कथा : “पावसात भिजलेला गुलाब”
गावात श्रावण उतरला की सारं वातावरण जणू काव्यात बदलतं. आभाळ मिट्ट होतं, वाऱ्याला गंध येतो, आणि निसर्ग स्वतःलाच पुन्हा रंगवतो. सटाणा तालुक्यातल्या त्या डोंगरपायथ्याच्या छोट्याशा गावात, कस्तुरीचं घरसुद्धा दरवर्षी श्रावणात नव्याने जपत असे.आठवणी, पावसाचं खळखळ, आणि तिचं एकांतातलं अस्तित्व हेच तीच आयुष्य होत.
आज तिच्या अंगणात पावसाच्या थेंबांबरोबर एक गूढ शांतता पसरली होती. चुलीवर चहा उकळत होता, आणि जुन्या ट्रांजिस्टरवर लताची गाणी लागलेली. “सावन के झूले पड़े…” हे गीत जणू तिच्या अंतर्मनात कुठे तरी हलकेच खळबळ उडवत होतं.
ती गेला कितीतरी वेळ पावसाकडे पाहत बसली होती. तिच्या गालावर पाण्याचा थेंब ओघळला… पण हा पाऊसाचा नव्हता. तो होता आठवणींचा.
पहिलं प्रेम आणि पहिला श्रावण
कस्तुरी आणि सुरेश. गावातल्या शाळेत एकत्र शिक्षण घेतलेलं. दोघंही निसर्गप्रेमी. तो तिच्यासाठी रोज रानातून गुलाब आणायचा बहरलेला, भिजलेला गुलाब.
“कस्तुरी, श्रावणातलं प्रेम वेगळंच असतं गं… गोड, ओलं आणि सच्चं…” तो नेहमी म्हणायचा.
त्यांचं लग्नही श्रावणातच झालं. आभाळात इंद्रधनुष्य होतं आणि तिच्या कपाळावर कुंकू झळकत होतं. लग्नानंतर पहिल्या श्रावणात त्यांनी पहिल्यांदा सोमवारी उपवास केला, एकमेकांना फुलं दिली आणि रात्रभर पावसाच्या साक्षीने गप्पा मारल्या होत्या.
त्या पहिल्या श्रावणात तिने मनातली गाठ घट्ट बांधली होती हा माणूस म्हणजे माझं आयुष्य!
नातं फुलताना – दुसरा आणि तिसरा श्रावण
दुसऱ्या वर्षी ती गरोदर होती. घरात सतत मोरपिसासारखं हसू. सुरेश तिच्या पायाशी बसून तिच्या पोटावर हात ठेवून बोलायचा “आपल्याला मुलगी होईल… तिचं नाव ठेवू ‘शरयू’. श्रावणात जन्मलेली.”
पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते.त्या दिवशी पावसात विजा खूप चमकल्या आणि अचानक कस्तुरीचा झालेला गर्भपात, हॉस्पिटलचं गार वातावरण आणि तिच्या ओंजळीतच निसटलेलं बाळ… त्या श्रावणात तिने एक बोट धरलेलं स्वप्न गमावलं.
तिसऱ्या वर्षी त्यांनी एक गाय घेतली तिचं नाव ठेवलं “मंगला”. पहिलं दूध आल्यावर त्याने स्वतः चहा करून तिच्या हातात ठेवला. “या दुधात आपल्या आयुष्याचा गोडवा आहे” तो म्हणाला होता.
दुरावलेली जवळीक – चौथा आणि पाचवा श्रावण
नंतर नोकरीसाठी सुरेश मुंबईला गेला. कस्तुरी एकटी पडली. पाऊस आला तरी अंगण ओलचिंब नाही झालं… कारण हसणं थांबलेलं होतं. पण त्याची पत्रं मात्र श्रावणासारखी ओथंबलेली असत.
“या पावसात मी नाही, पण माझी सावली तुला बिलगून बसेल… तुझ्या ओल्या पदरात.”
पाचव्या श्रावणात तो परत आला. गावातल्या शाळेची रंगरंगोटी करताना त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच तेज होतं.
“कस्तुरी, श्रावणात गावाला परत रंग द्यायचाय.”
त्या वर्षी दोघांनी शाळेत मोफत रंग, पुस्तके वाटली. गावाने पहिल्यांदा त्यांच्या जोडीला ‘आदर्श दांपत्य’ म्हणून गौरवले.
शेवटचा श्रावण… आणि आठवणींचा वादळ
सहाव्या श्रावणात सुरेश गावातल्या पुलावरून घसरून गेला. पावसात वाहणाऱ्या नदीसारखंच त्याचं जीवन ओघळून गेलं.
त्या दिवशी, ती धावत पुलावर पोचली तेव्हा त्याच्या छातीतून श्वास नव्हता. पण त्याच्या हातात एक ओला गुलाब होता नेहमीसारखा.
“तो माझ्यासाठी होता…” ती स्वतःशीच कुजबुजली
आज अनेक वर्षांनीही, दर श्रावणात कस्तुरी तसंच जगते गुलाब लावते, उपवास करते, मंगळागौरीचे गाणे गाते… पण आता ती कोणासाठी नाही. ती त्या आठवणींच्या गाठी जपतेय… श्रावणात बांधलेल्या.
त्या सहा श्रावणांचे गुलाब अजूनही तिने एका जुन्या वहीत सुकवून ठेवले आहेत. दर पावसात त्यातून गंध येतो… त्याच्या स्पर्शासारखा.
“पावसात भिजलेला गुलाब कधीच कोमेजत नाही… तो मनात फुलत राहतो. हाच तर आहे “मनभावनश्रावण!”
🌧️🌹

सुंदर कथा