#माझ्यातलीमी
#दीर्घकथा
परफेक्ट मॅच भाग …१
शिवानी आणि आदित्यचा दिमाखदार विवाह सोहळा पाहून सगळ्यांचेच डोळे दिपत होते, काहींची तर बोटे आश्चर्यानं तोंडात जात होती. उभारलेला तो भव्य शामियाना, पाहुण्याची बडदास्त, पंच पक्वान्नांचे भोजन, कशाची म्हणून कमी नव्हती.
साखरपुडा, मेहेंदी, हळद, संगीत, लग्न असा तीन दिवस सोहळा रंगला होता ह्या तिन्ही दिवस सगळ्यांची उत्तम बडदास्त ठेवली जात होती. राजकारणी मंडळी, बिझिनेस मॅन अशा थोरामोठ्यांची विवाहाला उपस्थिती होती. कोणाला काही कमी पडणार नाही याकडे दादासाहेब म्हणजे आदित्यचे थोरले बंधू जातीने लक्ष देत होते.
“सगळं छान आहे हो” फक्त जोडा जरा विजोड दिसतो नाही अशी काहीशी कुजबुज उपस्थित मंडळीत होत होती. गोरीपान, नाजूक शिवानी नववधूच्या वेशात अधिकच खुलून दिसत होती. गालावर पडणारी मनमोहक खळी प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होती. तिच्या मनाने आदित्य दिसायला अगदीच सुमार होता. कोणी बोलत होत तर कोणी बोलत नव्हतं पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत मात्र होत.
“अहो, रंग, रूप हल्ली बघतय कोण? पैसा महत्वाचा… भोसले घराण्याला भुलले झालं” आशाताई मीनाकडे बघत कुजबुजल्या.
“शिवनीचे सासरे आबासाहेब भोसले मोठ प्रस्थ, किती तरी एकर शेती, बागायती, परत राजकारणात सक्रिय, पंचक्रोशीत पसरलेली ख्याती. खोऱ्याने पैसा कमावतात, मोठ घर, फार्म हाऊस अजून काय हवं, असला नवरदेव काळा सावळा कुठे बिघडतय. एवढा पैसा आहे पण मुळीच गर्व नाही हो कशाचा. अगदी देवभोळी साधी माणसं आहेत. नशीब काढल हो शिवानीने. दिसणं सोडलं तर काही कमी नाही आदित्यत. एम. टेक. मल्टी नॅशनल कंपनीत जॉबला. मुंबईत मोठा वेलं फर्निष फ्लॅट, गाडी सगळ आहे. अहो, भोसले घराण्यात सगळे पिढीजात शेती बागायती, दुग्ध व्यवसाय सांभाळत आहेत. कोणी जास्त शिकलेलं नाही म्हणून आदित्यच्या वडिलांची इच्छा धाकट्या आदिने तरी शिकावं म्हणून मग त्याला हॉस्टेलला ठेवलं, नाव काढल हो आदित्यने. लग्नानंतर दोघं राजाराणी मुंबईत रहाणार, कधी तरी येणार गावी ऐश्वर्य उपभोगायला…मज्जा आहे शिवानीची” मीना शिवानीकडे बघत अशाताईंना म्हणाली.
“आमची शिवानी पण एम.बी. ए. आहे. चांगल्या पगाराची नोकरी आहे” अशाताईंनी तोऱ्यात उत्तर दिले.
“गरज काय नोकरी करायची भोसल्यांच्या सुनेला”
“ते ही आहेच म्हणा.”
“आदित्य लहानपणापासून शहरात वाढलेला, शिकलेला, मॉडर्न विचारांचा, त्याला तशीच हायफाय, फाडफाड इंग्रजी बोलणारी मुलगी हवी होती. इथं गावात कुठे मिळणार म्हणून लग्न ठरत नव्हत. शेवटी मोठ्या मुश्किलीने सोयरिक जुळली. भोसले मंडळीच सगळा खर्च करत आहेत, आपल्या घराण्याला साजेस लग्न व्हावं म्हणून. आहो, हटूनच बसला आदित्य हीच्याशीच लग्नं करणार म्हणून.”
“तरीच म्हटलं भोसल्यांना मनाने शिवानीच्या माहेरकडील परीस्थिती अगदीच यतातथा, आई शिक्षिका तर वडील प्रायव्हेट नोकरीत. त्यांना एवढा खर्च कुठून परवडायला. फार गर्व होता रहाणे मंडळींना आपल्या गोऱ्या रंगाचा. नाकाने कांदे सोलत असायची शिवानीची आई….बरं झालं जावई दिसायला सुमार मिळाला.” बोलता बोलता आशाताईंनी मानेला झटका दिला.
“शिवानीच्या बाबतीत काय घडलं माहीत आहे का आदित्यला, त्याच्या कुटुबीयांना” आशा आणि मीनाच्या गप्पात सामील होत नेनेकाकू म्हंटल्या.
“असं पण काही आहे का? वाटलंच होतं मला कुठे तरी पाणी मुरतंय.”
“जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, आपण मस्त लग्न एन्जॉय करू, सुग्रास भोजनाचा आस्वाद घेऊ. बघतील त्यांचं ते….” काकू आणि मीना दोघींना बुफे काउंटरकडे नेत आशाताईंनी विषय संपवला.
काहीसं कुतूहल, काहीसं आश्चर्य, हेवा अशा संमिश्र वातावरणात, उलटसुलट चर्चांनी रंगलेला शिवानी आणि आदित्यचा विवाह सोहळा दिमाखात पार पडला.
परफेक्ट मॅच भाग ….. २
उलट-सुलट चर्चानी रंगलेला शिवानी आणि आदित्यचा विवाह ठरल्या प्रमाणे थाटमाटात निर्विघ्नपणे पार पडला. गाजत वाजत वरात निघाली, दणक्यात शिवानीचा गृहप्रवेशही झाला.
पूजा, जागरण, गोंधळ सगळे यथासांग पार पडले. पाहुणे मंडळी आपापल्या घरी परतू लागली. नवदाम्पत्याची हनीमूनला जायची लगबग सुरू झाली.
सिमल्याच्या गोठणाऱ्या थंडीत एकमेकांच्या मिठीत विरघळत, प्रेमाची लाली गाली चढवत आदित्य, शिवानीच्या नव आयुष्याची सुरुवात झाली.
सगळं कस स्वप्नवत चालू होत, दिवस मजेत भूरकन उडत होते. मुंबईच्या आपल्या आलिशान फ्लॅटमध्ये राजा राणीच्या संसारात शिवानी रुळत होती. घर, ऑफिस छान सांभाळत होती. आदित्यच्या प्रेमात आकंठ बुडत होती.
पण म्हणातात ना…सुखाला गालबोट लागतं तसंच काहीसं झालं. जरा निवांत वेळ मिळाला म्हणून शिवानीने लग्नाचे, हनिमूनचे काही फोटो स्टेटसला ठेवले. आपल्या मैत्रिणीच्या ग्रुप वर टाकले.
काही मिनिटांतच मैत्रिणीचा चिवचिवाट सुरू
झाला. मस्त, सॉलिड, लव्हली कपल ♥️♥️ अगदी मेड फॉर इच अदर…शिवानी कौतुकाने सुखावत होती.
तोच तिच्या आनंदावर विरजण घालत एक सखी म्हणाली, “तुझ्या मानाने सो सो असला तरी मस्त पैसेवाला गटवलास.” एक दोघींनी तिची री ओढली.
शिवानी दुखावली गेली. तिच्या डोळ्यात आसवं दाटून आली.
आपण जरा जास्तच बोललो असं मैत्रिणीच्या लक्षात आल्यावर “जस्ट कीडिंग…चील वैगरे म्हणत तिने बाजू सावरून घेतली.
पण ही गोष्ट शिवानीला चांगलीच लागली म्हणजे ‘सगळ्यांना असंच वाटत मी आदीचा पैसा पाहून लग्न केलं…..’ या विचाराने तिच्या डोळ्यातून गंगा जमुना बरसू लागल्या.
नेमका त्यातला एक दवबिंदू शिवानीच्या गालावर ओघळलेळा आदित्यने पहिला. तो कावराबावरा झाला.
“काय झालं शिवा, बरं वाटतं नाही का? काय होतंय” आदित्यने तिचे अश्रू टिपत विचारले.
आदित्यच्या बोलण्याने शिवानी अजूनच हळवी झाली. त्याच्या छातीवर डोकं ठेवत हमसून हमसून रडत तीने तो मेसेजचा सगळा प्रकार सांगितला.
“अरे एवढंच ना. मला पण बोलतात सगळे तुझ्या मनाने तुझी बायको देखणी आहे. मी बोलतो मग…अभिमान आहे मला त्याचा. कोणाला नाही आवडणार आपली बायको सुंदर असलेली.”
“अरे पण हे तर पैश्याच…मी खरंच तुझ्या पैश्याकडे पाहून लग्न नाही केलं. माझे आईबाबा तर नाकापेक्षा मोती जड नकोच म्हणत होते. मी आहे तशी माझ्याबद्दल सगळं माहीत असून तू मला स्वीकारलंस म्हणून मी तुझ्याशी लग्नं केलं.”
“शिवा तुझ्या रुपाला मी भाळलो नो डाऊट पण त्याचबरोबर तुझा प्रामाणिकपणा, कुठलाही आडपडदा न ठेवता सगळं सांगितलेला स्पष्टवक्तेपणा, ती निरागसता जास्त भावली मला. आपल्या दोघांना माहीत आहे, खरं काय आहे ते. मग कोण काय म्हणतंय याची पर्वा कशाला करायची. तू त्रास करून घेतेस म्हंटल्यावर अजून बोलतील तुला. कोणालाही कसलं स्पष्टीकरण दयायला आपण बांधील नाही.” आदित्य ठामपणे म्हणाला.
“बरं तुला सुट्टी असली तरी मला नाही, तुमच्या सारखे सगळे बँक हॉलिडे माझ्या नशिबात नाहीत, मला जावंच लागेल आज ऑफिसला पण नक्की लवकर येतो, मग बाहेर जाऊ…कॅडल लाईट डन.. जास्त विचार करून त्रास नाही करून घ्यायचा… जान…बाय” शिवानीच्या कपाळावरील बट बाजूला करत, तीला साखरेचा पापा देत आदित्य ऑफिसला गेला.
आदित्यने बजावून सुद्धा शिवानीच मन थाऱ्यावर नव्हतं. जखमेवरची खपली निघाल्यागत झालं होतं. दुखरी नस कोणीतरी दाबावी तसं. तिला देखील कधी तरी वाटायचं सगळ काही आहे, तो थोडा देखणा हवा होता म्हणून आणि त्यातच आज भूतकाळ डोकावूं पहात होता. त्या नाकोश्या आठवणी बैचेन करत होत्या. कुठून ते फोटो टाकले आणि मनस्ताप ओढवून घेतला अस झालं शिवानीला.
परफेक्ट मॅच भाग …. ३
आदित्यने अनेकदा समजावून देखीलही आज शिवानीच वेड मन मानत नव्हतं, सारखं जुन्या नको असलेल्या आठवणी उगाळून रडत होत. सार काही काल परवा घडल्यासारख सगळ आठवत होतं.
मध्यमवर्गीय संस्कारात लहानाची मोठी झालेली शिवानी जितकी दिसायला सुंदर होती, तितकीच अभ्यासात देखील हुशार होती. घरातला लाडोबा,आईबाबांच्या गळ्यातला ताईत होती.
स्वप्नातील राजकुमार अचानक यावा, हाती हात धरून प्रेमाच्या गावा घेवून जावा, त्याच्या साथीने संसार बहरावा एका विशिष्ट वयात असतात त्या मुलींप्रमाणेच तिची स्वप्न होती.
लाखो दिलो की धडकन, हृदयाची राणी असलेल्या शिवानीच्या मागे बरेच जण रुंजी घालत होते पण त्यात खरे प्रेम नव्हते, होता तो निव्वळ टाईमपास. शिक्षण पूर्ण होवून नोकरी लागली तरी तिला राजकुमार भेटायच काही नाव नाही.
“तू जमवलं नाहीस ना कुठे? मग आम्ही बघतो” म्हणत आई बाबांनी जोरदार वर संशोधन सुरू केले. रीतसर नाव नोंदवण्यात आलं. विवाह मंडळातून काही दिवसांनी रोहित पानसरेच स्थळ आल. पहाताक्षणी दोघांनी एकमेकांना पसंत केलं. राजबिंडा, गोराचिटा, बिझनेसमन, रोहित घरच्यांनाही खूप आवडला.
दोन्ही कुटंबियाची पुढची बोलणी सुरू झाली. रोहित, शिवानी एकमेकांशी तासनतास फोनवर बोलण्यात गुंग झाली. घरच्यांची परवानगी घेवून कधीतरी भेटीगाठी होऊ लागल्या.
काही नको म्हणणाऱ्या पानसरे कुटुंबीयांनी आपले रंग दाखवायला हळूहळू सुरवात केली. एसी हॉल, दोन्हीकडचा खर्च मुलीकडल्यांनी करायचा, चार चौघात उठून दिसतील असे ठसठशीत दागिने घाला, त्यांच्या मागण्या वाढू लागल्या. शिवानीच्या आईबाबांनी तिच्या लग्नासाठी आधीच तरतूद करून ठेवली होती त्यानुसार ते रीतीप्रमाणे सगळं देणारही होते. माने कुटुंबीयांचे अडून अडून मागणे खटकत होते पण सोयरिक तुटू नये, शिवानी नाराज होवू नये म्हणून गप्प होते.
“स्लिवलेस ड्रेस का घातलास? डार्क लिपस्टिक का लावलीस, फोन बिझी का येत होता? कोणाशी बोलत होतीस इतक्या वेळ…” अश्या काही न काही कारणांनी रोहित शिवानी वर चिडू लागला, संशय घेऊ लागला. जरुरीपेक्षा जरा जास्तच जवळीक साधू लागला. त्याच्या डिमांड वाढू लागल्या पण लग्न ठरंल असलं म्हणून काय झालं, मर्यादा पाळायला हव्यात, ह्या बाबतीत शिवानी ठाम होती. त्यामुळे वादावादी होत होती.
शिवनीला हवं असलेले प्रेम, मायेचा ओलावा त्याच्या भेटीत कधीच नव्हता. तिथं होतं फक्त आणि फक्त रोहितचं हक्क गाजवणं, त्याला वाटणार तिच्या शरीराचं आकर्षक. तिचा विरोध वाढू लागताच त्याचा आक्रस्थाळेपणा वाढू लागला. परिणामी रोहितला भेटायची ओढ वाटण्याऐवजी शिवानीला त्याची भिती वाटू लागली, ती त्याला टाळू लागली.
‘कसं निभावून नेणार आपण हे सगळं, थांबवावं का? मोडाव का लग्न’ असं शिवानीला वाटू लागलं. घरच्यांची लगीनघाई, अतिउत्साह पाहून कोणाला व कस सांगावं हा प्रश्न तिला पडू लागला. ती गप्प गप्प राहू लागली.
त्यातच एक दिवस रोहित शिवानीला सरप्राईज सरप्राईज म्हणत सरळ लॉजवर घेऊन गेला. त्याच्या तावडीतून कशीबशी सुटत शिवानी तडक घरी आली ते हे नात संपुष्टात आणायचं हा निश्चय करूनच.
घरी आल्यावर आईबाबांना शिवानीने सगळी हकीकत रडतरडत सांगितली. रोहितच्या कुटुंबीयांबद्दल आधीच नाराज असलेल्या त्यांनी लग्न मोडायचा निर्णय घेत रोहितच्या घरी फोन लावला. आपला मुलगा अस वागू शकतो यावर रोहितचे कुटुंबीय विश्वास ठेवेना. रोहितला झाल्या प्रकारबद्दल खेद नव्हता. लॉजवर नेलं तर कुठे बिघडलं तिच्याशी लग्न करणारच होतो ना. या आपल्या भूमिकेवर तो ठाम होता. बरीच वादावादी झाली, भांडण झाली, रोहित ने खोटं नाट नाट सांगत शिवानीची बरीच बदनामी केली, पोलिसांपर्यंत गोष्ट गेली. अखेर मोठ्या मुश्किलीने शिवानीची या सगळ्यातून सुटका झाली.
या सगळ्या प्रकारामुळे शिवानी अगदी कोमेजून गेली. वर्ष दोन वर्ष सरली. घरच्यांच्या पाठिंब्यामुळे हळूहळू या सगळ्यांतून बाहेर आली. परत एकदा सगळेच काही वाईट नसतात, सगळं आयुष्य पडलंय बाळा म्हणत लग्नाची पुन्हा एकदा बोलणी सुरू झाली.
यावेळी स्थळांची कसून चौकशी होऊ लागली, गेल्या वेळी पण केली होतीच म्हणा शिक्षण, घरदार… पण माणसाचं एक अंतरंग असतं, ज्याची खात्री कोणीच देऊ शकत नाही, असंच काहीसं झालं होतं.
“माझ्या बाबतीत जे काही झालं ते माहीत झाल्यावर जो मला स्वीकारेल त्याच्याशी मी लग्न करेल” या अटीवर शिवानी लग्नाला तयार झाली.
अस सांगितल्यावर कोण तयार होईल? पण लग्नानंतर दुसरीकडून कळण्यावर प्रॉब्लेम होईल असं घरच्यांना वाटल्याने ते ही तयार झाले.
शिवानीला कोणाला फसवून, खोटं बोलून आपल्या नव आयुष्याची सुरुवात करायची नव्हती म्हणून लग्नाआधी तिने आदित्यला सगळे सांगितले.
फोनची रिंग वाजली तशी शिवानी भानावर आली.
“जेवलीस का? बरी आहेस ना शिवा” आदित्य तिला विचारत होता.
“लवकर निघतोय मी. तासाभरात पोहोचतो” म्हणत त्याने फोन ठेवला.
त्याच्या प्रत्येक वाक्यात काळजी, प्रेमाचा वर्षाव होता. शिवानीला जीवापाड जपण्याचा ध्यास होता.
एवढा जीवापाड प्रेम करणारा जोडीदार लाभला तरी मी उगाच दुःखद भूतकाळ उगाळत बसले, कोण काय म्हणतंय याची खंत बाळगत बसले याचे शिवानीला वाईट वाटले.
मिस मॅच म्हणो, पैश्यासाठी म्हणो किंवा अजून काही…आम्ही दोघं एकमेकांसाठी अनुरूप, परफेक्ट, अगदी मेड फॉर ईच अदर आहोत. हे आमचं आम्हाला माहीत आहे मग कशाला जगाची पर्वा करा असा विचार करत असताना शिवानीच घड्याळाकडे लक्ष गेले, किती वेळ असेच बसून होते हे जाणवले. आदिने मला अश्या अवस्थेत, ह्या अवतारात पाहिले तर त्याला वाईट वाटेल. यापुढे त्याला त्रास होईल असे नाही वागायचे, कोणाकडे लक्ष नाही द्यायचे तिने मनोमन ठरवले.
‘आदित्यच्या आवडीची पिंक साडी, हलकासा मेकप, डायमंड मंगळसूत्र’ पटकन तयार होते, आदित्य खुश होईल या विचाराने शिवानी मोहरली. सजना है मुझे सजना के लिए गुणगुणत छान सजली.
भले कोणी म्हणो विजोड जोडी पण संसारात आहे आमच्या अतूट प्रेमाची, अवीट गोडी म्हणत टेचात आदित्यबरोबर रोमँटिक डेट वर जायला शिवानी सज्ज झाली. मनातले सगळे विचार बाजूला सारत आपल्या परफेक्ट मॅच असलेल्या जोडीदाराची, लाडक्या नवरोबाची आतुरतेने वाट पाहू लागली.
समाप्त…
©मृणाल महेश शिंपी.
