पद्मालय

IMG-20250829-WA0022

# माझ्यातली मी
# गणपती बाप्पा

*पद्मालय*

भारतातील अडीच गणेश पीठांपैकी अर्धे पीठ म्हणजे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील श्री क्षेत्र पद्मालय,हे एक जागृत गणेश मंदिर आहे. गणेश पुराणात श्री व्यासांनी ज्याचा उल्लेख केला आहे . जळगाव पासून सोळा किमी अंतरावर स्वतः च्या गाडीने किंवा म्हसावद गावापासून एस टी ने जाता येते.
मंदिराच्या बाहेर प्रवेश द्वारा पाशी , पूजा साहित्याची अनेक दुकाने आहेत. पद्मालय नावाचं गाव अस्तित्वात नाही पण मंदिरा सभोवतीच्या भाग पद्मालय म्हणूनच ओळखला जातो.
पद्म म्हणजे कमळ आणि आणि आलंय म्हणजे घर. मंदीराच्या सभोवतालची सुंदर कमलपुष्पांच तळं आहे.मध्यभागी मंदीर आहे.मंदीरित जातिना प्रथम दृष्टीस पडतं ते भलं मोठ्ठं जातं,या जात्यावर दळून मंदीरात पुर्वी प्रसाद करीत असत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक भली मोठी अष्टधातूची घंटा असून तिचं वजन चारशे चाळीस किलो आहे.कुणी तरी विदेशी व्यक्ती म्हणाली होती की ,भारत देश हा इतका श्रीमंत आहे की मंदीरातील घंटा जरी विकल्या तरी प्रचंड संपत्ती गोळा होईल.
मंदीरात प्रवेश करताच आपण एका मोठ्या सभागृहात प्रवेश करतो. प्रथम मुषकाचे दर्शन घडते.संपुर्ण भारतात हे एकमेव मंदिर आहे जेथे मंदिरात दोन गणेश मुर्ती एकच सिंहासनावर विराजमान आहेत.प्रवाळ रत्ना पासून बनलेल्या या स्वयंभू आणि सुंदर मूर्ती आहेत.आमोद आणि प्रमोद ही त्यांची नावे.एकाची सोंड उजवीकडे तर दुस-याची डावीकडे आहे.गणेश चतुर्थी आणि कार्तिक पौर्णिमेला येथे यात्रा भरते.मंदीराचं बांधकाम कधी झाले ते अस्तित्वात नाही.या मंदिराचा जीर्णोद्धार श्री गोविंद महाराजांनी केला होता.मंदीरा समोर त्यांची समाधी आहे.हे गणेश मंदीर जागृत असल्याचे बोलले जाते.
येथून थोड्याच अंतरावर भीमकूंड नावाचे ठीकाण आहे.महाभारत काळात पांडवांची येथे वस्ती होती.तेथेच बकासूर राक्षसाने गावातील लोकांना हैराण केले होते.एक एक माणूस आणि गाडाभर अन्न नेऊन पोहचवायचे हे संकट गावावर होतं.एके दिवशी ,कुंती आणि पाच पांडव ज्या घराचे आश्रित होते , त्या घरावर हे संकट होते.त्या घरातील पुरुषाला त्या दिवशी तो गाडा घेऊन जायचं होतं.ती बाई खूप रडत होती.कुंतीने विचारलं तसे तिला कळले की हे घर संकटात आहे.तिने त्या बाईला आश्वस्त केलं आणि भीमाला त्या जागी पाठविलं.भीमाने बकासूराला कसं मारलं हे तर आपल्याला ज्ञात आहेच.बकासुराला मारल्यावर भीमाने आपला पाय जोरात आपटला तेथेच तळे तयार झाले, त्याचे पाणी पिऊन भीम परत आला. त्याच जागी झालेलं तळं त्याला भीमकूंड म्हणतात.
असं हे सुंदर मंदिर एकदा नक्की बघून गणेशाचा आशिर्वाद घ्यावा.

©® स्वाती देशपांडे (सुमन) नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!