नाट्यछटा.
” आनंदाने जगायचं असेल तर दोनच गोष्टी विसरा: इतरांसाठी काय चांगलं केलं आणि इतरांनी तुमच्याशी जे वाईट केलं.”
वरील वाक्याला धरून नाट्यछटा लेखन.
शीर्षक :- ” विसरण्याचा खेळ”.
पात्रे
माधव:- एक शांत पण मनातील विचारांनी अस्वस्थ असलेला.
गणेश:- माधव चा मित्र, सकारात्मक आणि समजूतदार.
स्थळ:- माधव चे घर, संध्याकाळची वेळ.
( माधव आपल्या जुन्या डायरीत काहीतरी लिहीत बसला आहे. चेहरा गंभीर दिसतोय. काहीतरी लिहितो तर काहीतरी लिहिलेलं खोडूनही टाकतो )
माधव:- (स्वागत)
आज तीन वर्षे झाली….. त्या गणपतला पैशाची गरज होती. मी माझ्या आयुष्याची पुंजी त्याला दिली पण तो पैसे द्यायलाच विसरला….. आणि ती राधा!. तिच्या मुलाच्या शिक्षणासाठी मदत केली पण आज ढूंकूनही पहात नाही.( त्यांनी डोळे मिटले, भूतकाळातील कटू आठवणी एका मागून एक त्याच्या डोळ्यासमोर येत होत्या) छे छे!. या गोष्टी तर मी विसरून शकत.
आनंदाने जगायचं असेल तर दोनच गोष्टी विसरा…. एक इतरांसाठी काय चांगलं केलं आणि दुसरी इतरांनी तुमच्याशी जे वाईट केलंय. हे वाक्य खरंतर पुस्तकातच छान शोभून दिसतं पण प्रत्यक्षात ते अशक्यच वाटतं!.
(त्याच वेळी गणेश एका ट्रेमध्ये दोन चहाचे कप घेऊन येतो तो नेहमीप्रमाणे हसतमुख असतो)
गणेश हसतो आणि म्हणतो,”अरे वा माधव! अजूनही त्याच वहित रमलेला दिसतोय. हे घे, खास आल्याचा चहा आणलाय तुझ्यासाठी तुला आवडतो तसाच.
(माधव चहाचा कप घेतो पण शांतच, अस्वस्थ दिसतो)
गणेश म्हणतो,” काय झालं? तू गेल्या काही दिवसापासून असाच उदास आणि हरवलेला दिसतोस. तुझा चेहरा सांगतोय तुझ्या मनात काहीतरी सुरू आहे….
माधव दीर्घ श्वास घेऊन म्हणतो,” गणेशा माझ्या मनातलं वादळ शांतच होत नाही. मी डायरीत माझ्या चांगल्या कामांची आणि माझ्यासोबत झालेल्या वाईट घटनांची नोंद करतोय पण हिशेब पूर्णच होत नाही. प्रत्येक वेळी मला वाईट अनुभवच आठवतात.
गणेश माधवच्या खांद्यावर हात ठेवतो, म्हणतो,” माधव, तू एकाच वेळी दोन्ही गोष्टींचे ओझे घेऊन फिरतोस. तू ज्यांना मदत केलीस, त्यांच्याकडून तुला काही अपेक्षा होत्या का रे?.
माधव (विचार करून म्हणतो) नाही….. पण त्यांनी थोडी तरी कृतज्ञता दाखवायला हवी होती ना?
गणेश म्हणतो,” कृतज्ञता म्हणजे एक भावना आहे. ती जबरदस्तीने मिळवता येत नाही. दुसऱ्याने कसं वागाव हे आपण सांगू शकत नाही. तू केलेल्या चांगल्या कामाचं फळ दुसऱ्यांनी द्यावे अशी अपेक्षा ठेवणे म्हणजेच त्या कामाचा, मदतीचा अपमान करण्यासारखंच. चांगले काम करून विसरून जावे. माफ करायला शिकावे. अन्यथा त्यांचा विचार करून तू तुझ्याच मनाला दुखावतो आहेस.
(गणेशच्या बोलण्याने माधवच्या चेहऱ्यावरील भाव हळूहळू बदलत गेले, मनातील आत्मिक समाधान चेहऱ्यावर झळकले)
माधवला खूप हलकं वाटतं, म्हणतो,” मित्रा, आज पासून मी माझ्या दोन्ही वह्या फाडून टाकतो आणि विसरण्याचा खेळ खेळणार आहे. तू मात्र आज मला आयुष्याचा एक महत्त्वाचा धडा शिकवला त्याबद्दल धन्यवाद!.
(दोघेही हसतात, पडदा पडतो.)
सौ. स्मिता अनिल बोंद्रे.
©®
