#नवी सुरुवात

inbound3093839696566095574.jpg

©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका
#एकनवीसुरुवात

आई ग !!
गूळ खोबरं चावून खाईन म्हणते.
तोंडाला चव आलीये. खावं वाटतंय.
डिंक लाडू कर ना या हिवाळ्यात खुराक म्हणून.

आई चकित झाली. वजन वाढेल म्हणून गोड न खाणारी लेक आज लाडू करायला सांगत होती .

आईचा जीव तो. आईनं सगळ्या पावडरी केल्या .
तळलेला डिंक,अळीव मेथ्या खारीक बदाम .
आणि फक्त थोडंच तूप वापरलं.

खाईल रोज दुधाबरोबर.मनानं घेईल साखर .
उगाच मन बदललं तर नको म्हणेल.
त्यापेक्षा बिनसाखरेचं मिश्रण बरं.

रात्री पर्स चेक केली. दवाखान्याची प्रिस्क्रीप्शन्स .
बिलं, औषधं..पण नाव तर तिचं नव्हतं.
सकाळी विचारलं. सारवासारव केल्यासारखे उत्तर मिळाले…कलीगचं इन्शुरन्स क्लेमचं काम आहे.

आईनं दम दिला .गोड बोलून पाहिलं.
आश्वासन देऊन पाहिलं-कुणाला सांगणार नाही.
शेवटी वडीलांना सांगेन दमही दिला.

पण ती काही बोलेना.
दवाखान्यात जाऊन विचारते बोलल्यावर
मात्र गळ्यात पडली.

आई ग !!
गेले तीन दिवस रडून झालंय. माझं चुकलं.

आईच्या काळजाचा ठोका चुकला.
ती मनात बोलली..माझं संस्कार करण्यात काय चुकलं ??

शेवटी काय !
शरीराचा हिस्सा कापून तर टाकता येत नाही.
तिच्या काळजाचा तुकडा तो.

बोलली -जे झाले ते झाले.बदलता येणार नाही.
ठेच लागली.आतातरी पावलं सांभाळून विचार पूर्वक टाक.
एवढं तरी वचन दे.परतपरत चूक करत राहणार नाही.

पुढं योग्य स्थळ मिळालं -सगळं सुरळीत.
पण तिलाच तिचं मन खात होतं.
गर्भहत्या !! मोठं पाप घडलंय आपल्या हातून.
याची शिक्षा काय मिळेल??
आणि दुर्दैवाने पहिलंच मिसकॅरेज झालं.

आणि ती मनानं खचल्यासारखी झाली.

पण आई म्हणत होती..वय गेलं नाही.
पूर्वी किती गर्भपात किती बाळंतपणं एकाच बाईची व्हायची.
मनाला लावून घेऊ नकोस.

आता ती पुन्हा गरोदर राहिली. गुंतागुंतीची केस म्हणून खूप काळजी घ्यावी लागली.वरचेवर चेकअप्स, वगैरे. मनातलं गिल्ट बाळावर‌ परिणाम करत असणारच.

आता तान्हं बाळ आयसीयू मध्ये जन्माला आल्याआल्या.
तिला खूप अपराधीपणाची भावना होती.

जिवानं जगायला सुरुवात करण्याआधी पहिल्या श्वासांनाच नळ्या शरीराभोवती गुंडाळाव्या टोचाव्या लागल्या होत्या.

जगण्यासाठी इवलासा जीव तडफडत होता.
डाॅक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते.
धडपड पळापळ.

तिचं अंतःकरण आक्रंदत होतं. मी चांगली आई नाही…
माझ्या पापाची शिक्षा बाळाला भोगावी लागतीये.

बी पी कमी झाले.तिची शुद्ध हरपली.

प्रत्येक कुंडली पत्रिका वरनं लिहून येते म्हणे.
अशावेळी माणूस दैववादी होतो.

आईनं देव पाण्यात ठेवले होते.लेकीला पस्तावा झाला.
तिला एक संधी दे.तिला या अपराधीपणाच्या ओझ्यातून मुक्त कर. लेकीची चूक पदरात घे.

देव मोठा दयाळू.
ती शुद्धीवर आली.

नर्सनं तिला बसतं केलं.बेडशीट दुधाने भिजलं होतं.
बाळाला पाजा.रडतंय केव्हाचं.

तिनं विचारलंसुद्धा नाही.मध्ये किती तास उलटले.

बाळाला पाहिलंही नाही.पटकन् जवळ घेतले.
छातीशी लावलं.

पिऊन झाल्यावर सिस्टरनं त्याला उभं धरलं जरा वेळ.

ढेकर काढला आणि ही तृप्त झाली.
बाळाला पाठमोरं डोळे भरून ती पहात राहिली.

ते झोपी गेलं. आता समोरनं ती त्याला
वेड्यासारखी एकटक पहात होती.

आई बोलली..
झोपलेल्या बाळाला एवढं असं पहात नसतं रहायचं.

दुष्ट स्वप्न संपलं होतं.
एक नवी सुरुवात झाली होती.

©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका

#एकनवीसुरुवात

एक नवी सुरुवात…. आयुष्यातील त्या क्षणावर उभी आहे, जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं… पण प्रत्यक्षात तिथूनच खरा प्रवास सुरू होतो. अपयश, दुःख किंवा तुटलेल्या नात्यांमधून बाहेर पडत माणूस स्वतःला नव्याने शोधतो. भूतकाळाच्या ओझ्याखाली न दबता तो आजचा क्षण स्वीकारतो. आणि तेव्हाच कळतं नवी सुरुवात म्हणजे परिस्थिती बदलणं नाही, तर स्वतःकडे पाहण्याची दृष्टी बदलणं.

error: Content is protected !!