#माझ्यातलीमी
#लघुकथा
कथेचे नाव
#प्रीती
मीटिंग रुम मधून अरूण त्याच्या केबिन मधे आला. खरंतर मीटिंग मधेही त्याचे लक्ष नव्हते. सारखी ती आठवत होती त्याला. आज सकाळी त्याच्या कंपनीच्या आवारात गाडी आत घेत असताना त्याला ती ओझरती दिसली होती. प्रीती च होती ती. पण इथे कशी? ती तर गेली होती न लग्न होऊन अमेरिकेला कायमची. चार वर्ष तरी झालीच असतील. काय झालं असेल? का आली असेल ती परत? असे बरेच प्रश्न त्याच्या मनात येत होते. तेवढयात इंटर कॉम वाजतो. सेक्रेटरी सांगते की एक मॅडम बराच वेळ वाट बघत आहेत तुमची. त्यांना पाठवू का? तो मनात विचार करतो प्रीतीच असेल. तो लगेच हो सांगतो.
केबिन चा दरवाजा उघडतो आणि प्रिती आत येते. हसून आत येऊ का विचारते. तो मानेने च होकार देतो.
प्रीती :- सर सॉरी मी अपॉइंटमेंट न घेता आले आहे पण तेवढंच महत्वाचे काम होते.
अरुण :- काही हरकत नाही. पण तु अमेरिके वरुन परत कधी आलीस?
प्रिती :- सर काही कारणामुळे मला अमेरिकेवरून परत यावं लागले. पण सध्या मला परत जॉब ला लागणे आहे.
मी इंटरनेट द्वारे बऱ्याच ठिकाणी अर्ज दिले आहेत. पण तुमच्या कंपनी मधे एक जागा रिकामी आहे हे कळल्यावर मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आहे. कारण काही वर्षापूर्वी आपण एकत्र काम केलं आहे. जर तुम्हास योग्य वाटेल तर मी परत इथे काम करायला तयार आहे.
अरूण:- चालेल की तु तुझा अर्ज दे बाहेर सेक्रेटरी कडे. तसेही इंटरव्ह्यू ची जरुर नाही. तुझी कामाची गुणवत्ता मला माहीत आहे. बाकीच्या जरुरी गोष्टी ती पूर्ण करेल. तसे मी सांगेन तिला. पुढच्या सोमवार पासुन रुजु हो.
प्रीती:- तुमचे खुप खुप आभार. मी निघते सर. नोकरी सुरू करण्यापूर्वी मला बरीच काम पूर्ण करायची आहेत.
अरुण ने टेबलाखालील खणामधून एक कागद बाहेर काढला. प्रीतीचा राजीनामा होता तो. काही वर्षापूर्वी दिलेला. त्याखाली दिवाळी मधे काढलेला गृप फोटो होता. प्रिती चा हा एकच फोटो त्याच्याकडे होता. तो फोटो बघुन भूतकाळातील आठवणी अरूणला आठवू लागल्या.
इंटिरिअर चा कोर्स केल्यावर, थोडा अनुभव घेऊन अरूण ने स्वतः ची कंपनी काढली होती. त्यावेळी अरूण २८ वर्षाचा होता. घरी आई आणि तो आणि त्यांच्या बंगल्यावर घरातील कामे करण्यासाठी एक तरुण जोडपे मदतनीस म्हणुन रहात. अरूण पंचवीस वर्षांचा असताना वडिलांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. वडिलोपार्जित संपत्ती असल्याने अर्थिक बाजु तशी भक्कम होती.
अरूण चा त्याच्या व्यवसायात जम बसत होता. २४ वर्षाची प्रिती त्याच्या ऑफीस मधे इंटरशिप करण्याकरिता जॉइन झाली. सुरवातीला ती एक ट्रेनी एवढीच ओळख होती. अरूण ला कामात परफेक्शन लागायचे. प्रत्येक काम करण्याची त्याची एक पद्धत होती. त्यामुळे त्याचा व्यवसाय जोमात सुरु होता. ट्रेनी असल्याने प्रीती अरूण ला सर म्हणायची. कंपनी मधे वातावरण खेळीमेळीचे असले तरी अनुभवाने सिनिअर असलेल्यांना सर बोलायचे हा अलिखित नियमच होता. बरेचदा दोघांना साईट वर एकत्र जायचे असायचे. प्रीती कायम नवनविन कामे शिकण्यात रस दाखवायची त्यामुळे अरूण ने तिला त्याच्या कंपनीत च नोकरी ची ऑफर दिली. हळूहळू अरूण कंपनी च्या बऱ्याच जवबदाऱ्या प्रीती लीलया पार पाडू लागली.
दिवाळीच्या दिवशी अरूण ने सगळ्या स्टाफ ला दरवर्षी प्रमाणे घरी बोलावले. सगळ्यांना दिवाळीचा बोनस आई च्या हस्ते देण्यात आला. दिवाळी म्हणुन प्रीती गुलाबी रंगाची काठ पदराची साडी नेसून आली होती. मराठमोळ्या साडीत अरूण च्या आई लीलावती यांना प्रिती अतिशय भावली. तिच्याशी बऱ्याच गप्पा ही झाल्या. दुसऱ्या दिवशी अरूण बरोबर न्याहारी करीत असताना लीलावती यांनी प्रीती बद्दल विषय काढला, तुझी बायको म्हणुन मला प्रीती पसंत आहे. तुझा काय विचार आहे? प्रिती बरोबर लग्न, आई मी असा काही विचार नाही केला असे म्हणाला आणि कंपनी मधे निघाला.
ऑफीस मधे जेव्हा आज प्रीती दिसली तेव्हा त्याला प्रीती वेगळीच भासली. आज कॅजुअल डे असल्याने तिने निळ्या रंगाची जीन्स आणि पांढऱ्या रंगाचे टॉप घातलेला. प्रीतीला तो पोशाख खुलुन दिसत होता. सुंदर! मनातच तो म्हणाला, अरे काय झालय मला, ती तर रोजच ऑफीस मधे येत असते. आज माझ्या भावना बदलल्या आहेत का तिच्याबद्दल? ही आई न! उगाच माझ्या डोक्यात काहितरी टाकलंय तिने. अस म्हणून त्याने तीच्याबद्दलचे विचार झटकले आणि कामाला लागला. पण आज जेव्हा जेव्हा ती त्याच्या समोर येत होती. तेव्हा तो नजर चोरायला लागला. ती बरोबर असताना, तीच लक्ष नसताना तिच्याकडे बघतांना त्याला जाणवले की खरोखर काय हरकत आहे प्रीती शी लग्न करायला. आपल्याला साजेशी आहे वयाचे अंतर ही फार नाही. पुढचे काही दिवस असेच गेले आणि त्याला वाटायला लागले की प्रीती आपल्याला आवडायला लागली आहे. इथे आई मागे लागलीच होती की तु तिला विचारणार की मीच तीच्या घरी जाऊन लग्नाची मागणी घालू? आई जरा थांब ग. प्रथम तिला माझ्या बद्दल काय भावना आहेत ते बघतो आधी मग पूढे बघु असे सांगुन आईला गप्प बसवले.
अरूण ने ती कूठे राहते? तिच्या घरी कोण आहे? याबद्दल तीच्या मैत्रिणीकडून माहिती काढून घेतली. तेव्हा त्याला कळले की ती तीच्या बाबांबरोबर राहते. आहे आणि ते दोघेच आहेत.
आज तो प्रीती ला कंपनीच्या कामानिमित्ताने दुपारी बाहेर घेऊन जाऊन मग विचारणार होता. आज तो अगदी उत्साहात होता. अगदी शीळ मारतच तयारी करत होता. कधी कंपनी मधे पोचतो असे झाले होते त्याला.
आज कंपनी ची कामे तो लवकर आटपणार होता. त्याने घड्याळाकडे पाहीले. एकेक कर्मचारी यायला सुरुवात झाली होती. पण प्रीती काही आली नाही. ऑफीस ची वेळ सुरु झाली, तो त्याच्या मीटिंग आणि फोन कॉल्स मधे गुंतला. केबिन मधून बाहेर येऊन त्याने आपल्या कर्मचाऱ्यांवर नजर टाकली प्रीती दिसली नाही. आज बाहेरचे काही काम असेल म्हणुन नसेल आली अशी त्याने स्वतः ची समजूत घातली. तरी त्याने प्रीती ची मैत्रिण चारू ला विचारलेच. तिने सकाळी अचानक सुट्टी घेतल्याचे तिने सांगितले.
दुसऱ्या दिवशी प्रीती आली ती एकदम आनंदातच. तिच्या मैत्रिणींशी हळू आवाजात गप्पा मारत होती. प्रिती ला अरूण ने केबिन मधे बोलावले. काही कामाबद्दल चर्चा करून काल का आली नव्हतीस असे मोघम विचारले. तेव्हा प्रीती ने जे सांगितले त्याला थोडा धक्का बसला. तो सावरत अच्छा, ओ के एवढच म्हणाला. प्रिती केबिन मधून बाहेर पडली तेव्हा अरूण च्या चेहेऱ्यावरचा रंगच उडाला होता. पण प्रीती एवढी आनंदात होती की त्याने अभिनंदन नाही केले हे ही तिच्या लक्षात आले नाही.
प्रिती ने त्याला तिचा काल साखरपूडा झाल्याचे सांगितले. जरा घाईत झाला असे म्हणाली. तिचा बालपणी चा मित्र प्रणव याच्याबरोबर. त्याला दोन आठवड्यात अमेरिकेला जायचं आहे म्हणुन लग्न ही पुढच्या आठवड्यात ठरलंय म्हणाली. तुम्ही नक्की या सर लग्नाला असे आमंत्रण ही दिले.
दोन दिवसांनी तिने नोकरीचा राजीनामा दिला. नोकरीचा एक चांगला अनुभव मिळाल्याबद्दल, आणि खुप काही शिकायला मिळाल्या बद्दल तिने अरूण चे आभार मानले. तो राजीनामा त्याने तसाच त्याच्या एका महत्वाच्या कप्प्यात ठेवून दिला. पुढच्या च आठवड्यात प्रीती च लग्न झालं. तिचा व्हिसा वगैरे झाल्यावर थोड्याच महिन्यात ती अमेरिकेला गेली. जातांना ती भेटायला आली होती सगळ्यांना. अरूण ने तिला एक सुंदर नक्षीकाम केलेला बॉक्स भेट म्हणुन दिला होता.
ती गेल्यावर अरूण ने फक्त आपल्या कंपनी कडे लक्ष दिले. कितीतरी दिवस तो उदास होता. अरूण ची आई लीलावती यांनी अरुणला लग्न करण्यासाठी खुप समजावले पण अरूण काही तयार होत नव्हता.
कधी कधी तो विचार करी की आपण प्रीती ला आधी विचारायला हवे होते का? पण आपल्याला जाणीवच नव्हती की ती आपल्या पासून लांब जाणार आहे. आधी माहीतच नव्हते की तिचे लग्न ठरेल. ती गेली तरी आपल्याला तिची आठवण येतेय यालाच प्रेम म्हणतात का? तिच चालणे बोलणे वागणे त्याला आता आठवत होते. प्रीती ला विसरणे शक्य च नव्हते.
पण आता प्रीती परत आली होती. ती वरुन जरी सामान्य वाटत असली तरी काहितरी बिनसले आहे हे जाणवत होते. इथे जॉब करणार आहे म्हणजे ती अमेरिका सोडून आली आहे हे नक्कीच. ती नोकरीला रुजु झाली की मग आपण तिच्याशी यावर शांतपणे बोलू असे त्याने ठरवले.
दोन दिवसांनी प्रीती नोकरी वर रुजु झाली. तीची मैत्रिण चारू आता दुसऱ्या शहरात लग्न होऊन गेली होती. काही जण होते जे प्रीती ला ओळखत होते, त्यामुळे प्रीती ला कंपनी मधे रुळायला जास्त मेहनत घ्यावी लागली नाही.
एकदा मीटिंग च्या काही वेळ आधी ती अरूण च्या केबिन मधे आली. सर तुमचे धन्यवाद तुम्ही परत या कंपनी मधे मला नोकरी दिली. अरूण मनात म्हणत होता, मी तुला माझ्या हृदयात जागा दिली आहे. तुझ्या शिवाय दुसर कोणी तिथे नाही. एक क्षणापूरते तो विसरला होता की तिचे लग्न झाले आहे.
अरूण:- प्रिती तु माझ्या बेस्ट कर्माचाऱ्यांपैकी एक होतीस, त्यामुळे तु परत आलीस हे कंपनी साठी चांगलेच आहे.
तुला घरी यायला जमेल का? माझ्या आईने बोलावले आहे तुला घरी.
प्रिती:- हो मी काम संपल्यावर काकूंना नक्की भेटिन.
प्रिती, अरूण च्या घरी गेली, तेव्हा लीलावती यांनी तिचे मनापासून स्वागत केले. तिची विचारपूस केली.
लीलावती:- एक प्रश्न पडलाय विचारू की नाही संभ्रमात आहे मी.
प्रिती:- काकू काही हरकत नाही. आपली ओळख जुनी आहे. तुम्ही माझ्या वडीलधाऱ्या आहात, हितचिंतक आहात हे मी जाणुन आहे.
लीलावती:- तु अमेरिका सोडून अचानक परत का आलीस. काही कारण?
प्रिती:- काही गोष्टी घडायच्या असतात त्या घडतात. तसच मी अमेरिकेला लग्न होऊन गेली. तिथे माझा संसार सुरळीत चालु होता. अचानक प्रणव ची नोकरी गेली. दुसरी नोकरी मिळेपर्यंत त्याने एका मोटेल मधे काम करायचे ठरवले. एकदा काही चोरांनी होटेल चा गल्ला चोरायचा प्रयत्न केला. प्रणव ने प्रथम प्रतिकार केला नंतर त्यांनी बंदुक दाखवली. अचानक गोळीबार चालू झाला आणि त्यात प्रणव च्या छातीत गोळी लागली. तो तत्क्षणी मला सोडून गेला.
प्रिती रडु लागली. लीलावती यांनी तिला जवळ घेतले. पाण्याचा ग्लास पुढे केला. ती थोड पाणी पिऊन शांत झाली. डोळे पुसले.
मागच्या वर्षी इथे आले कोणाला भेटले नाही. हिंमतच नव्हती. आता मी सावरले आहे. पुन्हा ऊभी राहतेय.
लीलावती:- प्रीती लहान वयात खुप दुःख सोसलेस ग. आता मागचा विचार करू नकोस. मनात एका ठिकाणी जुन्या आठवणी ठेवायच्या. नविन आठवणींना जागा करायची. फार मनात होते तुला माझी सून बनवून घ्यायची. पण ते काही शक्य झाले नाही तेव्हा.
पण आता विचारतेय तुला होशिल का माझी सून?
प्रिती एकदम बावरली.
प्रिती :- काय काकू! तुमची सून! सरांची बायको! कस शक्य आहे?
लीलावती :- का नाही शक्य?
प्रिती:- मी कधी असा विचारही केला नाही. सरांना काय वाटेल.
लीलावती:- त्याला तर मी तुझ्या लग्नाच्या आधीच विचारले होते. त्याने नकार न देता हा विषय टाळला होता. पण तु लग्न करून गेल्यावर मी किती मागे लागले तरी त्याने लग्न केलेले नाही.
हे बघ घाई नाही आणि दडपण पण आणु नकोस तुझ्यावर. पण त्या दृष्टीने विचार कर.
प्रिती, लीलावती यांचा निरोप घेऊन घरी गेली.
काकू बोलतात ते शक्य आहे का? काकू किती चांगल्या आहेत? आणि सर? त्यांचा स्वभाव तर मला पहिल्या पासून आवडतो. पण आमचं लग्न?
राहून राहून तिला आज अरूण सरांचा विचार येत होता. त्यांना प्रथम भेटली तो दिवस ही आठवत होता तिला. ट्रेनी म्हणुन निवड झाल्यावर ती प्रथमच अरूण सरांना भेटली होती. तेव्हा त्याचं बोलणे, त्यांचे काम पाहून ती इंप्रेस झाली होती. तिला त्यांच्या सारखेच बनायचे होते. परफेक्ट. पण आपल्या आयुष्यात प्रणव असल्याने आपण फक्त ऑफीस कामाकडे लक्ष देत होतो.
विचारांच्या तंद्रीत ती झोपून गेली.
प्रिती! प्रिती! आवाजाने अर्धवट जागी झाली ती. अरूण शी लग्न कर. मला तुला आनंदी राहिलेलं पहायच आहे. लग्न कर! लग्न कर! प्रणव चा आवाज होता तो.
प्रिती! प्रिती!
ती खडबडून जागी झाली. पहाटे पडलेलं स्वप्न होत ते.
अरूण ला त्याच्या आई कडून प्रीती च्या नवऱ्याविषयी कळते. काही दिवसांनी अरूण प्रीती ला लग्नासाठी विचारतो आणि ती होकार देते.
समाप्त.
©️®️रश्मी बर्वे-पतंगे
३०मार्च२४
