#माझ्यातलीमी
#वीकेंडटास्क
#कथालेखन
#विषय_आरश्यातील_जग
#निळी_किरणे
💙 निळी किरणे 💙
तनिषा खूप गोड मुलगी. १५- १६ वर्षाची. अभ्यासात खूप हुशार, तेवढीच कामं करण्यातही तरबेज. आपल्या आईला नेहमी कामात मदत करायची. घरची साफसफाई करायला तिला फार आवडायचं. फुलझाडं लावणे, त्यांची निगा राखणे तिचा छंदच. निसर्गाच्या सान्निध्यात राहणं तिला फार आवडायचं. पण मुंबई सारख्या शहरात कुठून मिळणार ती निसर्गाची संगत! त्यामुळे ती आपल्या घरातील कुंड्यामधेच आनंद शोधायची.
तनिषा चा मोठा भाऊ मोहित आणि तिचे आईवडील असं छोटंस कुटुंब.आई – वडील दोघेही डॉक्टर .. त्यामुळे तिची दहावीची परीक्षा संपली आणि घरी राहणं तिला कंटाळवाणं वाटू लागलं. मोहित इंजिनियरिंग च्या दुसऱ्या वर्षात होता त्यामुळे तोही घरी जास्त नसायचा. सुट्यांमध्ये तिच्या आईवडिलांनी तिचं मन रमावं आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकता याव्या म्हणून क्लासेस लावून दिलेले. पण त्यातही सकाळचा वेळ गेला की दिवसभर घरीच असायची. मैत्रिणीकडे, सिनेमा नाटक बघायला किंवा कुठे फिरायला जायचं म्हटलं तरी किती वेळा जाणार ..?? शेवटी एक दिवस सगळे रात्री जेवायला बसले असताना तिने म्हटलंच, “मम्मी, पप्पा मी खूप बोर होते हो घरी. दादा पण कॉलेज ला जातो. मला काहीतरी बदल हवा. दहावीचा निकाल लागायला अजून दोन महिने तरी आहेत. मी आजी कडे जावू का दोन महिने राहायला?”
“अगं, पण तुझे क्लासेस आहेत ना इथे? त्यात खंड पडला तर? आणि पुढच्या महिन्या पासून तुझे नीट चे क्लासेस पण सुरू होणार आहेत ना!”
“म्हणून तर म्हणते मी, आताच जाऊन येते. कारण त्या नंतर वेळ नाही मिळणार कुठे जायला. दोन महिने नाही पण पंधरा वीस दिवस तरी..”
“बरं ठीक आहे .. बघूया आपण ..”, बाबांनी समजावलं.
“बघूया नाही .. तुम्ही पक्क सांगा ..”
“पण तू एकटी जाणार कशी..?”
“मी आता मोठी झाले .. जाणार बरोबर .. तुम्ही मला फक्त बस मधे बसवून द्या. नाशिक ला पोहोचले की मामाला फोन करेल, तो येईल मला घ्यायला..”
तनिषा हट्टलाच पेटली .. आजीकडे जायचं .. गावी तिला आवडायचं .. निसर्ग प्रेमीच ना ती .. !!
नाशिक जवळ असलेल्या एका तालुकावजा गावी तिची आजी, म्हणजेच तिच्या आईचं माहेर होतं. नाशिक मुळात निसर्गरम्य परिसरात वसलेलं. जवळून वाहणारी गोदावरी नदी, निळेशार पात्र, त्र्यंबकेश्वराचं मंदिर, उंच उंच झाडं, सगळीकडे हिरवीगार वनराई, सारंच आकर्षक होतं.
बाबांनी बसमध्ये बसवून दिल्यावर त्यांना थोडी धाकधुकच होती .. तनिषा व्यवस्थिल पोहचेल की नाही याची, त्यामुळे तिला कळू न देता त्यांनी त्यांच्या एका सहकाऱ्याला सोबत पाठवलं होतं. सकाळी दहा वाजता ती नाशिक ला पोहचणार होती, त्यामुळे तिने थोडं आधीच मामाला बोलावून घेतलं. ती बस स्टॉप वर पोहचे पर्यंत तिचा मामा तिला घ्यायला आलेला. बसमधून उतरताच तिने मामाला मिठी मारली, आणि दोघेही गावी पोहचले. मामाचा तनिषा वर भारी जीव कारण त्याला दोन मुलंच होती. “घरी मुलगी असली की घर कसं भरल्यासारखं वाटतं” असं तो नेहमी म्हणायचा.
आजीचं घर म्हणजेे एक वाडाच होता. खूप जुना होता. पण अत्याधुनिक सोयी मामाने करून घेतल्या होत्या. वाड्याच्या आत जायला मोठ्ठा दरवाजा होता. अंगणात मध्यभागी तुळशी वृंदावन. अंगणात अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुलझाडे. मोगरा, चमेली, गुलाब, शेवंती .. कितीतरी. एका बाजूला उंच उंच अशोकाची झाडे सरळ रांगेत उभी असल्यासारखी. शिवाय आंबा, निंबू, कडुलिंब या सारखी झाडेही होती. त्यामुळे तनिषा ला इथे फार आवडायचं.
वाड्यातील खोल्या पण खूप मोठ्या होत्या. अंगणाच्या सभोवती चारही बाजूंनी आता जायला मार्ग होते. आजीची खोली अंगणाच्या डाव्या बाजूला समोरच होती. तनिषा आत शिरताच धावतच आजीच्या खोलीत गेली. आजीला बिलगली, “आज्जी .. मी आले .. आता मी इथेच राहणार..”
“आली का माझी चिमणी .. रहा हो रहा.. पण तुझी ती आई कुठे राहू देते तुला.. तू म्हटलंस ना तेच खूप झालं..”
आजीच्या खोलीत कपाटाशेजारी एक गोलाकार नक्षीदार आरसा होता. तनिषा ला हा आरसा खूप आवडायचा. त्याच्या भोवतीची ती नक्षी खूपच आकर्षक होती.
तनिषा जेव्हा जेव्हा या वाड्यात आलेली तिला तो आरसा खूपच आकर्षित करत असे. पण तिला आजी त्या आरशाला हातही लावू नाही द्यायची. ती सांगायची, “माझ्या माहेरची भेट आहे हा आरसा. तू लहान आहेस, तुझ्या हाताने पडला, काही झालं तर माझी ही माहेरची राहिलेली एकच भेट .. तीही राहणार नाही. त्यामुळे त्यात बघायचं असेल तर बघ पण जास्त वेळ त्यासमोर थांबायचं नाही आणि हात तर अजिबातच लावायचा नाही.” ज्या गोष्टीसाठी मनाई केली जाते त्याची प्रबळ इच्छा मनात निर्माण होते. मानवी स्वभावच .. आणि लहान मुलांना तर जास्तच.. तनिषा ने बरेचदा आजीची नजर चुकवून त्या आरशाला हात लावण्याचा प्रयत्न केला, पण त्या पूर्वीच ती पकडल्या जायची. त्या वेळी ती लहानही होती. पण आता तसं नव्हतं.
“आता काही मी खूप लहान नाही, या वेळी मी नक्कीच आरशाला हात लावणार..” असा तिने निश्चय केला. आजीनेही ती आता मोठी झाली, समंजस आहे म्हणून मुद्दामच तिला आरशाला हात लावण्याची मनाई नव्हती केली. पण तरीही तनिषा च्या मनात धाकधूक असल्याने आजी घरी नसताना तीने हा पराक्रम करायचे ठरवले.
दुपारची वेळ होती. आजी तिच्या भजन मंडळात गेलेली. उन्हाळ्याचे दिवस म्हणून मामी दुपारची झोप घेत पडली होती. मामीची मुलं शाळेत गेलेली. तनिषा हळूच आजीच्या खोलीत आली. आरशासमोर उभी राहिली. स्वतःला नीट निरखून बघू लागली. केस मोकळे सोडले. थोडा मेकअप केला. लिपस्टिक लावली. त्या नक्षीदार आरशात ती अजूनच उठून दिसत होती. आता हळूच तिने आरशाला हाताचा पंजा लावला. प्रतिबिंबीत पंजा आणि तिच्या हाताचा पंजा एकरूप झाले. आरसा थरारला. त्यात काचेच्या लहरी उठल्या, असं वाटलं की पाण्याच्या पृष्ठभागावर जश्या लहरी उमटतात तश्या लहरी उमटल्या, आणि चमचमता निळसर प्रकाश बाहेर पडताना दिसला, आणि तिला जाणवलं की तिचा हात आतून ओढल्या जात आहे. तिने हात सोडविण्याचा विफल प्रयत्न केला. ती आत ओढल्या गेली. भीती आणि कुतुहल वाटू लागलं. आणि क्षणार्धात ती एका विलक्षण अशा नवीन जगात पोहचली होती. आरश्याच्या जगात.
हे जग वेगळेच होते. अद्भुततेने नटलेले. अवास्तव, आभासी जग .. पण खूप आकर्षक होते. सगळीकडे निळसर प्रकाश पसरला होता. हवेत मोहक असा मंद मंद सुगंध वातावरण आल्हादित करत होता. जाई, जुई, चमेली, मोगरा, लिली सर्व सुवासिक फुलांच सुवास सगळीकडे दरवडत आहे असे वाटत होते. झाडांची पानं पिवळसर आणि पारदर्शक होती. वेलींवर हिरव्या, निळ्या, काळया आणि करड्या रंगाची फुले होती. काही फुले विविध रंगी होती.
झाडांवर लागलेली फळे विविध आकारांची होती. बदामी (heart shape), चौकोनी, प्रश्नार्थक चिन्हांची, तबकडीच्या आकाराची अशी फळे बघून तनिषा विलक्षण आनंदली.
या जगातील पक्षी आणि प्राणी माणसाप्रमाणे बोलत होते. विविधरंगी पक्षी झाडांवर बसून मधुर गीत गात होते. सश्याचा रंग गुलाबी, लाल रंगाची खारुताई, हिरव्या रंगाची मांजर, पिवळ्या रंगाची गाय, कुत्र्याचं शेपूट सरळ, पक्षांना चार पाय, गुलाबी आणि पिवळ्या रंगाची
छटेचा पिसारा असलेला मोर ..!! नारिंगी साळुंकी झाडावरुन उडताच तनिषा पुढे पंख फडकवत आला आणि म्हणाला, “ये, तनिषा .. आमच्या आरशाच्या जगात तुझे त्रिवार स्वागत आहे. तू आमची पाहुणी आहेस .. ये..”
“आरशाच्या जगात ..!” आश्चर्याने तनिषा उद्गारली. सगळीकडे तिची नजर भिरभिरत होती. त्या बागेच्या एका बाजूला असलेल्या तलावाकडे तिचे लक्ष गेले. तलावाचे पाणी गुलाबी होते. तलावात कमळे फुलली होती. प्रत्येक कमळावर दीप प्रज्वलित केले होते. पण त्या दीपातील प्रकाश हा निळसर होता. सगळीकडे असणारा हा निळसर प्रकाश बघून तनिषाला फार आश्चर्य वाटत होते. तलावात छोटे छोटे मासे विहार करत होते. तिथेच तिला एक मत्स्यकन्या दिसली.
तनिषा आता थोडी सावरली. तिला जाणवलं आपण एका वेगळ्या जगात आलोय. पण हे काय आहे..!! हे जग तर आमच्या सारखंच आहे. म्हणजे झाडं, फुलं, प्राणी, तलाव, प्रकाश .. पण रंग मात्र वेगळे आहेत. इथले प्राणी आणि पक्षी बोलतात .. पण इथे मानव जातच नाही. आणि इथे निळा प्रकाश का…?? सगळ्या गोष्टी आमच्या जगातल्या असल्या तरी त्यांचे रंग वेगळे कसे.. आणि मी इथे खरच आरश्यातून आले का ..?? इतर कुणापेक्षा तिला ती मत्स्यकन्या आपल्यातली वाटली. ती तलावाजवळ गेली.
” ये तनिषा .. कस वाटलं तुला आमचं हे आरशाचं जग.. प्रतिबिंब नगर?” मात्यकन्येने तिला जवळ येताच विचारले.
“मी अजूनही गोंधळले आहे. मला तर काहीच कळत नाही आहे. मी इथे कशी आले? आणि हे जग आमच्या जगासारखंच आहे .. पण इथले प्राणी बोलतात, रंग तर फारच विचित्र आहेत पण लोभसवाणे आहेत. हे सारं काय आहे? मला जाणून घ्यायचं आहे. तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकता का?!”
“हे आरशाच्या पलीकडचं प्रतिबिंबित जग आहे. आभासी जग. तू तुझ्या आजीच्या जादूच्या आरश्यातून इथे आलीस. आधी आमचं जगही तुमच्या जगाप्रमाणेच होतं. पण आता तुमच्या मुळेच हे जग, इथले रंग बदलले आहेत. दिसायला सुंदर वाटत असले तरीही आमच्यासाठी तो एक शाप आहे. यातून सुटण्यासाठी आमचा राजा प्रयत्न करतोय .. पण त्यासाठी आम्हाला एका मानवाची गरज आहे. इतकी वर्ष आम्ही या जगात कुणी मानव येण्याची वाट बघतोय. आता तू आल्यानेे आम्ही शापातून मुक्त होऊ शकतो.”
तनिषा : तुमचा राजा! कोण आहे? कुठे राहतो? आणि मी कशी मदत करणार..?
मत्सकन्या : ते सगळं तुला आमचा राजा प्रतिबिंब राजा सांगतील. त्याचं आरशाच्या जादूवर राज्य आहे. आरश्यातून जो प्रकाश येतो तोच आमच्या राज्याच मुख्य ऊर्जास्त्रोत आहे. पण आता सारंच बदललंय. महाराज तुला सगळं सांगतील
तनिषा : पण मी त्यांना कुठे आणि कशी भेटणार?
मत्स्यकन्या : मी नेते तुला त्यांच्याकडे. इथे तलावाच्या आत त्यांचा राजवाडा आहे.
तनिषा : मला तर पोहता येत नाही. मी कशी येणार तलावाच्या आत.!?
मत्सकन्या : त्याची काळजी तू नको करुस.
असे म्हणून मात्यकंनेने एक मोती तनिषाच्या हातात देऊन सांगितले की मोती तोंडास ठेवून तलावात उडी घे. तनिषा ने तसेच केले.
ती आता एका भव्य राजवाड्यासमोर उभी होती. हिरव्या आणि सोनेरी फुलांनी राजवाडा सजवला होता. राजवाड्यावर मंदिरासारखा कळस होता. नक्षीदार भला मोठा दरवाजा होता. दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दोन गज सोंडेत सनई पकडून तान छेडत होते. दरवाज्यावर माणसांच्या छायाचित्रांचे तोरण लावले होते. दोन जलपऱ्या अत्तरदानीतून अत्तराचा छिडकाव तिच्यावर करू लागल्या. आणि म्हणाल्या, “तनिषा कुमारीच आमच्या आरशाच्या जगात प्रतिबीब राज्यात स्वागत आहे.” आणि तनिषा सोबत एका सेवकाला म्हणजेच डॉल्फिन ला राजाकडे घेऊन जायला सांगितलं.
तनिषाने राजाच्या दालनात प्रवेश केला. यांचा राजा कसा दिसत असेल, तो कोणता प्राणी असेल, पक्षी असेल की आमच्यासारखा माणूस.. याची उत्सुकता तिला लागून होती. बघतेय तर राजा म्हणजे एक वेगळच रसायन होतं. त्याचं तोंड घोड्याचं, शरीर माणसाचं, हाताऐवजी पंख असलेलं आणि पाय म्हणजे मास्याचे.. मत्स्यकन्येप्रमाणे..!! आता भोवळ येईल की काय असे तिला वाटू लागले. पण तसे काही झाले नाही. राजाने तिचे यथायोग्य स्वागत केले. आणि तिचे प्रश्न विचारायला सांगितले.
राजा : बोल कन्ये.. तुला काय शंका आहेत? तुला इथे काही त्रास तर नाही ना?
तनिषा : नाही महाराज. मला हे जग खूप आवडले. पण इथला प्रकाश निळा का? इथल्या फळा फुलांचे, प्राण्याचे रंग असे वेगळे का, जसे आमच्याकडे असतात तसेच आहेत पण फक्त रंग बदललेले. आणि आमच्या जगात फक्त मानव प्राणीच बोलतो. इथे तर सगळेच बोलतात. हे कसे काय?
राजा : कन्ये.., हे प्रतिबीब नगर, आभासी नगर, इथे सगळं शक्य आहे . म्हणजेच सगळे बोलू शकतात. कारण हे आभासी जग आहे. ज्याला तुम्ही वर्चुअल रिॲलिटी ने तयार करता तसंच. हे जग देखील तुमच्या मुळेच तयार झालंय आणि इथले चमत्कारिक वाटणारे रंग ही तुमच्यामुळेच.”
तनिषा : ते कसे काय?
राजा : आरश्यातून जे किरण प्रतिवर्तीत होतात ते इथे येऊन हे जग तयार झालं. तुमचं प्रतिबिंब म्हणजेच प्रतिबिंब नगर. आधी आत येणारा प्रकाश हा फक्त शुद्ध पवित्र सूर्यप्रकाश असायचा.. त्यामुळे आमचं जगही तुमच्या जगासारखचं होतं. पण आता तुमच्या जगात टीव्ही, मोबाईल, संगणक, लेड लाईट इत्यादीचा जास्तीत जास्त वापर होतो. त्यातून निघणारी किरणं निळी असतात. दिवसा सूर्यप्रकाश येतो पण त्यातही ही निळी किरणं मिसळलेली असतात. आणि रात्री तर जास्त प्रमाणात निळा प्रकाश येतो. त्यामुळे इथल्या सगळ्या गोष्टींचे रंग बदललेत. आणि आता हे प्रमाण खूप वाढत चालले आहे त्यामुळे आता हळूहळू सगळं काळं होऊन जाणार. तेच होऊ नये याच्या प्रयत्नात आम्ही आहोत. पण तुमच्याशिवाय हे शक्य नाही.
तनिषा : तलावाच्या काठावर भेटलेल्या मत्स्यकन्येने पण असेच सांगितले. त्यासाठी मी तुमची काय मदत करू शकते सांगा. मी नक्की मदत करेन.
राजा : आमच्या राज्यात एका पर्वतावर निलपर्ण वनस्पती आहे. निळ्या रंगाची पाने आणि पारदर्शी फुले लागतात तिला. त्या फुलांचा रस काढून सगळीकडे शिंपडाला तर आणि तरच ही परिस्थिती आटोक्यात येऊ शकते.
तनिषा : पण महाराज.. यासाठी माझी गरज काय? तुम्हाला उपायही माहिती आहे आणि कसा करायचा तेही .. ते तर तुम्ही तुमच्या सेवकांकडूनही करू शकता.
राजा : ते शक्य नाही. कारण ही फुले आम्ही तोडू शकत नाही. ती फक्त मानवच तोडू शकतो. आणि त्या वृक्षाची देखभाल सुद्धा मानवच करतो. आमच्या राज्यात फक्त त्या टॉवर पर्वतावरच मानव राहतो. त्यामुळे तिथून फुले आणण्याचे काम जर तू केलेस तरी खूप उपकार होतील.
तनिषा : पण मी तिथे जाणार कसे?”
राजा : त्याची काळजी नसावी. आमचा गरुडराजा तुला त्या पर्वतावर नेऊन सोडेल आणि फुलं तोडून झाली की घेऊनही येईल.
तनिषा : आणि तिथल्या माणसांनी मला फुलं तोडू नाही दिली तर?!
राजा : तिथे तू सकाळच्या प्रहरी जा. त्या वेळी मानव जात झोपेत असते. आणि मी तुला एक मोती देईन फुले तोडताना तू तो मोती तोंडांत ठेव. म्हणजे जर कुणी मानव जागा झाला तरीही तू त्याला दिसणार नाहीस.
तनिषा : पण महाराज तरीही प्रश्न आहेच. असे केल्याने ही अडचण तात्पुरतीच संपेल ना. कारण आमच्याकडे मोबाईल, टीव्ही.. तुम्ही म्हणाल्या प्रमाणे निळ्या किरणांचे उत्सर्जन तर होतंच राहणार. त्यामुळे काही वर्षानंतर पुन्हा हा प्रॉब्लेम उद्भवेलच ना.
राजा : तीही चिंता आहेच. पण आता तुला हे कळलं. त्यामुळे तू तुझ्या जगात परत गेल्यावर साऱ्यांना.. किंवा जमेल तेवढ्या जास्त लोकांना हे समजावून सांग. रात्रीचा मोबाईल, टीव्ही चा वापर कमी केला तर बऱ्याच प्रमाणात फायदा होईल. कारण दिवसा सूर्याचाही प्रकाश असतो त्यामुळे निळ्या प्रकाशाची तीव्रता कमी होते.
राजाने सांगितल्या प्रमाणे तसंच तनिषा ने केलं. सगळीकडे पारदर्शी फुलांचा रस फवारण्यात येत होता. आरश्यातील जग बदलत होतं.
“तनिषा… ए तनिषा … उठ … आजीकडे जायचं आहे ना आज .. ”
खडबडून तनिषा जागी झाली. मोबाईल बघितला. लगेच ठेवून दिला .. “अरे बापरे .. आठ वाजले .. हे सगळं स्वप्न होतं तर.. !! मी अजून आजीकडे जायचेच आहे. पण तसा आरसा तर आहे आजीकडे. आणि ते आरश्याचं जग ..!!?? असेल का खरंच .. असेल किंवा नसेलही. पण त्या राजाने किती छान संदेश दिला. खरं आहे .. मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर च्या वापराने खरच निळी किरणं निघतात आणि ते खूप अपायकारक असतात. आमच्या शाळेतही योगा क्लास घ्यायला आलेल्या सरांनी तेच सांगितलं. आतापासून मोबाईल चा वापर कमी .. आणि रात्री अजिबात बंद. घरी, मोहितला आणि सगळ्या मैत्रिणींना हेच सांगणार.
©️®️ मनिषा चंद्रिकापुरे (१३/९/२५)


Nice.
सुंदर… च 👌👌
सुरेख कथा
खूपच छान कथा
खूप छान msg कथेमधून
Thank u
Thanks
Thank you
Thank you tai
Thank you
छान कल्पना
Thank u