्रावण
सहावीत असलेली रीचा शाळेतून आल्यावर तिच्या आईला शाळेत झालेल्या गोष्टी सांगत असे.
आज रीचा चक्क मराठी कविता गुणगुणत होती. आई आज आम्हाला न श्रावण मासी हर्ष माणसी कविता म्हणुन दाखवली आमच्या मराठी च्या बाईंनी.
“अग श्रावणमासी हर्ष मानसी असे आहे ते.” आईने चुकीची दुरुस्ती करत सांगितले. तेच ते ग रीचा म्हणाली.
(रिचा आईला कधी आई कधी ममा दोन्ही म्हणत असे)
“अग ममा आजपासुन श्रावण सुरू झाला असे मराठीच्या मॅडम, अहं (नकारार्थ मान हलवत) बाईंनी सांगितले.
त्यांनी सांगितले की श्रावण महिन्याला सणांचा महिना असे म्हणतात. श्रावण महिन्यात बरेच सण असतात म्हणून. ए ममा तु लहान होतीस तेव्हा तुला आवडायचा ग श्रावण महिना?” मला सांग न तुझ्या लहानपणीच्या आठवणी.”
“हो मलाही आवडतो श्रावण महिना. लहानपणीच्या आठवणी सांगेन तुला पण आधी हातपाय धुवून कपडे बदल. जेवल्यावर आणि माझे आवरून झाले की सांगेन.” आई म्हणाली.
दुपारी अभ्यासाला बसायच्या आधी रीचा ने परत आठवण केली तिच्या आईला, सांग न ग ममा.
तिची आई तिच्याबरोबर येऊन बसली आणि सांगू लागली.
“रीचा तुला माझा वाढदिवस ऑगस्ट महिन्यात आहे हे माहित आहे न?” तिने होकारार्थी मान हलवली. आई पुढे म्हणाली “ऑगस्ट मधे म्हणजेच श्रावण महिन्यातच येतो माझा वाढदिवस, म्हणुन मला लहानपणी श्रावण महिना आवडायचा. वाढदिवस असेल तर गणवेश न घालता रंगबिरंगी कपडे घालता येत असत.
तसेच श्रावण महिन्यात आमच्या घरी ठरविक वारी उकडीचे मोदक, कडवे वाल बिरडे, हिरवे मूग बिरडे, पानकी, अळुवडी वगैरे पदार्थ फक्त श्रावण महिन्यात च केले जात असत.”
“१५ ऑगस्ट ही श्रावण महिन्यात येतो का?” रिचा ने विचारले. “हो आपला स्वातंत्र्यदिन ही बरेचदा श्रावण महिन्यात येतो.
“आई अजुन सांग न. तुला का आवडत असायचा श्रावण महिना लहानपणी?”
“तुझ्या मराठी च्या बाईंनी सांगितले तसे बरेच सण श्रावण महिन्यात येतात. नविन लग्न झाल्यावर मुली माहेरी येतात तेव्हा मंगळागौर केली जाते. त्या कार्यक्रमात भाग घ्यायला निमंत्रण मिळाले की आम्ही आमच्या आई बरोबर जायचो. तसेच कुमारीका मुलींसाठी भोंडला असायचा. त्यात मधोमध पाटीवर हत्तीचे चित्र काढले जायचे. त्याची पुजा करून मग जमा झालेल्या मुली त्या भोवती फेर धरून गाणी म्हणायच्या. जिच्या घरी भोंडला असेल त्यांच्या घरी खाऊ द्यायचे भोंडला झाल्यावर. तो खाऊ काय आहे ते ओळखायचे असायचे. खूप मजा येत असे.”
“म्हणजे तुम्ही पार्टी करत होता न” रीचा म्हणाली. “हो आता तुमच्या भाषेत पार्टी च होती. पण त्या पार्टीमधे घरी बनवलेले पदार्थ असायचे. चिवडा, गोड शिरा, शंकरपाळे, भेळ वगैरे.”
“अजुन सांग न तुला का आवडतो श्रावण” रीचा चे प्रश्न चालूच होते.
“मला स्वतःला श्रावण महिना आला की हातांवर मेंदी काढायला आवडायची. आम्ही लहान होतो तेव्हा मेंदी पावडर मिळायची. ती भिजवून काडीने आम्ही मेंदी काढत असु. हातावर मेंदी काढायची ती रंगल्यावर मग परत हातावरचा रंग कधी जातो याची वाट बघायची, मग रंग गेल्यावर परत काढायची. पण थोडे मोठे झाल्यावर मेंदीचे कोन मिळायला लागले. मग काय मजाच.
“म्हणजे तु तेव्हापासून मेंदी काढतेस? म्हणुनच तु माझ्या हातावर एवढी छान मेंदी काढतेस” रीचा म्हणाली. पुढे प्रश्नांची सरबत्ती चालूच होती.
“अजुन कुठला सण आठवतो तुला श्रावणातला”
“नागपंचमी” आई म्हणाली. “आम्ही लहान असताना नागपंचमीच्या दिवशी बाजारामध्ये झाकण असलेल्या टोपलीत गारुडी नाग घेऊन यायचे. टोपली उघडली की तो नाग फणा काढून बाहेर यायचा. काही बायका वाटीत त्याच्यासाठी वाटीत दूध घेऊन यायच्या. मला खरतर भीती वाटायची. मी आईच्या पदरामागे लपून बघायची.
नाग पंचमी ला झाडे तोडायची नाहीत आणि आग पेटवायची नाही म्हणजेच त्या दिवशी गरम जेवण नाही बनवायचे असा रीवाज होता”
“म्हणजे तु जवळून बघितला आहेस साप” रीचा ने विस्मयाने विचारले.
“आई रक्षाबंधन पण श्रावण महिन्यातच असते ना? बघ मला माहीत आहे.” “हो. बरोबर ! याच महिन्यात रक्षाबंधन असते.”
“श्रावण महिन्यातच नारळी पौर्णिमाही असते. पावसाचा जोर या महिन्यात कमी झाल्यामुळे मासेमारी ची सुरवात करण्याआधी नारळ फोडून समुद्राची पुजा करतात कोळी बांधव.”
“याच महिन्यात देव श्रीकृष्ण याचा जन्मदिवस. गोकुळाष्टमी आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी.” आई पुढे म्हणाली, “तुला माहीत आहे न रीचा आपण गोकुळाष्टमी ला आजीच्या घरी जातो. हो” ममा, आजोबा एका टेबल वर आपण ‘पुरी’ वरून आणलेल्या छोट्या पाळण्यात छोट्या कृष्णाला ठेवतात. तुळशीची पाने वगैरे ठेवतात.” रिचा सांगू लागते. आई मधेच तिला थांबवून बोलते, “बरोबर, पण आमच्या लहानपणी आजोबा घरी बालकृष्णासाठी बसायचे आसन स्वतः बनवत असत. मला आवड होती म्हणुन मी त्यांच्याबरोबर तयार करत असे. आजोबा कधी पुठ्याचे कमळ बनवायचे, ते गुलाबी कागद चिटकवून त्याला सोनेरी किनार रंगवायचे, कधी घोड्यांचा रथ बनवायचे. कधी फक्त फुलांची च आरास करायचे. आई सकाळपासून उपवास करायची. त्या दिवशी रात्री १२नंतर उपवास सोडायचा असायचा. त्यामुळे जेवण बनवून ठेवायची. त्यावेळी आमच्या चाळीत राहणारे शेजारी दर्शनाला येत असत. त्यांना सुंठ धण्याचा प्रसाद, आणि बटाटा वेफर्स, रव्याचे लाडू असे ताटलीत वाढून द्यायचे काम आम्ही बहिणी करायचो. त्याकाळी इतर वेळी नऊ साडे नऊ पर्यंत झोपी जायचो. त्यामुळे मध्यरात्री आरती ची वेळ होईपर्यंत कधीकधी घरातील आम्ही मुलं पेंगत असु, हो सांगते पेंगत असु म्हणजे झोप येत असे आम्हाला. घरातील मोठी मंडळी काही शेजारी मिळून कॅरम खेळत असत, गाणी म्हणत, भजन म्हणत वेळ घालवीत. मध्यरात्री आरती होत असे. आजोबा खड्या आवाजात आणि चालीत आरती गात असत. तु ऐकले असशील रीचा, आजोबा अजुनही आरती म्हणायला एका पायावर तयार असतात.” मग आरती झाली की जेवण होत असे.
दुसऱ्या दिवशी दहीहंडी असल्याने, आजोबा देवाजवळ ठेवलेल्या सगळ्या फळांचे बारीक तुकडे करत असत आणि घरी थोडा प्रसाद ठेवून बाहेर पडत व जिथे दहीहंडी होत असेल तिथे वाटत असत.”
आता कळले का रीचा मला श्रावण महिना लहानपणी का आवडत होता?”
“हो आई, हेही समजले की असे फेस्टिवल नाही सण किती छान असतात. आता मलाही श्रावण महिना आवडायला लागला आहे.” रीचा म्हणाली.
चल आता, बराच वेळ गेलाय. लवकर अभ्यास कर बरं. काही अडले तर मला मला हाक मार असे सांगून रीचा ची आई घरात सगळ्यांना आवडणाऱ्या अळूच्या वड्यांची तयारी करायला स्वयंपाक घरात गेली.
©️®️ रश्मी बर्वे–पतंगे
PC SOURCE GOOGLE.

