# माझ्यातली मी
# विकेंड टास्क १९/१२/२५
# लग्न म्हणजे सोशल स्टेटस शो
“दिवाळं काढणारे लग्न”
लग्न म्हणजे दोन जीवांचा मेळ. विवाहासाठी सुयोग्य वर/वधू निवडून जीवनभराचे नाते जोडून देतात.
सामान्यतः वर्ष २००० पूर्वी लग्न अशी व्हायची.
मुलानी पसंती दिली की,मुलीचा होकार मिळताच लग्नाची तयारी सुरू व्हायची.
घरात पोत्याने गहू,तांदूळ,डाळ येऊन पडायची.घरच्या आणि शेजारच्या चार बायका मिळून धान्य निवडायच्या.निवडताना नव-या मुलीची थट्टा मस्करी करत हसवत सहज धान्य निवडले जायचे.
त्यानंतर मुहूर्त पाहून लग्नासाठी पापड, कुर्डया, सांडगे,मोठाल्या मातीच्या चुली अंगणातच घातल्या जायच्या.हे सगळे शेजारणी हसत खेळत करायच्या.कुणी लग्नाचं रुखवत करण्यात मदत करायच्या.
चला आठ दिवसांवर लग्न आले,म्हणत पत्रिका छापून यायच्या अगदी साध्या कागदावर, कुलस्वामिनीला स्मरून, लग्न कुणाचं,कुणाशी,कुठे,केव्हा,मुहूर्त एवढंच पत्रिकेत असायचं. सगळ्यांना घरोघरी जाऊन पत्रिका आणि अक्षद दिली जायची आणि आमंत्रण सुद्धा अघळपघळ घरच्या सगळ्यांनी कुळाचार पासून ते मुलगी सासरी जाईपर्यंत इकडेच जेवायचं असं असायचं. अंगणातच साधा मांडव घालून तेथे बोहले बांधून लग्न असायचं.रोज स्वयंपाकाला आचारी असायचा आणि शेजारच्या महिला,मुली वाढायच्या.
आता तर लग्नाची एक पत्रिका दोनशे पाचशे रुपयांची असते.
टाटा,बिर्ला,अंबानी यांच्या पत्रिकेचे तर विचारूच नका,काही लाखांच्या तर पत्रिकाच असतात.कितीही भारी पत्रिका असू देत,लग्न झाल्यावर तिचा काहीच उपयोग नाही.समजा जपूनच ठेवली तरी कपाट आवरायला घेतलं की ती फेकलीच जाते.
हल्ली सुसज्ज कार्यालये आणि तेथे स्टेज असल्याने बोहले हा शब्द अलिकडच्या मुलांना माहिती पण नाही. दारात मांडव जरी घातला तरी त्याला सजावट इतकी असते की,मांडवच दोन लाखाचे असतात.
केटरर्स लोकं असल्याने जेवणात इतके पदार्थ ठेवतात की वऱ्हाडी मंडळींना काय खावे अन् काय सोडावे उमजत नाही पर्यायाने अन्नाची नासाडी होते ते वेगळेच.
केटरर्स चे बिल मात्र फुगलेले.
शिवाय लग्नाला जायचे म्हटले की पूर्वीची मंडळी ठेवणीतले कपडे इस्त्री करून घालत असत, पण आता इतरांकडे लग्न असले तरी आमच्या कडे खरेदी होते.
घरच्या महिलांना तर मागच्या कुणाच्या लग्नात घातलेली पैठणी/ शालू /दागिना आता नको वाटतो आणि मग नवी साडी नवाच दागिना खरेदी केला जातो.
प्री वेडिंग शूट मुळे लग्नानंतरच्या औत्सुक्याचे
विशेष वाटेनासे होते.
डेस्टिनेशन वेडिंग, इव्हेंट मॅनेजमेंट,हळदी सेलिब्रेशन, मेहंदी सेलिब्रेशन ही सगळी तरूणाईची आवड झालीय.
लग्न आयुष्यात एकदाच होतं म्हणून सगळ्या खर्चासाठी कर्ज काढलं जातं.
ज्यांच्याकडे लग्न आहे त्याचा बँक बॅलेंस खाली येतोच आहे पण भविष्याचे काय?
माझ्या लग्नात मी सगळ्या भारीच साड्या घेणार बाई आणि दागिने तर सगळे आवडीचे घेणार.असे म्हणणारी मुलगी पाहीली आणि त्या मुलीच्या स्वार्थी पणाचा खूप राग आला.लग्न एकदाच होतं हे सगळं जरी खरं असलं तरी त्या आईबाबांच्या भविष्याचा विचार नको का करायला.
हा खर्च,हा मोठेपणा,हा दिखावा हे सगळं कशासाठी, तर फोटोग्राफी साठीच. हल्ली दिखाऊपणा जास्त वाढलाय. ते फोटो व्हायरल करायचे, त्यावर लाईक्स मिळवायचे आणि मग काय…?
नाही ना उत्तर?
लग्न म्हटलं की थोडं बजेट बाहेर खर्च होतो हे खरं पण त्याचा भुर्दंड जर आपल्याच लोकांना सोसावा लागत असेल तर वधू आणि वराने नक्की विचार करावा.अगदी आवश्यक तेवढा खर्च करूनही लग्न करता येतं.
शेवटी लग्न म्हणजे दोन जीवांचा मिलाप,एक सुंदर अधिकृत नातं.दोघांनी एकमेकांना समजून घेत वैवाहिक आयुष्याची वाटचाल,सुखद सुंदर करावी एव्हढंच ना !!
दोन परिवाराची गाठ पण कुणाचं तरी दिवाळं निघावं हे अपेक्षित नाही.
©®स्वाती देशपांडे ( सुमन)
२०/१२/२५
