नव्हतं ते फक्त समाधान

IMG_20250804_134956.jpg

#माझ्यातलीमी#लघुकथा
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका

फक्त .. नव्हतं ते समाधान.
——————————-

मनाचे श्लोक,चाणक्य नीती , कितीतरी चांगले संग्रह गाठीशी .. चांगले संस्कार.

पण पाळायचे नियम अथवा तत्वं आणि मार्गदर्शक तत्त्वं एवढ्यावरच भागत नाही.कधीकधी अनपेक्षित परिस्थिती आकस्मिकरीत्या उद्भवते तेव्हा ठोकर बसतेच.

निर्णय घेताना कित्येकदा तत्वांशी तडजोड करावी लागते.
तसंही, वयोपरत्वे तुमची तत्वं काही स्वरूपात बदलती
असतात.

एखाद्या तयार गायकाला वाद्य मधेच चुकलं तरी काहीही
करून त्याच्याशी जुळतं घेत समेवर यावं लागतंच.
खाताना मिठाचा खडा दाताखाली यावा तसं जाणकार
ते पकडतातच.पण दर्दी असल्याने ते बरोब्बर सांभाळून घेतलं म्हणून दादही देतात.

त्याचंही तसंच झालं .. कितिक मैफली जलसे रंगले. भरपूर मेहनताना देत वादक.. ऋतूनुसार योग्य रागांची निवड, हरकती,पण तोचतोपणा.लोकांना सतत काही नवीन हवं असतं. हळूहळू कर्ज बाजारी झाला. सभागृहे मिळेनाशी झाली. वादक साथसंगत करायला तारखा देण्यात काचकूच करू लागले.प्रेयसी सोडून गेली.

ह्या झटक्यां मधून तो सावरलाही. पण आतनं मात्र चटके बसल्यासारखी अवस्था.

एवढ्या प्रदीर्घ तपस्येनंतर शास्त्रशुद्ध घडणीनंतर त्याला
जिवाच्या कराराने धाडसी प्रयोग करावा लागला..
मिक्स फ्यूजनचा..मुक्तछंदातली तरूणाईची कविता,
पाॅप म्युझिकची जोडी आणि शास्त्रीय व आधुनिक चाल मिसळत बडबडगीतासारखं सादरीकरण.

त्याला त्याच्या श्रद्धेला आस्थांना मुरड घालावी लागली.
गुरूने घातलेले गंडेदोरे हातात टोचतायत असं वाटायला लागलं.ती गुरुला दिलेली वचने,घराण्याची शैली जपण्याचा वारसा जपता न येणं,होणारी टीका असं चित्र असूनही तो दुराग्रह जपू शकला नाही.

अखेरपर्यंत तत्वांशी इमान राखण्याचं समाधान नाही मिळवू शकला.
तरी सुवर्णमध्य म्हणून त्यानं मिक्स फ्यूजनचा फायदा शास्त्रीय संगीत शिक्षणासाठी वळवत हेमासारखी संस्था चालू केली..पण विद्यार्थी तेवढे मिळेनात.म्हणून माधुरी सारखं ऑनलाईन टीचिंग चालू केलं. पण तरीही संख्या वाढेना.
शेवटी जाहिरात झळकलीच.. अनेक शैली आणि अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन ..एकाच प्लॅटफाॅर्मवरती..

मौलिक योगदान भरपूर पुरस्कार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरती ..पैसा, प्रसिद्धी सारं काही पायाशी लोळण घेत होतं.पत वाढली.
तरीही आंतरिक समाधान मात्र नव्हतं.
आत अपराधीपणाचे चटके जाळत होते.
असह्य होत होते पण ते अटळ होते.

कलेला आणि स्वतःला जगवायचं तर नव्या लाटेवर स्वार होताना मूळ तत्वं बाजूला पडली होती.किंबहुना सारली होती.
कारण परत झटके सहन झाले नसते.

तो हरवला होता.. या तडजोडीत.. रिमोट कंट्रोल अदृश्य हातांमध्ये देत..
त्याला वाटत होतं .. तो भिरकावला गेलाय फरफटत चाललाय हवेबरोबर.. पालापाचोळ्यासारखा.

©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका

दिलेले सूत्र..
—————
फक्त तत्त्वज्ञानाने आयुष्य जगता येत नाही.
त्यासाठी व्यावहारिक आयुष्यात झटके चटके
त्यासाठी खावे लागतात.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!