#माझ्यातलीमी
#सुप्रभात
#लघुकथालेखन (१३/१०/ २५)
@everyone
खाली दिलेल्या वाक्यांवरून सुंदर #लघुकथा .
त्या लोकांना तुमचं मोल कधीच समजणार नाही ज्यांच्यासाठी तुम्ही नेहमी हजर राहता..!!
**निसर्ग म्हणतोय**
रवी अभ्यास करत असताना,बाबा आईला म्हणाले,बघ बातम्यामधे काय सांगत आहेत,अनेक शहरांना जोडणारा महामार्ग सरकार बनवणार आहे त्यामुळे प्रवास जलद,सोयीस्कर होईल.
आई -पण काही संस्थानी विरोध केला आहे.
रवी -जर सोयीस्कर,जलद मार्ग होतो आहे तर विरोध का?
बाबा- महामार्ग बनवण्याच्या प्रक्रियेत निसर्गचक्राला बाधा पोहोचणार असेल म्हणून विरोध होत असेल.
रवी- म्हणजे काय बाबा?
तितक्यात पाहुणे येतात म्हणून रवी त्याच्या खोलीत अभ्यासाला जातो.
अभ्यास करताना त्याला झोप लागते आणि एक आवाज ऐकू येतो.
“आज तुझ्या समोर माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी आलो आहे.”
रवी -कोण बोलत आहे ,आपण कोण ?
मी तुम्हा सगळ्यांचा मित्र .मी आहे म्हणून तुमचा श्वास आहे.माझा तुमचा जन्मोजन्मीचा ऋणानुबंध आहे. कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता मी सर्वांना भरभरून देत असतो,पण तुम्हाला माझं मोल नाही, जाणीव नाही .
रवी-पण तुम्ही कोण?मला फक्त तुमचा आवाज येतो आहे.तुम्ही माझ्या समोर या.
अरे,नक्की कुठल्या रूपात येऊ?माझी अनेक रूपे आहेत.माझ्यामुळे तुम्हाला प्रकाश मिळतो,ऊर्जा मिळते.मी ऑक्सिजन देतो म्हणून तुम्ही श्वास घेऊ शकता .माझ्यामुळे तुम्हाला फळ,भाज्या मिळतात,फुलांचे सुंदर रंग, हिरवे गालिचे तुम्ही अनुभवू शकता .माझ्यामुळेच तुम्हाला पाणी मिळत.
रवी-म्हणजे तुम्ही?
निसर्ग-मी निसर्ग.मी सूर्य,चंद्र,नदी,समुद्र,वारा,पाऊस,वृक्ष अशा कितीतरी रूपात,मी रोज,कायम तुम्हाला द्यायला हजर असतो पण तुम्हाला आहे का माझं मोल?
रवी-आहे ना.तुझ्या सानिध्यात राहायला मला खूप आवडत म्हणून सुट्टी लागल्यावर फिरायला निघतो शहरात समुद्र किनारी.गावी नदीत तासनतास डुंबत राहायला आवडत मला, शेतातून फिरायला,डोंगर चढायला खूप आवडतं.
निसर्ग-नुसतं मला आवडून काय उपयोग?माझं रक्षण कोण करणार? तुम्ही तर माझा नाश करतानाही विचार करत नाही.
रवी-म्हणजे,मला खरच कळत नाही आहे.
निसर्ग-तुम्ही स्वार्थासाठी निर्दयीपणे माझ्या शरीरावर घाव घालता, नद्यांना बांध घालता,बेछूट वृक्षतोड करता, वने भुईसपाट करता, प्राण्या-पक्ष्यांना बेघर करता.
रवी-बापरे,असं जर कोणी करत असेल तर ते चुकीचे आहे ..
निसर्ग-तू लहान असून तुला हे समजत पण बाकी मानव?.विकास आणि निसर्ग हे परस्परविरोधी नसून एकमेकांवर अवलंबून आहेत.जर विकास निसर्गाची काळजी घेऊन केला नाही,तर त्याचे गंभीर परिणाम मानवावरच होतात.
रवी-भयंकर परिणाम म्हणजे, तू चिडला आहेस का मानवावर?
निसर्ग-चिडू नाहीतर काय करू? मानवाच्या अन्न,वस्त्र, निवारा गरजा वृक्ष भागवतात. वृक्ष,नद्या यांचं अस्तित्व धोक्यात आणलंय मानवाने
तुम्ही,निसर्गापासून दूर जाता. जंगल तोडीमुळे नैसर्गिक पर्यावरणाशी संबंधच त्यामुळे तुटतो. नैसर्गिक साखळीही नष्ट होते.
तुम्ही प्राणी-पक्ष्यांची हत्या करता,प्रदूषण वाढवता, आपल्या बुद्धीच्या, कार्यक्षमतेच्या जोरावर ‘निसर्गाचा स्वामी’ बनल्यासारखं तुम्ही वागत आहात.
तुमच्या सर्व कर्माची फळे तुम्हालाच भोगावी लागणार आहेत.
रवी-म्हणजे तू काय करणार आहेस?
निसर्ग-ठरवलं तर खूप काही करू शकतो ,आता तर फक्त ट्रेलर दाखवतो आहे जर ठरवलं ना पूर्ण पिक्चर दाखवायच तर..तर एक मिनिटही नाही लागणारं मला पूर्ण मानवजात नष्ट करायला
रवी -म्हणजे ,दुष्काळ तुझ्या रागामुळे होतो आहेना?
निसर्ग-विचार करा जर सूर्य संपावर गेला तर,जर मानवाने सोडली तशी समुद्राने त्याची मर्यादा सोडली तर ,जर झाडांनी तुम्हाला फळ,भाज्या देणं बंद केलं तर .जर.
रवी-नको मला पुढच ऐकवणार नाही.नको,नको.रवी किंचाळून उठतो
त्याचे आई,बाबा धावत त्याच्या रूममध्ये येतात.
आई बाबा-काय झालं?
रवी काही न बोलता पेपरवर लिहितो,
निसर्गदेवता ,
आम्ही आजपासून तुझे रक्षण करण्यासाठी बांधील आहोत.तुला त्रास होणार नाही अशा मार्गानेच विकास काम करू.पण तू कृपया आमच्यावर रागवू नकोस.
तुझा मित्र,
संपूर्ण मानवजात
रवी-आई,बाबा मी ह्यावर सही केली आहे,तुम्ही पण करा.
बाबा-सही घेऊन काय करणार आहेस?
रवी-जमेल तितक्यांची सही घेणार.मुख्यमंत्र्यांना पाठवणार,सोशल मीडियावर व्हायरल करणार कारण मला निसर्गदेवताच मोल कळले आहे.त्याच्यासारखा अनमोल दाता कुणीच नाही.माझं त्याला त्रिवार वंदन
सौ स्वाती येवले
शब्दसंख्या -४९२


वाह ताई अप्रतिम
सुंदर कथा
संदेश देणारी लघुकथा