पुस्तक रिव्ह्यू.
पुस्तकाचे नाव :- ” इकिगाई “(Ikigai )
( आनंदी आणि दीर्घायुष्यासाठी जपानी रहस्य.)
लेखक :- फ्रान्सेस मिरालेस. आणि
हेक्टर गार्सिया.
प्रकाशन वर्ष :- २०१६ (मूळ इंग्रजी आवृत्ती)
शैली :- आत्म-विकास, जीवनशैली, तत्त्वज्ञान.
* पुस्तक परिचय :-
फ्रान्सिस मिरालेस आणि हेक्टर गार्सिया या दोन अनुभवी लेखकांनी सहकार्याने लिहिलेले,” इकिगाई”, हे पुस्तक आपल्याला जपानच्या ओकिनावा बेटावरील दीर्घायुषी लोकांच्या रहस्यमय जीवनाकडे घेऊन जाते.
” इकिगाई” या जपानी शब्दाचा अर्थ, ” तुमच्या जगण्याचे कारण” किंवा” जीवनाचा उद्देश”, असा होतो. हे पुस्तक केवळ एक संकल्पना समजावून सांगत नाही, तर ती आपल्या जीवनात कशी रुजवावी, ज्यामुळे आपण अधिक आनंदी, समाधानी आणि दीर्घायुषी होऊ शकू याचे सखोल मार्गदर्शन करते. आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जगात जिथे अनेक जण आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधत आहेत तिथे हे पुस्तक एक शांत आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी दिशादर्शक ठरते.
* पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना आणि उद्दिष्ट :-
इकिगाई संकल्पना चार मुख्य वर्तुळाच्या संगमावर आधारित आहे.
(१) तुम्ही कशावर प्रेम करता.
(२) तुम्ही कशात चांगले आहात.
(३) जगाला कशाची गरज आहे.
(४) तुम्हाला कशासाठी पैसे मिळू शकतात.
जेव्हा या चारही गोष्टी एकत्र येतात तेव्हा तुमचा, “इकिगाई”सापडतो. पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट वाचकाला त्यांच्या स्वतःचा,” इकिगाई” शोधायला मदत करणे आणि तो शोधून केवळ आर्थिक किंवा भौतिक यश नव्हे, तर मानसिक समाधान आणि दीर्घकाळ टिकणारा आनंद कसा मिळवावा हे शिकवणे आहे. लेखकांनी ओकिनावा मधील,” दीर्घायुष्याचे गाव “म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओगीमी, शंभरी पार केलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या व त्यांच्या जीवनशैलीतील सवयी, दृष्टिकोन आणि रहस्य उलगडली आहेत.
* पुस्तकाची रचना आणि लेखन शैली :-
हे पुस्तक अनेक लहान आणि सुटसुटीत प्रकरणांमध्ये विभागलेले आहे. ज्यामुळे ते वाचायला सोपे जाते. प्रत्येक प्रकरण इकागाईच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकते. पुस्तकात जपानी तत्त्वज्ञान, मोराथेरपी, योगाभ्यास, ध्यान, संतुलित आहार, शारीरिक हालचाली आणि मजबूत सामाजिक संबंधांचे महत्त्व यावर भर दिला आहे.
लेखन शैली, सोपी, थेट आणि प्रेरणादायी आहे. लेखकांनी क्लिष्ट संकल्पनांनाही सोप्या भाषेत मांडले आहे. ज्यामुळे वाचकाला सहज समजते. ओकिनावातील लोकांची वास्तविक उदाहरणे आणि कथांचा वापर केल्याने,”इकिगाई” ची संकल्पना केवळ सिद्धांतिक न राहता अधिक व्यावहारिक आणि आपल्या जीवनाशी जोडणारी वाटते. जपान मधील,”मोई” सारख्या सामुदायिक संकल्पनांचेही सुंदर वर्णन आहे. जे सामाजिक बंधनांचे महत्त्व अधोरेखित करते.
* पुस्तकाची वैशिष्ट्ये व बलस्थाने :-
(१) व्यावहारिक दृष्टिकोन:-
हे पुस्तक केवळ,”इकिगाई” काय आहे हे सांगत नाही, तर तो कसा शोधावा आणि जीवनात कसा लागू करावा यासाठी ठोस आणि कृतीशील मार्गदर्शन करते.
(२) अनुभवजन्य आणि सांस्कृतिक आधार :-.
जपानी संस्कृती विशेषतः ओकिनावा मधील दीर्घायुषी लोकांच्या जीवनातील अनुभवांवर आधारित असल्याने, त्यातील माहितीला एक प्रकारची सत्यता आणि विश्वासार्हता प्राप्त होते.
(३) सकारात्मक आशावाद :-
हे पुस्तक वाचकाला एक सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोन देते. जीवनातील अडचणी आणि तणावांवर मात करून आनंद कसा शोधायचा हेही शिकवते.
(४) सर्वांगीण विकासावर भर :-
“इकिगाई” केवळ करिअर किंवा पैशापुरता मर्यादित नाही. ते शारीरिक आरोग्य, मानसिक शांती, सामाजिक संबंध आणि आत्मिक समाधानावरही लक्ष केंद्रित करते.
(५) सोपी आणि आकर्षक भाषा :-
सोप्या भाषेत गुंतागुंतीच्या संकल्पना मांडल्याने वाचकाला आत्मसात करायला सोपे जाते.
* आजच्या काळात,”इकिगाई” चे महत्व आणि गरज.:-
आजच्या आधुनिक जगात जिथे प्रत्येक जण करिअरच्या शर्यतीत धावतो आहे जिथे मानसिक ताण आणि नैराश्य वाढते आहे तिथे,” इकिगाई” ची संकल्पना अत्यंत प्रासंगिक व आवश्यक ठरते.
(१) उद्देशाचे भान :-
अनेकदा लोक चांगले शिक्षण, नोकरी मिळवूनही रिकामे व निरर्थक वाटतात.”इकिगाई ‘ त्यांना आपल्या जगण्याचा खरा उद्देश शोधायला मदत करते. ज्यामुळे जीवनात अर्थ आणि दिशा येते.
(२) तणाव मुक्ती आणि मानसिक शांती :-
कामाचा ताण, जीवनातली अनिश्चितता आणि असंतुलन यामुळे होणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी,”इकिगाई” ची तत्वे खूप उपयोगी ठरतात. आपल्या आवडत्या कामात रमणे, त्यातून समाधान मिळवणे हे मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
(३) कार्य-जीवन संतुलन :-
हे पुस्तक आपल्याला केवळ पैसा कमावण्यासाठीच काम करण्याऐवजी कामात आनंद कसा शोधायचा, कार्य जीवन संतुलन कसे राखायचे हे शिकवते. जे आपल्याला आजच्या पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
(४) दीर्घायुष्य आणि आरोग्य :-
“इकिगाई” संकल्पना केवळ मानसिक नव्हे तर शारीरिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम करते. सातत्याने सक्रिय राहणे, नैसर्गिक आहार घेणे आणि सामाजिक दृष्ट्या जोडलेले राहणे हे दीर्घायुष्याचे रहस्य आहे ,जे पुस्तक अधोरेखित करते.
* हे पुस्तक का वाचावे?
जर तुम्ही तुमच्या जीवनात अधिक आनंद, उद्देश, समाधान आणि संतुलन शोधत असाल तर हे पुस्तक तुमच्यासाठी मौल्यवान मार्गदर्शक आहे.
* पुस्तकातून काय संदेश मिळतो?.
तर हे केवळ पुस्तक नाही ती एक जीवनशैली आहे. हे आपल्याला शिकवते की आनंदी दीर्घायुषी जीवन जगण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही तर लहान सहान गोष्टीत आनंद शोधणे, आवडीच्या कामात रमणे, इतरांशी जोडलेले राहणे हे महत्त्वाचे.
जेव्हा तुम्हाला,”इकिगाई” सापडतो, तेव्हा प्रत्येक दिवस एक नवीन आणि सुंदर उद्देश्य घेऊन येतो.”इकिगाई” चा मार्ग अवलंबून तुम्ही केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठीही अधिक योगदान देऊ शकता, चला, आपला इकिगाई शोधूया, आणि एक परिपूर्ण आयुष्य जगूया!.
एका वाचकाचा अनुभव:-
इकिगाई वाचताना असं वाटत होतं की एखाद्या शांत सुस्वर गाण्याच्या लईत आयुष्याची खरी चाल शोधतोय. प्रत्येक पानावर मी स्वतःला शोधू लागलो. माझ्या दैनंदिन कामामध्ये अर्थ आहे का?, कि मी नुसताच जगतोय?. या पुस्तकाने माझ्या विचारांमध्ये खोलवर स्पर्श केला. पुस्तक वाचताना कित्येक ठिकाणी मी थांबलो, डोळे मिटले आणि स्वतःला विचारलं…..”माझं”इकिगाई ” काय असेल?
तुम्हालाही तुमचं,”इकिगाई ” शोधायचचं? तर हे पुस्तक जरूर वाचा……
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®

Very good👍