#माझ्यातली मी
@everyone
#लघुकथा लेखन १५/९/२०२५
#सोबत त्यांनाच घेऊन फिरा जे तुमच्या गैरहजेरीत तुमची बाजू मांडतील.
🌹शीर्षक – मनातलं कौतुक🌹
कबीर आणि रिया एकाच ऑफिसमध्ये काम करायचे. कबीर त्याच्या कामामुळे लवकरच बॉस, अर्चना मॅडम, यांच्या जवळचा बनला. अर्चना मॅडम नेहमीच कबीरची पाठ थोपटायच्या आणि त्याचे कौतुक करायच्या. हे पाहून रियाला आनंद व्हायचा, पण तिला एक अनामिक भीतीही वाटत होती की कबीरच्या आयुष्यात तिचं महत्त्व कमी होत आहे. त्यामुळे तिने हळूहळू त्याच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
कबीरला काहीच कळेना. रिया त्याला टाळू लागली. त्याला वाटलं आपल्या यशाने तिला त्रास झाला असावा. पण रियाच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं. ती कबीरच्या कामावर लक्ष ठेवत होती आणि ऑफिसमध्ये कोणीही त्याच्याबद्दल नकारात्मक बोललं की ती त्याची बाजू घ्यायची.
एक दिवस एक मोठा प्रोजेक्ट कबीरकडे आला. त्यात काही अडचणी आल्या आणि मीटिंगमध्ये सगळ्यांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरू केला. कबीर एकटा पडला. तो अर्चना मॅडम यांच्याकडे मदतीची अपेक्षा करत होता. पण आश्चर्य म्हणजे, त्याही कबीरच्या विरोधात बोलू लागल्या. “कबीर, तुझ्यासारख्या हुशार मुलाकडून ही अपेक्षा नव्हती,” असं म्हणून त्यांनी त्याला एकटं पाडलं. कबीरला वाटलं त्याचं करिअर संपलं.
ही बातमी रियाला कळली. तिने रात्री-अपरात्री प्रोजेक्टच्या फाईल्स तपासल्या आणि दुसऱ्या टीमच्या चुकीमुळे हा घोळ झाल्याचे पुरावे गोळा केले. दुसऱ्या दिवशी मीटिंगमध्ये कबीरच्या गैरहजेरीत तिने पुरावे सादर केले आणि कबीर पूर्णपणे निर्दोष असल्याचं सिद्ध केलं. रियाचं धाडस पाहून सगळेच अचंबित झाले. मीटिंग संपल्यावर अर्चना मॅडम यांनी रियाला फोन केला. “रिया, तू हे का केलंस? तो फक्त एक कर्मचारी आहे,” त्या म्हणाल्या.
रिया शांतपणे उत्तरली, “मॅडम, आपण सोबत त्यांनाच घेऊन फिरतो जे आपल्या गैरहजेरीत आपली बाजू मांडतील. केवळ कामापुरते असलेले संबंध अडचणीच्या वेळी टिकत नाहीत.” रियाच्या या उत्तराने मॅडम अवाक झाल्या. त्या क्षणापासून रिया आणि कबीर यांच्या नात्याला एक वेगळीच दिशा मिळाली.
शब्द संख्या २५० ~अलका शिंदे

छान
खूप छान कथा
मस्त कथा.
छान कथा
खूप छान
छान कथा