#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क (१५.९.२५)
दिलेली ओळ… सोबत त्यांनाच घेऊन फिरा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू मांडतील.
बाजू
कौशिक आणि कोमल एकाच कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला…कॅम्पस इंटरव्ह्यूमधून दोघांचे एकाच कंपनीमधे सिलेक्शन झाले. कौशिकला कोमल खूप आवडायची. एक दिवस त्याने तिला आपल्या प्रेमाबद्दल सांगितले आणि लग्नाबद्दल विचारले. पण कोमलने साफ नकार दिला.
कोमल म्हणाली, ” कौशिक, तू माझा मित्र आहेस. माझ्या जोडीदाराच्या अपेक्षा मोठ्या आहेत. घर, गाडी, बँक बॅलन्स सगळं सेटल असलेला जोडीदार हवाय मला..आणि मुख्य म्हणजे फक्त राजाराणीचा संसार हवाय..! तुझं तर स्वतःचं घरही नाही.. आईवडील,बहीण सगळ्यांची जबाबदारी..! ते टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंब…ती काटकसर..ते फरफटणारं आयुष्य नकोय मला..!”
आणि निघून गेली…त्याच्याशी बोलणेही बंद केले तिने..
खूप दुखावला कौशिक..!
दोन महिन्यातच बातमी आली की कोमलचे त्यांच्याच कंपनीतील फायनान्स मॅनेजर अनिकेत सोबत लग्न ठरत आहे..!
आज अचानक अनिकेतने कौशिकला फोन करून केबिनमधे बोलावले.
” ये ये कौशिक..” हसत अनिकेतने त्याला बसण्यास सांगितले. थोडा अवघडूनच बसला तो..!
” कौशिक, आमच्या घरून माझ्या आणि कोमलच्या लग्नाची बोलणी चालू आहेत तुझ्या कानावर आलंच असेल..तुम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये होतात म्हणून मला तुझ्याकडून कोमलबद्दल काही माहिती ऐकायची आहे.. एवढी सुंदर मुलगी….तिचं काही….? कळतंय ना तुला मला काय म्हणायचं आहे..! मोकळेपणाने सांग.. कोमलला बिलकुल कळणार नाही..प्रॉमिस..!!”
कौशिक चपापला..म्हणाला..”होय मी कोमलला चांगलं ओळखतो. खूप चांगली, सरळमार्गी, मनमिळाऊ, गुणी मुलगी आहे ती..! मनातही आणू नका तिच्याबद्दल असं काही..!तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना सांभाळून सर्वांना आनंदात ठेवेल..!”
दाराबाहेर उभी असलेली कोमल सारं ऐकत होती..!
क्षणभर गोंधळली..मनात म्हणाली, आई सांगायची ते खरं आहे.. ‘ सोबत त्यांनाच घेऊन फिरा; जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू मांडतील ‘…
परत एकदा विचार करावा का ?
शब्दसंख्या – २३६
सौ. सुविद्या करमरकर
पुणे

सुंदर कथा
सुंदर कथा.
खूप छान कथा 👌👌
खुप छान कथा
अप्रतिम
चांगली कथा
चांगली कथा