फिरुनी नवे जन्मेन मी

inbound6168406370507405296.jpg

#माझ्यातलीमी
#विकेंडटास्क
#कथा
१८/७/२५

घटस्फोट नवीन सुरवात की शेवट

*फिरुनी नवे जन्मेन मी*

रोहिणीचा आनंद गगनात मावत
नव्हता , फर्स्ट क्लास मध्ये तिने आज MBA पूर्ण केलं होतं .रोहिणी जात्याच हुशार , परीक्षेत कायम पहिल्या तीन मध्ये यायची ..मोठ्या पगाराची छान नोकरी करायची आणि करिअर मध्ये खूप पुढे जायचं असं तिने ठरवलेलं ..तिचं शाळेचं शिक्षण गावाला झालेलं पण MBA निम्मित ती मुंबईत आली आणि आता नोकरी ही तिला ह्या स्वप्नाच्या नगरीत करायची होती .. तिला तिच्या मनासारखी नोकरी ही मुंबई ला मिळाली ..

रोहिणीचे आई वडील आता तिच्या लग्नाचं बघत होते ..रोहिणी तशी उंचपुरी ,बारीक , सावळी..रोहिणीला कायम गोऱ्या रंगाचं खूप आकर्षण आणि आपण गौर वर्णीय नाहीत म्हणून मनात एक थोडी खंतच असायची ..

रोहिणीच्या आजीची इच्छा होती की त्यांच्या जवळच्या नात्यातच असलेला प्रणित बरोबर तिचं लग्न व्हावं .. प्रणित इंजिनीयर झाला आणि चांगल्या ठिकाणी नाशिकला नोकरीला लागला ..रोहिणीच्या आजीने तर प्रणितच्या आईशी रोहिणी बद्दल बोलून तिचा होकार ही मिळवला ..नात्यातच असल्याने रोहिणी ,प्रणित एकमेकांना ओळखत होते ,कित्येक प्रसंगी एकमेकांशी बोलले ही होते .. प्रणितला ही रोहिणीच्या हुशारीच कौतुक होत त्यामुळे त्यानेही होकार दिला होता ,त्याच्याच कंपनी मध्ये तिच्या जॉब ची तो सोय ही करू शकणार होता
पण रोहिणीला प्रणित नको होता कारण प्रणित रोहिणी पेक्षा ही सावळा होता आणि त्याची नोकरी मुंबई मध्ये नव्हती ..तिने प्रणित साठी चक्क नकार दिला..

रोहिणीच्या आई वडिलांचा नाईलाज झाला त्यांनी तिचं लग्न मुंबईत राहणाऱ्या मनिष शी लावून दिलं ..रोहिणी खुश होती कारण मनिष म्हणजे जणू तिला तिच्या स्वप्नांचा राजकुमार च वाटला ,उंच आणि मुख्य म्हणजे गोरापान.. मनिषने सांगितलं होत की तो बीकॉम आहे आणि एका कंपनी मध्ये कामाला आहे ..तस बघायला गेल तर त्याच शिक्षण आणि त्याचा पगार रोहिणी पेक्षा कमीच होता पण रोहिणी त्याच्या गोऱ्या वर्णाच्या प्रेमातच पडली होती .तिनेच त्याच्याशीच लग्न करायचं अस आई वडिलांना ठाम सांगितलं ..

लग्न तर थाटात झालं पण नंतर तिला त्याचा स्वभाव कळत गेला , तो एकदम सगळ्या वाईट गोष्टींचा शौकीन होता .. मुलींना प्रेमात पाडून फ्लर्ट करण हा तर त्याचा छंदच होता .. त्याच्या कितीतरी अफेअर्स बद्दल रोहिणी ला नंतर कळलं.. रोहिणी च्या पगारावर मजा करता यावी म्हणून त्याने तिच्याशी लग्न केलं होत .. त्याचं शिक्षण ,त्याची नोकरी हे सगळच त्याने खोट सांगितलं होत .. लग्नानंतर तो सुधारेल अस आम्हांला वाटलं अस सांगून त्याच्या आई वडिलांनीही हात वर केले..रोहिणी खूप खूप दुखावली गेली ,त्याला खूप समजावून सांगितलं पण त्याला रोहिणी आवडतच नव्हती आणि त्याला त्याच्या सवयी ही बदलायच्या नव्हत्या ..

सुरवातीला तर रोहिणी ने तिच्या आई वडिलांना काहीच कळू दिलं नव्हतं पण नंतर त्यांना ही गोष्ट समजलीच .. आपल्या बुद्धिमान मुलीचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला गेला आहे हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ..

ते रोहिणीला गावाला परत घेऊन आले आणि रीतसर तिचा घटस्फोट करून घेतला ..

रोहिणी घरीच होती ,जणू नोकरी करण्याचा आत्मविश्वास ही गमावून बसली होती ..

रोहिणीच्या आजीने पुन्हा हिंमत केली आणि प्रणित च्या आईशी बोलली.. ती साहजिकच खूप भडकली ..पण प्रणित खूप समंजस मुलगा होता ,त्याने सांगितलं की त्याला रोहिणी शी बोलायचं आहे ..

जेव्हा प्रणित तिला भेटला तेव्हा तिची त्याच्या कडे बघायची हिंमत च नव्हती ..पण प्रणित ने तिला सांगितलं की रोहिणी मी पाहिल्यापासून माझं शिक्षण,माझं करियर ह्या बाबतीत खूप फोकस होतो त्यामुळे प्रेम वगैरे ह्या भानगडीत मी कधीच पडलो नाही पण तुझ्या बाबतीत मला कायम असच वाटत आलं की तू हुशार , सुसंस्कारित मुलगी आहेस ..तुझी आणि माझी बौद्धिक, वैचारीक पातळी जुळेल , मी बाह्यसौंदर्य ह्यापेक्षा मनाच्या आणि विचारांच्या सौंदर्याला जास्त महत्त्व देतो .. मला तुझ्याबाबतीत हेच वाटत की घर ,संसार , करीयर चा बॅलन्स तू सांभाळू शकशील ..माझ्या आई वडिलांचा मान सन्मान जपू शकशील .. तू जर माझ्याशी लग्नाला तयार असशील तर मी नाशिकला माझ्या कंपनी मधे नक्की जॉब लावू शकेल कारण तुझ्या सारख्या हुशार मुलीमुळे कंपनी चा नक्की फायदा च होईल .. आणि हा मी सहानुभूती म्हणून तुझ्याशी लग्न नाही करत आहे तर तुझ्या भूतकाळापेक्षा ,माझा आणि तुझा भविष्यकाळ आपण दोघे एकत्र आलो तर उज्ज्वल च होईल म्हणून मी तयार आहे ..तर आता तू निर्णय घे ..

रोहिणीने मनिषशी लग्न करताना जो विचार केला होता त्याची तिला लाज वाटली. प्रणितच्या विवेकी स्वभावाचा तिला खूप आदर वाटला.
त्याच्या विचारशील व्यक्तिमत्वाचा जणू लख्ख उजेड तिच्या आयुष्यात पडला असे तिला वाटले .. आणि त्याला अश्रूपूर्ण नयनांनी तिने होकार दिला ..

प्रणित ने तिला एकच अट घातली की आयुष्यातला तो भूतकाळ कायमचा पुसून टाक आणि ती पूर्वीची आत्मविश्वासपूर्ण रोहिणी मला माझ्या आयुष्यात हवी आहे ..

शिक्षणाबरोबरच विवेकाचे महत्त्व तिला पटले.
प्रणित च्या रूपात घटस्फोट हा तिच्या आयुष्याची सुरवात ठरली ..अंधाराकडून प्रकाशाकडे..

रोहिणीच्या डोळ्यातील अश्रू बघून प्रणितने तिला टिश्यू पेपर्स दिले ..रोहिणी प्रणित कडे बघून हळूच हसली आणि त्या टिश्यू पेपर वर तिने लिहिल , ” फिरुनी नवे जन्मेन मी ”

सौ.स्वाती शैलेश येवले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!