#लघुकथालेखन_टास्क
(२३/०२/२०२६)
#पाठिंबा
#विषय_पण _मी माझ्या बाळासाठी उभी रहाते तर मी चुकीची ठरतेय?
(संगीता देवकर…कथा_रिव्हेंज)
#स्वप्नीलकळ्या🥀
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
#पाठिंबा
माझीअगदी जवळची मैत्रिण अलका व मी सुखदुःखाच्या गोष्टी करत होतो. वाऱ्याच्या झोतासोबत तिच्या आठवणीचे वारे वाहू लागले.
तिने लहानपणीचा प्रसंग सांगायला सुरुवात केली…..
” आजीच्या गांवाला जायचे
असल्याने ती अतिशय आनंदात होती.तिच्या आईला लवकरच बाळ होणार होते. पण त्यादिवशी आई प्रवासभर रडतच होती.
आईला कां रडते ?म्हणून अनेक वेळा मी विचारले .
तो प्रसंग लहान वय असूनही माझ्या मनावर कायमचा कोरला गेला होता.
बऱ्याच वर्षानंतर समज आल्यावर आईने मला समजावून सांगितले की, तिच्या बाबांना जुगाराचे जबरदस्त व्यसन होते.आता माहेरी गेली की पुन्हा वापस येऊ नकोस अशी बाबांनी धमकी दिली होती.म्हणून त्यावेळी ती सारखी रडत होती.
पुढे बाळंत होऊन आईला मुलगा म्हणजे मला भाऊ झाला. मधल्या काळात वडिलांनी आईशी अजिबात संपर्क साधला नाही. आईलाही वडील नसल्याने माहेरचा भक्कम आधार नव्हता.पण मुलांचे संगोपन करणे तर अत्यंत आवश्यक होते.
‘ प्रसंगावधान बघून आजीने आईला म्हणजे मुलीला पाठिंबा देत शिक्षिकेचे प्रशिक्षण द्यायचे ठरविले.
आणि माझ्या आईने आम्हा मुलांच्या पाठीशी उभे रहाण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे रहण्याचा ठाम निर्णय घेतला.’
पण त्यासाठी आईला सहा महिन्याच्या अंगावर दूध पिणाऱ्या लहान मुलाला म्हणजे माझ्या छोट्याश्या भावाला व मला आजीजवळ सोडून दुसऱ्या शहरात शिक्षिकेचे प्रशिक्षण घेण्यासाठी वर्षभर रहावे लागणार होते. तरीही तिने मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला.कारण पुढे तिला शिक्षिकेची नोकरी मिळाली असती व ती स्वतःच्या पायावर उभी राहून आम्हा मुलांचे पालनपोषण उत्तमरीत्या करू शकणार होती. प्रशिक्षणानंतर लौकरच आईला सरकारी नोकरी मिळाली.
त्यावेळी तिने घेतलेल्या निर्णयावर नातेवाईकांनी तिला खूप दोष दिला.एवढ्या लहान बाळाला स्वतःपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला म्हणून दूषणेही दिली.
पण त्यावेळी आई जर मुलांच्या पाठीशी उभी राहिली नसती तर आम्हा मुलांच्या आयुष्याची धूळधाण झाली असती.वडिलांच्या व्यसनामुळे त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलेच नसते.
आई आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याने आम्हा मुलांचे जीवन उत्तमरित्या मार्गी लागले. चांगले शिक्षण मिळाले व उत्तम संस्कार केल्यामुळे आयुष्य ही उत्तम घडले.
आई अजूनही नेहमी म्हणते, “पण मी मुलांच्या पाठीशी उभे रहाण्याचा घेतलेला निर्णय त्यावेळी नातेवाईकांनी चुकीचा कसा काय ठरविला होता ?”
(३०० शब्द)
©® रोहिणी अग्निहोत्री
(स्वप्नीलकळ्या)🥀
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
