# विकेंडटास्क
# एक नवी सुरवात (९/१/२०२६)
मनोगत ….
आज विनयाने लिहिलेल्या ” आत्मकथा ” या कादंबरीचे प्रकाशन होते. डॉ. शोभा भावे मुख्य पाहुण्या होत्या. हाॅल सर्व निमंत्रितांनी भरला होता. विनयाच्या आईने सविता ताईंनी सर्वांचे स्वागत केले व मान्यवरांचे आभार मानून बोलायला सुरुवात केली. मी आज माझ्या भावना माझ्या मनोगतातून व्यक्त करणार आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहेच की, विनया जन्मा पासून मुकी आहे. पण तिला लहानपणापासून वाचनाची व लिखाणाची आवड आहे. तिचा “स्वप्नील जग ” हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे व ” माझी मुशाफिरी ” हे प्रवास वर्णनाचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.
या कादंबरीत तिच्या आयुष्यातील काही कडू गोड आठवणी तर आहेतच पण नैराश्यातून फिनिक्स पक्षा प्रमाणे तिने परत आकाशात झेप घेतली आहे. या साठी माझी मैत्रीण डॉ. शोभा भावे हिची खूप मदत झाली आहे. कोणाच्याही आयुष्यात घडू नये अशी घटना तिच्या बाबतीत घडली. तिची काहीही चुक नसताना तिला एका मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले.
एके दिवशी ती बाहेर जात असताना, काही गुंडांनी तिला जबरदस्तीने गाडीत बसून दवाखान्यात नेले. त्यातील एकाच्या बायकोला गर्भाशयाची गरज होती म्हणून विनयाचे ….. पैशाच्या व ताकदीच्या जोरावर त्यांनी तिथल्या डॉक्टर्स व इतर स्टाफला हाताशी धरून हे केले. विनया शुध्दीवर आल्यावर तिला घरी आणून सोडले. आम्हाला तिची फाईल वाचल्यावर काय झाले आहे ते कळले. आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. इन्स्पेक्टर सुराणा यांनी आरोपींना पकडले. त्यांना शिक्षा ही झाली. पण माझी लेक मनाने खचली व त्याचा तिच्या शरिरावर परीणाम झाला.
तेव्हा माझी हि मैत्रीण माझ्या मदतीला धावून आली. तिने तिच्या इतर सहकार्यांची मदत घेऊन वेगवेगळे योग्य उपचार देऊन तिला पहिल्या सारखे केले. तिला हि कादंबरी लिहिण्यासाठी प्रवृत्त केले. यासाठी आमचे नातेवाईक, मित्र मैत्रीणी, ओळखीचे, हितचिंतक यांची खूप मदत झाली. तिच्या शिक्षिका साने मॅडमनी तिच्या भाषेत तिला खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितले. आमच्या भावना, आमची काळजी, तिच्यावरचे प्रेम व विश्वास हे त्यांच्या मुळे तिच्या पर्यंत पोहचले व त्या जाणीवेने तिने स्वतःचे दु:ख विसरून नवीन आयुष्याला ही कादंबरी लिहिलून सुरवात केली.
अशा वेळी आपल्या माणसांची साथ असणे गरजेचे असते. ती मला या सर्वांकडून मिळाली. मी या सर्वांची जन्मभर ऋणी आहे. माझे मिस्टर सुदेश यांच्याही भावना अशाच आहेत पण ते त्या शब्दात व्यक्त करू शकत नाही कारण, तुम्हांला माहीत आहेच बाप लेक सारखेच आहेत…. पण तिच्या साठी त्यांनी केलेली धडपड कौतुकास्पद आहे. तुमचे आशिर्वाद व शुभेच्छा तसेच तुमचे प्रेम कायम आमच्या बरोबर आहेत, याची खात्री आहेच. तुम्ही सगळे आलात आमच्या आनंदात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे आभार मानून मी माझे मनोगत संपवते…..
