inbound2601934210139293971.jpg

#माझ्यातलीमी
#लघुकथा
#फसगत
#स्वप्नीलकळ्या 🥀
#विषय:—” दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं”
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
ऐश्वर्या नवऱ्याकडे सारखी कुरकुर करायची,”माझंच मेलं नशिब खोटं! तुम्हाला कसली हौसमौज नाही की कुठे जाणं येणं नाही ! ”
तिच्या नवऱ्याचा स्वत:चा बिझिनेस असल्यामुळे त्याला वेळच मिळत नसे. खरं तर ऐश्वर्याचे नशिब चांगलं होते म्हणजे ती घराची सम्राज्ञीच होती. सगळ्या बाबतीत निर्णय घेण्याचे तिला पूर्ण स्वातंत्र्य होते. तरीही ती मनांतून सतत नाराज असायची. इतर बायकांकडे बघितल्यावर त्या अतिशय सुखात व आनंदात आहे व आपण कमनशिबी आहोत असाच तिचा समज होता.
तिने वेळ जावा म्हणून भगिनी मंडळात नांव नोंदणी केली. दर आठवड्याला कांहीना काही कार्यक्रमाच्या निमित्याने सगळ्या महिला एकत्र जमत‌. बऱ्याच जणींशी तिची मैत्री झाली.
हळूहळू बायकांच्या गप्पांमधून तिच्या लक्षात यायला लागले की बायका वरवर जरी खूप आनंदात असल्याचे दिसत असले तरी प्रत्येकीचा जीवनांत काहीना काहीतरी प्राॅब्लेम असतातच‌.
सुमित्रा बरोबर तर तिची खूप चांगली मैत्री झाली.त्या दोघींचे एकमेकींच्या घरी जाणे -येणे सुरू झाले.. सुमित्रा खूप आनंदात व सुखात आहे असेच तिला वाटत होते
मात्र एक दिवस ऐश्वर्या तिच्या घरी गेली असतांना तिला सुमित्राचे डोळे खूप रडून रडून लाल झालेले दिसले . तिने काय झाले असे विचारताच ,” काही नाही ग, डोळ्यांत कचरा गेला व तो मी खूप चोळल्याने लाल झाले आहे असे खोटे बोलून सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला. पण ऐश्वर्याला ते खरे वाटले नाही?खरं खरं सांग,सुमित्रा काय घडले आहे ते! असे म्हणत ती तिच्या मागेच लागली.
त्यावर मग सुमित्राने खरं काय ते सांगायला सुरुवात केली.तिने सांगितले की ,”तिचा संसार वरवर बघता खूप सुखाचा आहे असे वाटत असले तरी प्रत्यक्षात माझ्या नवऱ्याने आईवडिलांसाठी फक्त माझ्याशी लग्न केले आहे. तो दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो .माझ्याशी एक शब्दही प्रेमाने बोलत नाही.त्याला त्या मुलीशी लग्न करायचे आहे म्हणून घटस्फोट दे म्हणून सारखा मागे लागला आहे. बरेच वेळा दारू पिऊन येतो व मारझोड ही करतो.
मी घटस्फोट दिला की मी माझ्या पायावर उभी पण राहू शकणार नाही. माहेरची परिस्थिती ही खूप काही चांगली नाही,बाकी कोणाचाही मला आधार नाही .त्यामुळे मला पुढे सगळा अंधारच दिसतो आहे. काय करावे मला अजिबात सुचत नाही बघ!आता त्या परमेश्वरालाच माहित की पुढे काय घडणार आहे. ते ! ह्या विचाराने मला रात्र रात्र झोपसुद्धा येत नाही. माझ्या नवऱ्याने व सासरच्यांनी माझी फसवणूकच केली आहे ! असे म्हणत ती जास्तच रडायला लागली.
ते बघताच ऐश्वर्याच्या लक्षात आले की दरवेळी प्रत्यक्षात ” दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं ! ”
( ३१०शब्द )
©® रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नील कळ्या)🥀
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!