# माझ्यातली मी #
…… ब्लॉग लेखन टास्क….. (५/१/२६)
……… प्रयत्नांती……. ( लघुकथा )
संजय हा गरीब कुटुंबातला मुलगा. जात्याच हुशार. त्याचे स्वप्न होते खूप शिकायचे व आई-वडिलांना सुखाच्या पायरीवर घेऊन जायचे. पैसा नाही. शिक्षण तर करायचेच. कसे तरी त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. पदवी पर्यंतचे शिक्षण स्वबळावर करायचे ठरविले. त्यासाठी त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागणार होते. प्रवेश मिळविण्यासाठी त्याने सकाळी सात वाजता जाऊन पेपर वाटणे,दिवसभर लोकांच्या गाड्या धुणेपुसणे आणि पाणीपुरीच्या गाडीवर प्लेट्स धुणे असे करून प्रवेशापुरते पैसे मिळविले. बीएससीत प्रवेश मिळाला पण त्याने काम करणे सोडले नाही. कॉलेज करून मिळेल ती कामे तो करायचा. त्याला बीएससी ही पदवी मिळाली.
त्याची खूप इच्छा होती की पदवीनंतरचे शिक्षण आपले परदेशात व्हावे पण पैसा नाही. लॉंग डिस्टन्स लर्निंगचा मार्ग स्वीकारावा तरी कसा हा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला. एम एस ही पदवी तर त्याला घ्यायचीच होती. त्याचे ते स्वप्न पूर्ण होणार की नाही या विचाराने त्याला घेरले. फक्त पैसा असला की सगळं काही होतं. अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या संजयला सारखे वाटायचे की त्याच्याजवळ पैसा नाही. शिक्षणासाठी काही सवलत मिळेल का याचा शोध घेतला.
एक दिवस असाच बाहेर गेला असतांना सिग्नल वर रस्ता क्रॉस करतांना करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज आला. त्याने ताबडतोब मागे वळून बघितले. एक चार चाकी गाडी येत होती व तिचे एक चाक घरंगळत चालले होते. त्याने बीएससी झाल्यानंतरच्या मधल्या काळात गाड्या दुरुस्त करण्याचे शिक्षण घेतले. ताबडतोब त्याने गाडीतल्या मालकाला सांगितले साहेब, मी तुमची गाडी दुरुस्त करून देतो आणि त्याने पूर्णतः ती दुरुस्त करून दिली. साहेब, आता तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता.
बेटा, तुझी मेहनत तर घे ना.
साहेब, मला मेहनत नको. अडलेल्याला मदत करणे हेच माझ्या तत्वात आहे. मला तुमची मदत करता आली हेच मी माझं भाग्य समजतो.
बेटा,
तू काय करतोस?
मी बीएससी झालो आहे. स्वबळावर मी ही पदवी घेतली पण माझी इच्छा परदेशी जाऊन एम एस पदवी मिळवावी अशी आहे. पण आम्हा गरिबांचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही.
बेटा,
मी तुझे शिक्षण पूर्ण करणार. तुला मी माझा मुलगा समजून शिक्षणासाठी परदेशी पाठवणार.
साहेब,
अहं आज पासून तू मला बाबा म्हण. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. गदुगदून येऊन त्याने बाबा अशी हाक मारली.
बाबा,
तुम्ही देवासारखे धावून आलात. माझी इच्छा पूर्ण होणार या आनंदात त्याने त्यांना मिठी मारली व त्यांच्या सहकार्याने परदेशात जाऊन एम एस ही पदवी मिळविली.
म्हणूनच म्हणतात, काही गोष्टी आयुष्य बदलवून टाकतात
मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही.
…… शब्द संख्या ३५०……
……… अंजली आमलेकर…….
