परूळकर

inbound39073294430072453.jpg

# माझ्यातली मी
# दीर्घकथा मालिका

🌟दीर्घ कथालेखन टास्क.🌟

      🍁अनामिका🍁

भाग १

मुलगी होणे हा काय गुन्हा आहे का?? पुढे जाऊन तिचे आयुष्य कसे असेल..तिला मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागेल का..या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हांला मी या लघुकथेमधून देणार आहे..

नायिकेचे नाव आहे…. “अनामिका ”
तिचा जन्म झाला आणि तिची आई तर खूपच खुश झाली पण वडील…त्यांना तर बिलकुल मुलगी नको होती.. त्यांनी आधीच बायकोला सांगून ठेवले होते
मला पहिला मुलगा हवा आहे मुलगी झाली तर मी तिचा स्वीकार करणार नाही.. आणि खरंच तिच्या
जन्मानंतर आई घाबरून गेली आता काय होणार मुलगी तर झाली आहे. आता हिला घेऊन  सासरी मी कशी जाऊ ती विचारातच पडली.. कारण तिला माहित होते की तिच्या नवऱ्याचा स्वभाव अतिशय जिद्दी आहे.. तिच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले. या माझ्या बाळाला तिचे वडील स्वीकारतील की नाही… त्यांनी मला घरात घेतले नाही तर मी कुठे जायचे.. या बिचाऱ्या बाळाचा तरी त्यात काय दोष आहे… ती गोंडस मुलगी थोडीशी सावळी पण छान गोलमटोल होती…

आईचे बाळंतपण माहेरीच झाले होते त्यामुळे तिला तिच्या माहेरच्यांनी  समजावले  की…अगं पुरुष हे असंच म्हणतात….पण या छोट्या बाळाला ते जेव्हां
बघतील ना…तेव्हा  त्यांचे मत बदलेल…काळजी करू नकोस…सर्व काही ठीक होईल. मग तिनेही मनाचा निर्धार केला.. दोन महिन्यानंतर ती बाळाला घेऊन जेव्हां सासरी जायला निघाली तेव्हां जातांना रस्त्यातही तिच्या डोक्यात  विचार चालू होते.. घरी पोचल्यावर तिचे सर्वांनी आनंदाने स्वागत केले…  संयुक्त परिवार होता.सासू,सासरे,दीर,जावा सर्वांनी “पहिली बेटी धनाची पेटी “म्हणून कौतुक केले.. लवकरच बाळाचे बारसे झाले…आणि तिचे नाव “अनामिका” ठेवण्यात आले…

पण अनामिकाच्या वडिलांचे काय? त्यांनी तिला बघितले का? अनामिकाला  सगळे लाडाने “अनु” म्हणायचे.. अनु घरी आल्यापासून तिच्या बाबांनी एकदासुद्धा तिला बघितले नव्हते. बारशाला  ते मुद्दामच  बाहेर गेले होते..घरी आल्यावर आईने त्यांना बाळाचे नाव सांगितले आणि बाळाला केव्हा बघणार असेही विचारले पण त्यांनी सरळ सरळ सांगितले की… मुलगा झाला नाही..मला मुलगा पाहिजे होता त्यामुळे या मुलीचे मी तोंड सुद्धा बघणार नाही. आईला फार मोठा धक्का होता.. पण तिने हिम्मत हरली नाही…

अनु गुटगुटीत होती आणि चंचल.. रंग तिचा तिच्या बाबांसारखा सावळा होता.. हळूहळू ती मोठी होत होती तशी तिची मस्ती वाढत होती..ती आता हुंकार द्यायला शिकली होती मधूनच काहीतरी आवाजही काढायची… खुदुखुदु हसायची.. तिच्या बाबांनाही कधी कधी तिच्याकडे बघावेसे वाटायचे पण त्यांचा “इगो “आड येत होता.. बघता बघता सहा महिने होऊन गेले. पण बाबांनी अनुला बघितलेच नाही आणि एकदा सुद्धा जवळ घेतले नाही..

एकदा घरचे सगळे लोक कुठेतरी समारंभाला गेले होते. अनुच्या आईला बरे नव्हते त्यामुळे ती घरी एकटीच होती..अर्थातच ती आणि तिचे बाळ.. बाबा पण बाहेरच गेले होते..अनु झोपली होती त्यामुळे आईने अंघोळ करायचे ठरवले..आई जेव्हां आंघोळ करायला गेली तेव्हा योगायोगाने  बाबा काहीतरी कामाने घरी आले..बाळ पाळण्यात झोपी
गेले होते. बाबांची इच्छा झाली होती…पण त्यांनी त्यांच्या मनाला समजावले.. अचानक अनु रडायला लागली..आणि मग मात्र बाबांनी तिला पाळण्यातून काढून जवळ घेतले. शेवटी बापाचेच हृदय ते..
कधीतरी विरघळणारच.. अनु तिच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी बाबांकडे टकमक बघत होती..आता तर
त्यांनाही राहवले नाही आणि त्यांनी तिच्यावरनुसती प्रेमाची बरसात केली  तिच्या पप्प्या पण घेतल्या..
पण अनुच्या बाबांचे प्रेम तिच्यावर असेच कायम टिकून राहील का…मुलगी झाली तर तिला का असे उपेक्षित समजावे… तुम्हीच सांगा  तिचा काय दोष असतो..वाचा पुढील भागात…
….

सौ.उर्मिला परुळकर..
रंजू….न्युझीलँड…

©️ ®️

🍁 अनामिका 🍁

भाग.. २

अनुच्या बाबांचे प्रेम तिच्यावर असेच कायम टिकून राहील का… मुलगी झाली तर तिला का उपेक्षित समजावे…

अनुचे बाबा आता लपून छपून तिला प्रेम करायला लागले… मी हिचे लाड करतो हे हिच्या आईला तर समजायला नको याची ते काळजी घ्यायचे.कारण त्यांच्या मनातला पुरुषी अहं जाता जात नव्हता… एकाच घरात राहून असे कसे शक्य होईल.आता ते अगदी छोटेसे बाळ नव्हते की पाळण्यामध्ये शांत झोपून राहील.. हळूहळू आता बाळ रांगायलाही लागले.मग बसायला लागले… एक दिवस अनुची मोठी आत्या घरी आली होती. ती बाळाला बघून म्हणाली की.. “किती गोड दिसते ही मुलगी,… कोणावर गेलीय रे भाई..ही तर मला तुझ्यासारखी दिसते. मनातल्या मनात  बाबा खुश होत होते. पण तसे त्यांना दाखवायचे पण नव्हते…

आईलाही मनातून हसू येत होते.. म्हणतात ना मुली बापाच्या चेहऱ्यावरच जातात…..सर्वसाधारणपणे सर्वच मुली वडिलांच्या लाडक्या असतातच.. अगदी तसेच हळूहळू अनू बाबांना आवडायला लागली.. तिच्या बाललीला बघून ते अगदी दंग राहायचे .. हळूहळू ते तिच्याबरोबर खेळायलाही लागले….

एक दिवस बाबा अनुच्या आईला म्हणाले की..
” खरंच मुली सुद्धा किती सुंदर आणि छान गोड असतात गं.. माझाच स्वभाव असा निष्ठूर का आहे”
बाबा आईला…. “अनुची आई” म्हणूनच हाक मारायचे….
आई म्हणाली “अहो चालायचेच.. या जगामध्ये तर सगळ्या तऱ्हेची माणसं आहेत..प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो .. कुणाचा मायाळू…तर कुणाचा कडक..”सुरुवातीला तुम्ही बाळाला बघितले नाही आणि माझ्याशी सुद्धा नीट बोलत नव्हता तेव्हा मी खरंच एकटी बसून खूप रडायचे आणि देवाला रोज विचारायचे की  माझा काय दोष आहे मुलगी झाली म्हणजे मी काय पाप केले आहे का.. इतकी छान सोन्यासारखी मुलगी दिलीस देवा.. पण तू तिच्या नशिबात बापाचे प्रेम लिहिले आहेस की नाही.. ”
बोलता बोलता आईला हुंदका फुटला.,.. 9_

“नाही ग.. असे काही नाही पण मी खरं सांगतो… अगदी  सुरुवातीपासूनच मला मुलगा खूपआवडतो
आणि मी मनातल्या मनात ठरवून ठेवले होते की.. मला पहिला मुलगाच होणार. आणि दुसराही मला मुलगाच हवा. लवकुश सारखे दोन मुलगे झाले तरी चालेल… पण मुलगी झाली तर मुलीला लहानाचे मोठे करायचे आणि एक दिवस परक्याच्या स्वाधीन करायचे ही कल्पना मी करू शकत नाही…आणि म्हणूनच मला मुलगी नको होती..” बाबांनी आज आपल्या मनातले विचार बायकोकडे व्यक्त केले..

खरच पुरुषांच्या मनात असे विचार येत असतीलच ना?आणि जर येत असतील तर त्यात चुकीचे तरी काय आहे? आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या स्वाधीन करायचा ही काही सोपी गोष्ट नसते..

बघता बघता अनु एक वर्षाची झाली आणि उभी राहून चालायला लागली..बाबांनी तिचे बोट पकडून तिला चालायला शिकवले.. आणि अचानक एक दिवस आईने पुन्हा खुशखबरी दिली की अनुसाठी भाऊ किंवा बहिण येणार… झालं बाबा आता पुन्हा टेन्शनमध्ये… आता दुसऱ्यांदा तरी मुलगा होणारका पुन्हा मुलगी झाली तर मी काय करायचे… ते तर  थोडा वेळ विचारातच पडले…

आईने त्यांना समजावले “अहो लोकांना दोन मुली होत नाहीत का? तीन-तीन मुली सुद्धा असतात…
आईच्याही मनात विचार येत होते की…आता मला दुसऱ्यांदा मुलगा होणार की मुलगी?? मला तर असे काहीच नाही..पण ह्यांचे काय..

त्यादिवशी डॉक्टरला दाखवून आल्यावर  बाबांनीही आईला सांगितले की “आता तू पूर्ण आराम कर…
अनुला सांभाळायला आणि घरचे काम करायलाही मी एक बाई लावीन.पण तू जास्त कष्ट घेऊ नकोस कारण यावेळी  नक्की मुलगा होणार असेच माझे मन म्हणते आहे..”

आई बिचारी काय बोलणार ? देवाला फक्त प्रार्थना करण्याशिवाय तिच्याकडे आणखी काही उपायही
नव्हता.. शिवाय यावेळी बाबांनी सांगितले होते की “बाळंतपण  याच शहरात करायचे…..तुला कुठेही  जायची गरज नाही..मुलगा होणारच आणि मी तुझी काळजी घेणार.. ” बाबांनी ठामपणे म्हटले….

अनुच्या आईला आता दुसऱ्यांदा काय बरं होणार.. मुलगा की मुलगी..  तेव्हां बाबांची रिएक्शन काय राहणार??  आईच्या मनाचा कोण विचार करणार
एक ना अनेक प्रश्न आहेत.. बघूया काय होतंय ते…

सौ उर्मिला परुळकर
रंजू…न्युझीलँड
©️®️

🍁अनामिका🍁

भाग..३

अनुच्या आईला आता दुसऱ्यांदा काय बरं होणार.. मुलगा की मुलगी..  तेव्हां बाबांची रिएक्शन काय राहणार??  आईच्या मनाचा कोण विचार करणार…एक ना अनेक प्रश्न आहेत.. बघूया काय होतंय ते…

अनुच्या आईला काम खूप पडायची. बाबा कामावर गेल्यावर तिला सगळी काम करावी लागायची. तशी घरामध्ये आईला इतरांची मदत व्हायची..तरीसुद्धा अनुची आजी काकी आत्या सगळेजण मिळून काम करायचे….

अनु पण अजून छोटीच होती.नुकतीच  चालायला लागल्यामुळे ती घरभर फिरायची.. कधी भांडी पाड  तर कधी कपड्यांचा पसारा करत राहायची.. कधी स्वतःच पडायची तर कधी  स्वतःच रडत बसायची. अनु खूपच चुलबुली होती. एका जागी बसणे तिला ठाऊक नव्हते.ती तर घरभर हिंडायची.आईने तिच्या पायामध्ये घुंगरूवाले पैंजण घालून दिले होते.जेव्हां घरात ती फिरायची… तेव्हा घरभर ” छुम छुम ” हा आवाज येत राहायचा.. आईला तर अनुला कुठे ठेवू आणि कुठे नको असे व्हायचे.. तिचे खूप खुप लाड करावे असेही वाटायचे…पण तेव्हां आईची  तब्येत थोडी नरम गरमच राहत असे.. कधी तिला उलट्या व्हायच्या तर कधी जीव घाबरायचा..

एकदा अनुची आजी आईला म्हणाली की…आत्ता पण तुला माहेरी जायची इच्छा असेल तर  तू जाऊ शकते.. आमच्याकडून तुला काही बंधन नाही. पण आईला माहीत होते की यावेळी बाबांची इच्छानाही
त्यांना तर वाटते की माझ्याजवळच अनुने आणि अनुच्या आईने राहावे.आणि यावेळी मुलगा होणार तोही माझ्या डोळ्यासमोरच..

एकदा बाबा थकून घरी आले आणि आईला  ते म्हणाले की… “.अनुची आई… हे बघ यावेळी तू काही काळजी करू नकोस अनुला भाऊच  होणार आहे. बाळाची आणि तुझी काळजी मी घेणार आहे
आई-बाबांना किंवा घरातल्या कुणालाही काही त्रास होणार नाही याची मी खबरदारी घेईन  फक्त काही दिवस ते अनुला सांभाळून घेतील.. सर्व कामांना स्वयंपाकाला मी माझ्यातर्फे बाई लावीन.
तूला थोडेही कष्ट झालेले मला चालणार नाही.
बाबांचे आई वर अतोनात प्रेम होते. स्वभावाने ते जरी रागीट असले तरी सुद्धा मनाने खूप प्रेमळ होते

आणि तो दिवस आला.. पहाटे चार वाजता आईला पोटात दुखणे सुरू झाले. त्यांनी बाबांना उठवले…
आणि दोघेही लगेच दवाखान्यात गेले.. जाण्यापूर्वी आईने अनुला तिच्या आजीकडे सोपवले.. अनुच्या जाऊ बाई पण त्यांच्या बरोबर जायला निघाल्या… सुरुवातीला अनुच्या बाबांनी आढेवेढे घेतले परंतु
सासुबाईंनी त्यांना समजावले की कुणी तरी बाई माणूस बरोबर असणे जरुरी आहे.. शेवटी बाबांनी होकार दिला आणि तिघेही दवाखान्याच्या दिशेने जायला निघाले.. रस्त्यामध्येच आईच्या पोटात खूप कळा यायला लागल्या. बाबा तिला समजावत होते थोडा धीर धर बस आता दवाखाना आलाच आहे.
आणि हो आपले युवराज येण्याची घाई करतात आहे.. अशा अवस्थेतही आईच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले… खरंच मुलगा होणार या कल्पनेनेच इतका आनंद का होत असावा..???

दवाखान्यात पोचल्यावर बाबांनी लगेच डॉक्टरला सांगितले की “माझ्या बायकोला त्रास होता कामा नये..तिचे बाळंतपण सुखरूप पार पडायलाच हवे पैसा कितीही लागला तरी चालेल पण तिला आणि होणाऱ्या बाळाला त्रास नको. आणि मॅडम मलातर मुलगा पाहिजे आहे आणि मुलगा होणारच…तुम्ही म्हणाल ते प्रेझेंट मी तुम्हाला देणार…”

डॉक्टरांनी बाबांना समजावले की “तुम्ही टेन्शन घेऊ नका.. बाळंतपण करणे ही आमची ड्युटीच आहे.आम्ही कुठल्याही प्रकारचे गिफ्ट घेत नसतो फक्त तुमचे सहकार्य आम्हाला हवे आहे. एक गोष्ट सांगू इच्छिते  मी…तुम्हाला मुलगा मुलगी काहीही झाले तरी प्रेमाने सहर्ष स्वीकार करायचे आहे… कारण पेशंटला दोन्ही वेळेला सारखाच त्रास होत असतो. मग तो मुलगा असो की मुलगी…तुम्हीच सांगा  खुशीमध्ये सुद्धा पार्शलिटी का..?

मुलगा मुलगी मध्ये भेदभाव करण्याचा जमाना तर आता गेला आहे.. You understand Mr ?
डॉक्टर मॅडमच्या या लेक्चरमुळे बाबा एकदमच चूप बसले..डॉक्टर आईला लेबर रूम मध्ये घेऊन गेली. आणि बाबा बाहेर वाट बघत होते..त्या बातमीची जी  त्यांना मनापासून सुखावणार होती… आता लवकरच समजणार होते मुलगा की मुलगी?
खरंच अजूनही मुलगा मुलगी  हा भेदभाव होतच असतो….तो कधी संपणार? आमचा
देश खऱ्या अर्थाने कधी स्वतंत्र होणार???

सौ.उर्मिला परुळकर..
रंजू….न्युझीलँड…

©️ ®️

# माझ्यातली मी # दीर्घ कथा

14 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!