पाहिले तुला न मी तू मला न पाहिले

1000312225.jpg

#माझ्यातली मी
#वीकेंडटास्क(17/1/2026)
#वाक्यावरून कथा
​ “पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले!”

​आज किचनमध्ये भांड्यांचा आवाज जरा जास्तच येत होता. कारणही तसंच होतं…

“भाजीत मीठ जास्त झालंय!”
​हे तर केवळ एक निमित्त होतं. पण त्यामागे दिवसभराचा साचलेला थकवा आणि उतारवयात एकमेकांबद्दल वाढलेली चिडचिड स्पष्ट जाणवत होती.

​”तुम्हाला नेहमीच तक्रार करायला काहीतरी कारण लागतं! रात्री तुम्ही घोरता, त्याने माझी झोप मोडते त्याचं काय? मी कधी तक्रार करते का?” माधुरी चिडून म्हणाली.

​सुभाषराव हातातला पेपर बाजूला ठेवत म्हणाले, “अगं माधुरी, पण मीठ जास्त झालंय हे सांगणं गुन्हा आहे का? हल्ली तुझं कशातच लक्ष नसतं.”

​अशीच बाचाबाची सुरू असताना माधुरीच्या नजरेसमोर सत्तर-ऐंशीचा तो काळ उभा राहिला.

आजच्या या रोजच्या कुरबुरींच्या मागे किती खोलवर रुजलेलं नातं आहे, याची तिला अचानक जाणीव झाली.

​तो काळ सत्तरच्या दशकाचा शेवट होता. सुभाष आणि माधुरी यांचं लग्न ठरलं होतं.

त्या काळी वडीलधाऱ्या मंडळींची पारख शब्दाला पक्की होती. “मुलगा गुणी आहे आणि मुलगी सुसंस्कृत आहे, मग एकमेकांना उगाच दाखवायची-पहायची गरज काय?” असा घरच्या वरिष्ठांचा ठाम विश्वास होता.

तो काळ जरी आधुनिकतेकडे झुकणारा असला, तरी काही घराण्यांत वडिलधाऱ्यांनी दिलेला शब्द हीच काळी दगडावरची रेघ मानली जाई.

​नशिबाची गंमत पहा, ‘पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले’ अशाच काहीशा परिस्थितीत लग्नाची बोलणी पूर्ण झाली.

दोन्ही घरांची एकमेकांवर खात्री होती आणि मध्यस्थीही तितकीच भक्कम होती, त्यामुळे प्रत्यक्ष भेटीचा सोपस्कार न पार पाडताच लग्न पक्कं झालं.

​सुभाष आणि माधुरी दोघांच्याही मनात एकच हुरहूर होती ज्याला आपण कधी पाहिलं नाही, ज्याच्याशी कधी बोललो नाही, त्याच्यासोबत अख्खं आयुष्य कसं व्यतीत होईल?

लग्नाच्या दिवसापर्यंत दोघांनीही एकमेकांचा चेहरा अधिकृतपणे पाहिला नव्हता.
​लग्नाचा दिवस उजाडला.

अंतर्पाट धरला होता, मंगलाष्टकांचे सूर घुमत होते. दोघांच्याही काळजाची धडधड वाढली होती.

‘सावधान’ शब्द उच्चारला गेला आणि अंतर्पाट सरकला. अदोघांनी पहिल्यांदा एकमेकांकडे पाहिलं आणि दोघांच्याही चेहऱ्यावर एक विलक्षण हास्य उमटलं.

​सुभाषला तर आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.ही तर तीच मुलगी होती, जिला तो कॉलेजच्या वाटेवर रोज लांबून पाहायचा. कधी बोलण्याची हिंमत झाली नव्हती, पण तिच्या साध्या सौंदर्याने तो मनोमन सुखावला होता.

इकडे माधुरीलाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. समोर उभं असलेलं हे व्यक्तिमत्व तिच्यासाठी अनोळखी नव्हतं.

एका मैत्रिणीच्या लग्नात तिने सुभाषला पाहिलं होतं आणि मनातल्या मनात ‘असाच जोडीदार मिळावा’ अशी इच्छाही व्यक्त केली होती.

​ज्यांना जगाने ‘न पाहिलेले’ जोडपे मानले होते, त्यांनी एकमेकांना प्रत्यक्षात न भेटताही एका अनामिक ओढीने मनात आधीच साठवून ठेवले होते.

ते ‘एकतर्फी प्रेम’ आता एका रेशमी बंधनात बांधलं गेलं होतं.​चाळीस वर्षांनंतरच्या त्या जुन्या आठवणींनी माधुरीच्या डोळ्यांत पाणी आलं.

ती हळूच सुभाषरावांच्या जवळ गेली आणि मृदू आवाजात म्हणाली, “मीठ खरोखरच जास्त झालं होतं का हो? की उगाच भांडायचं होतं?”

​सुभाषरावांनी स्मितहास्य केलं. त्यांचा राग कुठल्या कुठे पळून गेला होता. त्यांनी माधुरीचा हात हातात घेतला आणि म्हणाले, “मीठ थोडं जास्तच होतं, पण माझ्या घोरण्याच्या आवाजापेक्षा नक्कीच कमी!

काळ किती पुढे गेला ना माधुरी एकेकाळी गोडा वाटणाऱ्या गोष्टी आता तक्रारीत बदलल्या आहेत. पण तुझ्या आठवणींच्या गोडव्यापुढे या मिठाचा खारटपणा काहीच नाही.”

​माधुरी लाजून हसली आणि म्हणाली, “पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले… असं जगाला वाटलं, पण आपण तर एकमेकांना मनात आधीच साठवून ठेवलं होतं!”
​स्वयंपाकघरातला तो भांड्यांचा आवाज आता शांत झाला होता. संसारातल्या लहान-सहान कुरबुरी तर येणारच, पण त्याखाली दबलेलं ते जुनं, निखळ प्रेम मात्र आजही तितकंच ताजं होतं.अगदी ” पाहिले तुला न मी तू मला न पाहिले गत!”…

error: Content is protected !!