#माझ्यातलीमी
#लघुकथाटास्क (२९.९.२५)
दिलेले वाक्य… स्त्रीशक्तीचा आदर फक्त नऊ दिवस नाही तर तिच्या भावनांची कदर आयुष्यभर झाली पाहिजे.
दुर्गा
एका छोट्याश्या गावची ती नुकतीच झालेली सरपंच..! म्हणजे नामधारीच..केवळ स्त्रियांसाठी राखीव जागा म्हणून..बाकी घरात आणि बाहेर सगळा कारभार तिच्या नवऱ्याच्याच हातात..!
आज नवरात्री निमित्त पक्षातर्फे गावातील बायकांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता त्याने..! शुभ्र पांढरी इस्त्रीची साडी नेसून, डोक्यावरून पदर घेऊन ती स्टेजवर जरा अवघडूनच बसली.
नवऱ्याने प्रथम जोरदार भाषण ठोकले..स्त्रीशक्ती..स्त्रिया कश्या शिकून स्वावलंबी होत आहेत..घराला-देशाला कश्या पुढे नेत आहेत.. त्यांचे रक्षण..सन्मान..आदर..जबाबदारी वगैरे वगैरे…
नंतर गावातल्या बायकांचा साडीचोळी देऊन सन्मानपूर्वक सत्कार झाला सरपंच बाईंच्या हस्ते..! आता तिला बायकांनी आग्रह करून बळेच दोन शब्द बोलायला उभे केले. तिने नवऱ्याकडे हळूच पाहिले. त्याने मानेने खूण केली.
ती भीत भीत उभी राहिली. म्हणाली, ” मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की हा असा स्त्रीशक्तीचा आदर फक्त नऊ दिवस नाही तर तिच्या भावनांची कदर आयुष्यभर झाली पाहिजे. घरात आणि बाहेर दोन्हीकडे तिला मानाने वागवले पाहिजे.”
तिने हळूच नवऱ्याकडे बघितले. तो क्षणभर चरकला…! तिच्या चेहेऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यांत दुर्गेचे तेज भासले त्याला…!!
शब्दसंख्या १५४
सौ. सुविद्या करमरकर
पुणे

वास्तववाद पंचायत सिरीज आठवली
Apratim
Very good👍
सुंदर कथा