भारतीय संस्कृतीच्या लयाची कहाणी
२४ जुलैची रात्र त्या वृद्ध महिलेसाठी काळरात्रच ठरली. दोन बायका आणि एक पुरुष अयोध्येत तिला एका ठिकाणी ठेऊन निघून गेल्याचा व्हीडिओ समाजमाध्यमांत पसरला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दुकानाचा मालक तिथे आला, तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्याने पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी तिची परिस्थिती पाहून तिला दवाखान्यात दाखल केलं. तिची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या वृद्धेच्या अंगी काही बोलण्याचीही ताकद नव्हती. ती कोण, कुठली, तिच्या बरोबर आलेले लोक कोण, त्यांचं तिच्याशी नातं काय, ते तिला असे सोडून का गेले यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर ती देऊ शकली नाही. संध्याकाळी बिचारीचा दुर्दैवी अंत झाला.
ही घटना उघडकीस आली श्रावणाच्या पहिल्या दिवशी. श्रावण मास माझा सगळ्यात आवडता महिना – सणांची रेलचेल असणारा महिना. लहानपणी शाळेत श्रावणी सोमवारी, शुक्रवारी शाळा अर्धा दिवसच भरायच्या. घरोघरी व्रत-वैकल्यं असायची. प्रत्येक वाराचं वेगळं महत्व, वेगळी पूजा, वेगळी गोष्ट. आमची आजी श्रावणी सोमवारचा उपवास करायची. संध्याकाळी लवकर जेवायची. मग आम्हांला व्रताची दर सोमवारी वेगळी गोष्ट सांगायची. कधी शिवामुठीची, कधी खुलभर दुधाची, कधी ब्राह्मणाची “मी येऊ? मी येऊ?” वाली. शुक्रवारी ती आणि आई जिवतीची पूजा करायच्या. आम्हां मुलांना आजी, आई पुरणाच्या दिव्यांनी ओवाळायच्या. मग आजी जिवतीची सुद्धा गोष्ट सांगायची. मंगळवारी नवीन लग्न झालेल्या मुली मंगळागौर पूजायच्या. नात्यात किंवा शेजारीपाजारी कुणाकडे तरी संध्याकाळी हळदीकुंकवाचे आमंत्रण असायचेच. रात्री वेगवेगळे खेळ खेळत मंगळागौर जागवण्यात रात्र कशी सरून जायची कळायचंही नाही. नागपंचमीला नागाची पूजा, त्यासंबंधित गोष्ट, नारळीपौर्णिमेला समुद्राची पूजा, रक्षाबंधन…. एक ना दोन…. किती सण…..किती व्रतं….
मला ही व्रतंवैकल्यं आवडतात, कारण ती आपल्याला आपल्या माणसांशी जोडतात. नात्यांतलं प्रेम वृद्धिंगत करतात. आपली संस्कृती, आपल्या परंपरा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं नात्यांचं महत्त्व पटवण्याचा प्रयत्न करतात. केवळ भौतिक सुखाच्या मागे न लागता आत्मिक समाधान मिळवण्यासाठी प्रत्येकानं झटावं यासाठीच तर या सणांची, व्रतवैकल्यांची उपाययोजना…..
या आपल्या समृद्ध परंपरेला परवाच्या घटनेनं बट्टा लागला आहे. ह्या वृद्ध महिलेनं कधीतरी तिच्या मुला-बाळांसाठी काही व्रतं केली असतील. कधी त्यांच्या काही इच्छांसाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या असतील. घरची गरिबी असेल तर स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन मुलांचं पालनपोषण केलं असेल. ज्यांच्यासाठी ती झिजली, ज्यांच्यासाठी तिनं हाडांची काडं केली, आज त्यांनीच तिला बेवारशासारखं रस्त्यावर फेकून द्यावं? तिने केलेली जिवतीची पूजा असफल झाली म्हणायची का? तिच्या बाबतीत सोमवारच्या पूजेतली प्रार्थना “…..नावडती आहे ती आवडती कर रे देवा….” कुठल्या देवाने ऐकलीच नाही का? ही एकच घटना नाही, अशा अनेक घटना हल्ली वारंवार घडत आहेत.
विषण्ण होतं मन हे सगळं बघून….. आपलेच लोक आपल्याच लोकांना फसवतात हे बघून…..आपली मूल्यं लयाला चाललेली बघून….. अशा वेळी मग उत्साहाने भारलेला मनभावन श्रावणही कोमेजून जातो….
-©️®️अनुपमा मांडके
२६/०७/२०२५
