#माझ्यातलीमी
#वीकेंडटास्क
#कथालेखन
#कथा
#लिव्ह_इन_रिलेशनशिप
#नाण्याची_दुसरी_बाजू
💚 नाण्याची दुसरी बाजू 💚
मैत्रिणींचा कट्टा जमला होता. महिन्यातून दोनदा हा डझनभर मध्यम वयीन महिलांचा संघ प्रत्येकीच्या घरी जमायचा. शाळेपासूनची घट्ट मैत्री, शिक्षण संपल्यानंतर बऱ्याच वर्षांनी या साऱ्याजणी फेसबुक च्या कृपेने परत एकत्रित आल्या. सगळ्यांची लग्न होऊन आता मुलांचेही शिक्षण संपायला आले होते. आतापर्यंत त्यांच्या गप्पागोष्टी फेसबुक वरच व्हायच्या, पण कालांतराने कळलं की सगळ्या नागपूरला आणि कुणी नागपूरच्या आसपासच राहतात. मग काय … चॅटिंग सुरू झालं .. गेट टुगेदर च ठरलं आणि त्यातच त्यांचा महिन्यातून दोन वेळा भेटण्याचा ठराव संमत झाला. यासाठी पुढाकार घेतला होता राखीने. राखी सगळ्यांची खूप जिवलग मैत्रीण असल्याने सगळ्यांना हा ठराव मान्य झाला. एखाद्या वेळी कुणी नसलं तरीही बाकीच्या मात्र नक्की एकत्र जमत असत.
तशाच आजही मीनाच्या घरी जमलेल्या. गप्पा – गोष्टी, मौजमस्ती, मस्करी, खेळ, फराळ सारंच सुरू होत. बैठक रंगली होती. तेवढ्यात पूजा म्हणाली “अगं, तुम्हाला कळलं का, आपल्या वर्गात ती मोनाली होती ना ..”
“हो, हो, तीच ना .. आखूड केस होते तिचे ..” अंजली बोलत होती, तेवढ्यात हर्षा म्हणाली..
“अगं, ती SBI ला PO आहे ना आता …”
अशा प्रकारे सगळ्याच तिच्याबद्दलची माहिती देत होत्या, पूजाला मात्र आपलं बोलणं पूर्ण करताच येत नव्हतं. शेवटी ती जोरात म्हणाली .. “अगं थांबा …आधी माझं ऐकून तर घ्या .. तुम्ही म्हणताय ना तीच .. मोनाली गट्टेकर. तिची लहान बहीण सोनाली म्हणे पुण्याला जॉब करते आणि आता कळलं की ती लिव्ह इन रिलेशनशिप मधे राहते आहे. मला तर बाई नवलच वाटलं हो! आतापर्यंत फक्त लिव्ह इन बद्दल ऐकलं होतं, पण आता प्रत्यक्ष आपल्या परिचित असलेली मुलगी या मार्गावर गेली .. काहीतरीच बाई आताच्या या मुलींचं. नाही म्हटलं तरी सोनाली आपल्यापेक्षा पाच सात वर्षांनीच लहान असेल. म्हणजे आपल्या पिढीचीच म्हणा ना! आणि हे तर या नव्या पिढीचे चोचले आहेत. आपली पिढी, आपली पिढी, संस्कारांची खाण म्हणतो आपण, पण आता काय काय ऐकायला येत.”
“अगं हो ना गं, आमच्या शेजारच्या सोसायटी मधे ही राहतात की लिव्ह इन मधे. आधी आम्हाला वाटलेलं नवरा बायको असतील. पण आता कळलं की ते लिव्ह इन राहताहेत.” अंजू बोलली.
आता सगळींनाच चांगला विषय मिळाला होता. सगळ्या जणी आपापले विचार व्यक्त करत होत्या. पण मधु मात्र फक्त ऐकून घेत होती.
राखी ने शेवटी तिला विचारलंच, “काय ग मधु? तू का शांत? तुला पटतं वाटत हे लिव्ह इन मधे राहणं?”
“अगं, आता हिला वाटत असेल, काय दुर्बुद्धी झाली आणि लग्न केलं. नुसता व्याप! लिव्ह इन मधे कसं, ना कुठली जबाबदारी, ना काही व्याप, ना कुणाची लुडबुड, ना आयुष्यभराची कमिटमेंट. नाही पटलं, जा निघून.. हवं ते करा, हवं तसं रहा, वाट्टेल तेव्हा, वाट्टेल तिथे जा, पूर्ण स्वातंत्र्य, आणि लग्नानंतर मिळणार सुख देखील. आयुष्य म्हणजे तरी काय .. आनंदाने जगता येणे .. आणि लिव्ह इन मधे ते सगळ मिळतच की ..” , मधु कडे तुच्छतेने बघत सीमा बोलली. तसंही मधु आणि सीमा च पटत नव्हतं आणि आता सीमा ला चांगलीच संधी मिळाली मधुवर तोंडसुख घेण्याचं.
मधु आता पर्यंत काही बोलत नव्हती सारं ऐकून घेत होती, याचा अर्थ तिला लिव्ह इन रिलेशनशिप मधे राहणं पटत होतं किंवा ती स्वतः सीमा ने म्हटल्या प्रमाणे विचार करत होती, असं अजिबात नव्हतं. तिला या बाबतीतले तिचे विचार सविस्तरपणे व्यक्त करायचे होते. त्यासाठीच ती सगळ्यांचे विचार ऐकत होती.
आता मात्र सीमाच्या बोलण्याने तिला आवेश चढला. “वाट्टेल ते बोलते आहेस सीमा तू! तू माझ्या बद्दल असा विचारच कसा करू शकतेस? मान्य आहे की आपलं बऱ्याच बाबतीत पटत नाही, म्हणून काय तू वाट्टेल ते बोलशील माझ्या बाबत…”
“मधु, अगं मधु, शांत हो. जाऊ दे, लक्ष नको देऊस तिच्याकडे. पण या बाबत तुझे काय विचार आहेत, तुला काय वाटतं, ते तरी सांग. तुझे विचार फार प्रांजळ असतात, तू सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करतेस, समंजसपणा तर तुझ्यात पुरेपूर भरलाय. तुझ्या जागी दुसरी कुणी असती तर असं सासर मिळालं म्हणून केव्हाच सोडून गेली असती. सांग ना, तुला काय वाटतं?”, पूजा म्हणाली.
आता मधु थोडी शांत झाली होती. मैत्रिणीच्या कौतुकाने तिला हुरूप आला. तिच्याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले.
मधु बोलत होती.. “आपण लिव्ह इन रिलेशनशिप ची फक्त एकच बाजू बघतो. पण प्रत्येक नवी गोष्ट कधी वाईट तर कधी चांगली असते. आता सोनालीचंच बघा ना. इतक छान शिक्षण घेतलं, मोठ्या पगाराची नोकरी लागली, स्वभावही चांगला आहे, कामधामाची आवड आहे, स्वयंपाकात तर सुगरणच! पण तिच्या नशिबात लग्नाचं सुख नव्हतंच म्हणा ना. शिक्षणाच्या दृष्टीने निदान तिच्या बरोबरीचा, स्वधर्मीय मुलगा तिला नाही मिळाला. आई वडील गेले, बहीण भाऊ आपापल्या संसारात रमलेत, सुखी आहेत. त्यांच्यात का आपण जाउन लुडबुड का करावी .. स्वतःचा स्वाभिमान असतोच की! एकट्याने जीवन जगणं .. विचार करून बघा .. शक्य आहे का? सगळ्या सुखसोयी असल्या तरी आपल्याला विचारणार, काळजी घेणार कुणीतरी हवंच. आणि लग्नाचं वय निघून गेल्यावर लग्न करण्यापेक्षा लिव्ह इन मधे राहण तिने स्वीकारलं. तिच्या या निर्णयाचं मला तरी कौतुकच वाटतं.”
“अगं, पण आजकालची मुलं बघ ना.. सर्रास लिव्ह इन मधे राहण स्वीकारतात. त्यांना कुठली जबाबदारी, कमिटमेंट नकोच असते. लग्नानंतर पटलं नाही तर घटस्फोट घेण्यापेक्षा लिव्ह इन मधे राहणं स्वीकारतात. म्हणजे नाही पटलं तर कुणाची कुणावर जबरदस्ती नसते. अशाने त्यांना जीवन जगण्याचा अनुभव कसा येईल. कौटुंबिक सुखदुःख कसे कळेल, जीवनातील चॅलेंजेस कसे फेस करता येतील. दुःख, टेन्शन, अडीअडचणी नसतील तर सुखाची महती देखील कळणार नाही, यावर काय म्हणशील आता?” अंजू बोलली.
“मी म्हटलं ना, प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे तोटेही असतातच. आताची मुलं असे जे निर्णय घेतात ते चुकीचंच आहे. जे तुझं म्हणणं आहे तेच मीही म्हणणे. या तरुण मुला मुलींनी असे निर्णय घेऊ नये. आणि त्यासाठी पालकांनी त्यांना लग्नाचे, जबाबदारीचे, कुटुंबाचे महत्त्व सुरुवातीपासूनच सांगायला हवे. नव्हे आई वडील जर कुटुंबामध्ये सुखा समाधानाने राहत असतील, कुटुंबात येणाऱ्या अडचणी मिळून मिसळून सोडवत असतील, मुलांशी देखील सुसंवाद साधत असतील तर ही तरुण पिढी असा विचार करणारच नाही. पण सोनालीच्या बाबतीत मात्र हा निर्णय योग्य आहे. यापुढे जाऊन मला असाही वाटतं, कुणाचा जोडीदार जग सोडून गेला असेल, मुलं, मुली परदेशी असतील तर त्यांनीही एकटं न राहत लिव्ह इन चा विचार करावा.”
आता मात्र सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. “वा मधु! किती छान समजावून सांगितलस. पटलं आम्हाला, हो ना ग ..” सीमा म्हणाली. कधी नव्हे ते सीमा ला आपलं पटलं याचा मधुला आनंद झाला.
आरोही म्हणाली, “माझ्या शेजारी ना, त्या रानडे काकू एकट्याच राहतात. नवरा जाऊन तीन वर्ष झाली. त्यांना एकच मुलगा, अमेरिकेला असतो. मुलगा वेळोवेळी पैसे पाठवतो, बिलं भरतो, मेडिकल चेक अप साठी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेऊन तेही वेळोवेळी करून घेतो. पण त्यांना मात्र एकटंच राहाव लागत ना. त्यांना काही दुखलं खुपलं तर केअरटेकर ही आहे. पण सुखदुःखाच्या गोष्टी करायला आपलं माणूस हवं ना. मी त्यांना आजच लिव्ह इन बद्दल सांगते.”
“चला.. आपल्या आजच्या या बैठकीतून काहीतरी चांगलं निघालं”, राखी म्हणाली.
“अरे बापरे सायंकाळ होत आली की ! गप्पांच्या ओघात कळलंच नाही. आमचे हे येतील आता”, मीना बोलली.
“हो ग हो .. आपलेही हे येतील आता .. चला निघूया ..” दोघी, तिघी एकाचवेळी बोलल्या. आणि एकमेकींना बाय करून आपापल्या घरी गेल्या.
©️®️ मनिषा चंद्रिकापुरे (१९/७/२५)
#माझ्यातलीमी
#कथालेखन

