माझ्यातलीमी#नाती_जपलीतरी_आपली_कधीच_होत_नाहीत
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
भाड्याचे घर आणि सत्संग
——————————–
जन्माने मिळालेले शरीर
हेही समजावे भाड्याचे घर
तसंही मालकीचं घर
हाही क्षणभंगुर नश्वर पसारा
एवढे मौलिक विचार
प्रवर्चन रंगात सारं
पण ध्यान नव्हतं पुरं
डोक्यात सुनेचं भांडण सारं
कानात इकडून तिकडं नुसतंच वारं
ना समजलं अध्यात्म ना व्यवहार
किती तगादा पतीमागे जन्मभर
हवं होतं मालकीचं ते घर
जीवनात कितिक येती स्थानकं
बदली शिक्षण प्रवासाची तिकीटं
वास्तव्य अस्थायी तात्पुरती
पूर्वसंचित नि योगायोग सारी नाती
नाती सारीच कामापुरती मतलबाची
करारही कधी फसवे भाड्याचे मालकीचेही
अलिप्त रहाण्याची स्थितप्रज्ञ रहाण्याची
शिकवण व्यवहाराची न् अध्यात्माची
अपेक्षापूर्ती हाच असतो मोबदला
कर्म कर्तव्य हाती असे ना निश्चिती कर्मफळाची
अपेक्षाभंग होतो कधी पडतो काळाचा घाला
कितीतरी घटक नात्यांची नियती ठरायला
हक्क नका सांगू कशावरतीच
ऐकताना भांडायच्या मुद्द्यांची उजळणी
रोजचाच सवाल खडा घरच्यांचा
सत्संगात काहीच पडले नाही का कानी
नाती जपली मनापासून किती
तरी ना जिव्हाळा अनुबंध टिकती
आता मनाची अवस्था तर विरक्ती
भाड्याची काय स्वतःची काय
घरे असोत वा सारी नाती
भाड्याची का स्वतःची घरं ते महत्वाचे नाही
भिंतीतनं नात्यांचा ओलावा झिरपायला हवा
घरांवर हक्क नाही तर घराचं घरपण महत्वाचे
नात्यांत लादणं नाही तर उत्तरदायित्व महत्वाचे
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
मोले घातले रडाया..रुदाली हेच सांगतात..जिवंतपणीच नाती तरल संवेदनशीलतेने जपा.
नाहीतर मेल्यानंतर भाडं देऊन माणसं आणावी लागतात शोक प्रदर्शनाकरिता.

