inbound959792508112401029.jpg

#माझ्यातलीमी
#वीकेंडटास्क
#बॉक्सऑफिस

मी व्हीजे मनिषा तुम्हा सर्वांचे आपल्या बॉक्स ऑफीस शो मधे मनापासून स्वागत करते.
सुस्वागतम, सुस्वागतम …
कसे आहात सगळे .. एकदम मस्त आणि खुश ना ..
मस्त किंवा खुश नसलात तरीही आता माझी जबाबदारी .. तुम्हाला खुश करण्याची. कारण मी घेऊन आलेत तुमचा आवडता कार्यक्रम बॉक्स ऑफिस .. पण एकच मिनिट .. मी अशी गेले अशी आले .. तोपर्यंत तुम्ही हे गाणं बघून एन्जॉय करा ..

“तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी ..”

नमस्कार मित्र मैत्रिणींनो.. आज मी घेऊन आलेय या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या हिंदी आणि मराठी सिनेमाच्या माहितीसोबत आणि सूची आणि माहिती सोबत. तुम्ही सिनेमा बघण्याचा विचार करत असाल तर कुठला सिनेमा बघायला हवा यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल.
आज शनिवार ..! तर चला मग जाणून घेऊया, दर शुक्रवार प्रमाणे काल कोणकोणते चित्रपट प्रदर्शित झालेत, ते! मराठी आणि हिंदी च्या चढाओढीत मराठी नेहमीच मागे पडत आलीय आणि त्यामुळेच काल प्रदर्शित झालेल्या दहा चित्रपटांमध्ये मराठी चित्रपटांची संख्या फक्त तीन आहे. संख्या कमी असली तरीही मराठी सिनेमाची गुणवत्ता, कथानक, त्यात हाताळण्यात आलेले विषय सर्व दृष्टीने उच्चतम असतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, आणि प्रत्येकाची आवड, अनुभव, वेगवेगळा असतीच.
तर हे तीन मराठी चित्रपट कुठले याची तुम्हाला उत्सुकता असणारच ..! बट दिल थाम के रखो.. ब्रेक के बाद परत भेटुयात ..

दोन – तीन जाहिराती लागतात ..

हॅलो… वेलकम बॅक ..
आता मी तुमचा जास्त वेळ न घेता लगेच सांगते .. तर हे तीन मराठी चित्रपट आहेत .. “जगून बघावे असे”, “गोष्ट तीन पिढ्यांची” आणि “अनोखे प्रेम हे”.
या तीनही चित्रपटांना पहिल्याच दिवशी भरघोस प्रतिसाद आणि पसंती मिळालीय. तिकिटासाठी दोन दोन दिवसांपासून बुक माय शो वर लोकांची गर्दी आहे. मराठी मनाला जाणून घेणारे, मनातल्या विचारांना वाट मोकळी करणारे असे हे चित्रपट आहेत.
नावाप्रमाणेच “जगून घ्यावे असे” या चित्रपटात तीन मैत्रिणींची गोष्ट आहे आणि तिघीही शहरात, ऐशिरामत जगत असताना अण्णाभाऊ साठेंची सामाजिक कामगिरी समजल्यानंतर आपणही समाजासाठी काहीतरी चांगलं करावं या प्रेरणेने साताराजवळच्या एका खेडेगावात जाऊन तिथे समाजसेवा करतात, लोकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावतात आणि हे करत असतानाच एकीच तिथल्या मुलावर प्रेम जडते आणि मग पुढे काय होते ते जाणून घेण्यासाठी हा चित्रपट नक्की बघा. निसर्गरम्य परिसरात शूट झालेल्या या सिनेमात नयनरम्य दृश्यांची रेलचेल आहे. कुमार महेशची यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची निर्मिती केली आहे अमोल पाध्ये यांनी तर संगीतबद्ध केलंय अमित गोस्वामी यांनी. चला तर मग आता बघूया याच चित्रपटातील एक मधुर गीत ..

“नवी, नवी दुनिया .. ”

(गाणे संपते, दोन तीन जाहिराती लागतात आणि पुढे)

दोस्तहो, हरवलातं ना गाण्यात. तर हा असा वेगळा सिनेमा .. ‘जगून बघावे असे’
‘गोष्ट तीन पिढ्यांची’ हा चित्रपट राज कपूर यांच्या ‘कल आज और कल’ याची आठवण करून देते पण हा सिनेमा नव्या वळणाचा आणि नव्या विचारांचा आहे. जुन्या पिढीला नवी पिढी आजचे तंत्रज्ञान आणि जीवनपद्धती किती सुखकर आणि गरजेची आहे ते दैनंदिन जीवनातील घटनांमधून समजावून सांगते .. कसे .. ते समजून घ्यायचे असेल तर हा चित्रपट नक्की बघा. अंजली मोहिते आणि प्रकाश मोहिते यांनी हा चित्रपट निर्मित केलाय तर याचे दिग्दर्शन केले अमित रामचंद्र याने. देवेंद्र, मनीष आणि आरुष यांनी आजोबा, बाबा आणि मुलाच्या भूमिका वठवल्यात.
प्रेमाशिवाय सिनेमात मजा नाही. कुठल्याही आशयाचा सिनेमा असेल तरीही त्यात प्रेम असतंच. या सिनेमाच्या नावातच प्रेम आहे. ‘अनोखे प्रेम हे’ या चित्रपटात आपली आवडती जोडी किरण-रमेश यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. उत्कृष्ट संगीत असलेल्या या सिनेमाला संगीत दिलंय अमोल – अंकित यांनी. दिग्दर्शित केलंय सुमेध नागपाल यांनी. प्रेमाची गोष्ट आहे मित्रांनो.. तेही अनोखे प्रेम .. त्यामुळे या सिनेमाच्या कथेबद्दल मी काही नाही सांगणार .. चला, आहात ना तयार आपली तिकिटं बुक करायला.
आता आपण वळूया या आठवड्यातील नवीन हिंदी चित्रपटांकडे. पण .. थांबा थांबा .. मी घेतेय एक ब्रेक .. लगेच जाते आणि लगेच येते ..

(परत तीन, चार जाहिराती लागतात)

जाहिराती संपताच एका सिनेमाचा प्रोमो लागतो.

काय म्हणता मंडळी ..? मजा आली ना प्रोमो बघून. वाटतंय ना .. आत्ताच जावं बघायला..! तर विचार कसला करता? पटकन आपली तिकीट बुक करा आणि लगेच जा. नाही, नाही .. लगेच नाही जाता येणार. कारण तीन तीन दिवस वेटींग आहेत तिकिटं..! हरकत नाही .. आता बुक करा आणि तीन दिवसांनी बघालंच की..! नो हरी, नो वरी..! तर या आकर्षक सिनेमाच्या प्रोमो मधे बघितलच असेल हिट अँड फिट जोडीला .. आपले लाडके कलाकार असीम – अंजली ला! सुमधुर गीत आणि रोमँटिक दृश्य असणारा “लग जा गले” या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत रमेश वाधवानी आणि रोशन हंसानी यांनी निर्मित केलाय.
या चित्रपटासोबतच हिंदी मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट आहेत – ‘लाईफ लाइन’, ‘राज खुल गया’, ‘नामुमकिन’, ‘रंगीले दिन’. हे चारही चित्रपट ठीक ठाक आहेत. ‘नामुमकिन’ चित्रपट मात्र प्रेक्षकांच्या मनावर धाव नाही घेऊ शकला. बाकी तीनही चित्रपटांना प्रेक्षकांची जास्त गर्दी नसली तरही व्यवस्थित सुरू आहेत.
‘लाईफ लाइन’ मधे एका युवकाची गावाकडील भागात आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असा दवाखाना उघडायची कथा दाखवली आहे. त्यातच गोरगरीब जनतेला कमी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध करून देण्याची तळमळ आणि त्या दृष्टीने त्याने उचलले पाऊल दिसून येते. त्याच्या संघर्षाचा हा चित्रपट नक्कीच बघण्यासारखा आहे आणि खुप बोधप्रधान आहे. अमित रामोजी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सोहन सिंह डॉक्टर युवकाची महत्त्वाची भूमिका करतोय. चित्रपटातील संगीत आणि गाणी मात्र प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात कमी पडतात.
पुढील चित्रपटांबद्दल सांगण्यापूर्वी,मी ही गेले आणि ही आले .. कुठेही जावू नका .. बघत राहा आपला आवडता शो .. बॉक्स ऑफीस.

(तीन, चार जाहिराती लागतात. आणि पुढे ..)

हॅलो.. बघा आले ना मी पटकन ..! तुम्ही तर सारे फारच हुशार आहात.. माहित आहे मला. चित्रपटांच्या नावावरून तुम्हाला त्यांची कथा काय असेल याचा अंदाज लागलाच असेल. पण फक्त वरवर च ना. त्यामुळे तुमची असलेली उत्सुकता मी लगेच कमी करते.
‘राज खुल गया’ हा एक सस्पेन्स सिनेमा आहे. यामध्ये शेवटपर्यंत कुतूहल राहतं. चित्रपटाचे संगीत कुणाल अग्निहोत्री यांनी इतक्या छान पद्धतीने दिलंय की अचूक वातावरण निर्मिती होते. यात एका उद्योगपतीच्या खुनाचा शोध दाखविण्यात आलाय. त्यासाठी एका विशेष पोलिसांचे पथक नेमण्यात येते. अंकुश राव ने यात मुख्य इन्स्पेक्टर ची भूमिका केली आहे. हा शोध घेऊन तो खुन्यापर्यंत कसा पोहचतो हे बघण्याची उत्सुकता वाढली असेल ना. तर नक्की वेळात वेळ काढून किंवा या वीक एंड लाच बघा की चित्रपट!
‘रंगीले दिन’ मधे ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणीतले दिवस दाखवले आहेत. यात एका वृद्धाश्रमाची कथा आहे. असे एक वृद्धाश्रम जिथे ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या इच्छेने आलेत, मुलं परगावी अथवा परदेशी गेल्याने एकटं दुकटं राहण्यापेक्षा या वृद्धाश्रमात राहून ते आपले जीवन आनंदाने जगत आहेत आणि आपल्या तरुणपणीच्या आठवणी एकमेकांना सांगत रंगून जात आहेत. पण अगदी सरळ सोपा चित्रपट कसा असेल? यातही ट्विस्ट येतो आणि आलेल्या परिस्थितीशी ते कसे लढतात ते विस्मचकित करणारे आहे. फक्त ज्येष्ठ नागरिकांनीच नाही तर आपण प्रत्येकाने बघायला हवा. संकर्षण पिंगळे याने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचे निर्माते ललित सारंग आहेत.
‘नामुमकिन’ या चित्रपटात नेमके काय सांगायचे आहे तेच कळत नाही. सगळच एकात एक गुंफलेलं. आणि म्हणूनच हा सिनेमा पडला. तसे असले तरीही याची गाणी मात्र खूप लोकप्रिय होत आहेत. तर ऐकुया याच चित्रपटातील हे गाणे..

“झुनझुहट कहीं ..”
(गाणे संपल्यानंतर दोन जाहिराती लागतात)

झाली आता वेळ बाय म्हणायची. मी तुमची आवडती व्हीजे मनिषा तुमची रजा घेते. आजच्या चित्रपटांबद्दल तुम्हाला काय वाटतं, ते आम्हाला नक्की कळवा. पुढच्या आठवड्यात आपण परत भेटूया .. आपल्या आवडत्या कार्यक्रमात “बॉक्स ऑफिस” मध्ये.. परत नव्या सिनेमांची रेलचेल घेऊन ..
बाय… टेक केअर..

मनिषा चंद्रिकापुरे (१/८/२५)
माझ्यातली मी

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!