पुस्तक रिव्ह्यू टास्क

#माझ्यातलीमी
#बुकरिव्ह्यूटास्क
#स्पर्धा

पुस्तकाचे नाव – कोप (एक उध्वस्त गोष्ट)
लेखक – नितीन थोरात

नुकतीच श्री. नितीन थोरात यांची कोप कादंबरी वाचनात आली. प्रस्तावनेत कादंबरी २००५ साली मांढरदेवी येथे घडलेल्या दुर्घटनेवर आधारित असल्याचे लक्षात येते.

कथानक श्रीकांत, त्याची पत्नी ज्योती आणि त्याच्या कुटुंबीयांभोवती फिरते. त्यांचे संपूर्ण कुटुंब काळूबाईचे निस्सिम भक्त, दरवर्षी न चुकता पौष पौर्णिमेला मांढरदेवीच्या यात्रेला जाणारं म्हणजे जाणारच. श्रीकांतच्या अंगात काळूबाईचे वारं येतं. त्याचा त्याच्या मुलीवर फार जीव. तिच्यात त्याला काळूबाई दिसते.

२००५ साली गडावर झालेल्या चेंगराचेंगरीत श्रीकांतचे आईवडील आणि मुलगी मृत्युमुखी पडतात. श्रीकांत आणि ज्योतीचे आयुष्य उध्वस्त होते. श्रीकांतचे मानसिक संतुलन बिघडते, त्याची नोकरी जाते. ज्योती काळूबाईला शिव्याशाप देऊन, वास्तव स्वीकारून आयुष्य पुढे न्यायचा प्रयत्न करते परंतु पोटची पोर गमावल्यानंतर,आईबाबांचा चेंगराचेंगरीत तडफडून झालेला मृत्यू पाहिल्यानंतरही श्रीकांतची देवीवरील श्रद्धा तसूभरही कमी होत नाही. श्रीकांतचे वर्तमान आपल्याला त्याच्या भूतकाळात घेऊन जाते तसतशी एकाकी पडलेल्या श्रीकांतची कहाणी उलगडत जाते.

सदर घटनेनंतर त्याच्या वागण्यात झालेला बदल, त्याची होणारी घुसमट लेखकाने संवेदनशीलपणे मांडली आहे. अनेक प्रसंग निशब्द करतात, डोळ्यात पाणी आणतात. अठरा वर्षापूर्वी घडलेले वास्तव डोळ्यासमोर जसेच्या तसे उभी राहते, मन सुन्न करते.

खरंच देवीचा कोप झाला की मनुष्य श्रद्धा, अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडला? शासनाने, भाविकांनी थोडी सतर्कता दाखवली असती, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील पुसटशी रेषा ओळखता आली असती तर कदाचित सदर घटना घडली नसती असे अनेक अनुत्तरित प्रश्न सत्यघटनेवर आधारित सामाजिक आशय असलेली कोप कादंबरी वाचून पूर्ण झाल्यानंतरही मनात घर करून राहतात.

©मृणाल महेश शिंपी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!