#Story Katta
#दीर्घकथा
पुन्हा भेटशी नव्याने… भाग दोन
~अलका शिंदे
प्रिया समीरला टाळून निघून गेली. समीर जागेवरच उभा होता. त्याच्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं होतं. “ती अशी का वागली? ती मला
ओळखते की नाही?” त्याला काहीच कळत नव्हतं. थोड्या वेळाने त्याने स्वतःला सावरले आणि तो इतर मित्रांमध्ये मिसळला.
सगळेजण २५ वर्षांनी भेटल्याने खूप आनंदी होते.
प्रत्येकजण आपल्या आयुष्याबद्दल बोलत होता. कुणी डॉक्टर झालं होतं, कुणी इंजिनिअर तर कुणी यशस्वी व्यावसायिक. समीरही सगळ्यांशी बोलत होता. गप्पांच्या ओघात त्याच्या फॅमिलीबद्दल विचारणा झाली.
एक मित्र: “अरे समीर, तुझी बायको काय करते मुलं किती तुला?
समीर: माझी बायको बँकेत काम करते. दोन मुलीं आहेत मला.प्रिया सर्व ऐकत होती पण मनात हुरहूर होती ती वेगळीच. तिला कळत नव्हतं ती इतक्या दिवसांनी समीर ला भेटून आनंदी आहे की त्याची नजर सारखी तिच्याकडेच आहे याने दुःखी.
प्रियाही आता तिच्या मैत्रिणींसोबत तिच्या कुटुंबाबद्दल बोलत होती.
मैत्रीण: “प्रिया, तुझा नवरा काय करतो?”
प्रिया: “तो बँकेत कामाला आहे. खूप साधा आणि चांगला माणूस आहे.”
प्रियाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू होतं, पण समीरला तिच्या डोळ्यातली वेदना दिसत होती. तिला एका क्षणासाठीही शांत बसता येत नव्हतं. ती खूप अस्वस्थ वाटत होती. तिच्या मनात खूप काही असावं पण तिला ते व्यक्त करता येत नव्हतं.
जेवणाची वेळ झाली. सगळेजण एकत्र जेवणासाठी बसले. समीर आणि प्रिया वेगवेगळ्या टेबलांवर बसले होते, पण समीरची नजर सारखी प्रियावरच होती. ती जेवत असतानाही तिच्या चेहऱ्यावर एक चिंता दिसत होती. अचानक, तिचा फोन वाजला. तिने फोन हातात घेतला आणि ती पटकन जेवण सोडून बाहेर गेली.
समीरला काहीतरी नक्कीच गडबड आहे, याची खात्री पटली. तो हळूच तिच्या मागे गेला. हॉलच्या बाहेरच्या लॉनमध्ये ती फोनवर बोलत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं.
प्रिया: (थरथरत्या आवाजात) “हो, मी येतेय लवकर. तुम्ही प्लीज काळजी घ्या… मी पोहोचतेच.”
तिचा फोन कट झाला आणि तिने डोळे पुसले. समीरने जवळ जाऊन विचारले, “प्रिया, काय झालं? तू ठीक आहेस का?”
प्रियाने पटकन डोळे पुसले आणि त्याच्याकडे पाहिलं.
प्रिया: (हळूच) “काही नाही… फक्त एक फोन होता. मला आता जायला हवं.”
समीर: “प्रिया, मला कळतंय, काहीतरी त्रास आहे. तू अशी का वागतेयस?”अजून कार्यक्रम बाकी आहे, लगेच का जातीयेस.
प्रिया शांत राहिली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच वेदना दिसत होती.
समीर: “प्रिया, २५ वर्षांनी भेटलोय आपण. तुला माझ्यापासून असं का दूर राहावं वाटतंय?” माझं काही चुकलय का? की तु मुद्दाम मला टाळतेस.
प्रिया: “समीर… मी खूप मोठी चूक केलीये. मी इथे यायला नको होतं.”ती परत समीरला टाळून तिच्या मैत्रिणी जवळ जाते.
समीरला ती का रडतेय, हे समजत नव्हतं. तिच्या शब्दांमध्ये एक वेगळाच अर्थ दडलेला होता. तिला काहीतरी सांगायचं होतं, पण ती सांगत नव्हती. त्यांच्यामध्ये २५ वर्षांचं अंतर होतं, आणि ते आता फक्त मैलांत नाही, तर भावनिक दरीसारखं वाढत होतं.
सगळे मित्र मैत्रिणी कार्यक्रम एन्जॉय करत होते ती मात्र वर वर हसून बोलत होती पण मनात मात्र स्वतःशीच लढत होती.तिला समीरला सर्व सांगावेसे वाटत होते पण परत तिला रात्री नवऱ्याबरोबर झालेलं संभाषण आठवतं.
नवरा : ” हे बघ तुझ्या मैत्रिणीचा फोन आला म्हणून मी तुला पाठवत आहे, पण जास्त कोणाशी काही बोलू नको. घरातल्या गोष्टी बाहेर सांगू नकोस. तुला आपल्या घरचे नियम लक्षात आहेत ना? “आणि हो, कुणी काही विचारलं तरी, माझ्याबद्दल जास्त बोलू नकोस. कुणाशी जास्त जवळीक साधू नकोस.
प्रिया : ‘तुम्ही म्हणाल तसं मी लवकर परत येईन. कोणाला काहीच बोलणार नाही.’
अचानक प्रियाला श्वेताचा आवाज ऐकू येतो आणि ती भानावर येते.
श्वेता: प्रिया,”तुला किती वेळ झालं आवाज देतेय कुठे हरवलीस. तुला सगळे बोलवतायेत. आता फनी गेम्स चालू होतील चल जाऊयात.”
प्रिया श्वेताबरोबर परत कार्यक्रमाच्या ठिकाणी जाते.
पण समीरच्या मनात विचारांचं वादळ थांबत नव्हतं. प्रियाचा चेहरा त्याला काहीतरी सांगत होता. त्याने ठरवलं, काहीही झालं तरी ती अशी का वागतेय हे त्याला शोधून काढायचंच आहे. आज २५ वर्षांनी भेटल्यावरही ती त्याच्यापासून का पळतेय, याचं उत्तर त्याला मिळालंच पाहिजे.
काय असेल प्रियाच्या मनात कळेल का समीरला. त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्याला मिळतील का वाचा पुढील भागात….
~अलका शिंदे

