दरवळ आठवणींचा

#माझ्यातलीमी
#गणपतीविशेषटास्क
#दरवळआठवणींचा

“श्रावण मासी हर्ष मानसी” असा मनभावन श्रावण सुरू होतो आणि खऱ्या अर्थाने आपल्याकडे सणांची रेलचेल सुरू होते. श्रावण महिना संपल्या संपल्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होते. बाप्पाच्या आगमनाच्या कितीतरी दिवस आधीपासूनच सगळीकडे लगबग असते ती बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सजावट करण्याची. घरोघरी प्रत्येक घराची खासियत असलेले खाद्यपदार्थ बनवले जातात. बऱ्याच घरी बाहेरून खाद्यपदार्थ मागवले जातात. परंतु आजही काही गृहिणी बाप्पा वर्षातून एकदाच येतो म्हणून कितीही घाईगडबड असली तरी आवर्जून घरीच सारे पदार्थ तयार करतात. बाप्पाचे आगमन झालं की सारं वातावरण कसं मंगलमय होऊन जातं. बाप्पाचे अस्तित्व म्हणजे पावित्र्याचा वास! घरात दोन दिवस अगरबत्ती, चंदन, सुवासिक फुलं यांचा मिश्र दरवळ व्यापून राहतो.

गणपती बापाशी निगडीत अनेक आठवणी कायमच माझ्या मनात रुंजी घालत असतात. माझ्या लहानपणापासून आमच्या घरी दीड दिवस बाप्पा आमच्याकडे विराजमान असतात. पण ते दीड दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने आनंदाचा सोहळा असतो. घरी बाप्पा असल्यामुळे मोदक करायला खूप लवकर शिकले. आम्ही बहिणी, वहिनी सर्व जणी मोदक करायला बसतो. सर्व जणी हातानेच मोदक करतो. तयार साचा कधीच वापरत नाही. मग गंमत असते प्रत्येक जण जास्तीत जास्त कळ्यांचा मोदक करायचा प्रयत्न करते. गप्पांना अगदी ऊत आलेला असतो. “बघ माझा मोदक किती छान झालाय” असे एकमेकांना म्हणत मोदक कधी करून होतात ते कळतच नाही. अळुवड्या पण खूप केल्या जातात. गणपतीच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी नेवैद्यासाठी काय जेवण करायचं आधीच ठरलेले असते. पहिल्या दिवशी मोदक आणि
अळूवड्यांवर यथेच्छ ताव मारला जातो. दुसऱ्या दिवशी शीरा, पुऱ्या आणि माझी सगळ्यात आवडती बटाटा भजी असते. हो आणि एक गमतीशीर आठवण म्हणजे पंचामृत अथवा तीर्थ. आरती झाल्यावर उरलेले तीर्थ पिण्यासाठी माझा भाचा आणि भाची ह्यांच्यात चढाओढ असते.

गणपतीच्या पहिल्या दिवशी दरवर्षी हमखास येणारे आप्तेष्ट, पाहुणे येतात. तेव्हाही किती बोलू आणि किती नको असं होतं. एखाद्या वर्षी नेहमी येणारं कोणी आलं नाही की जीवाला हुरहूर लागून राहते. रात्री बाप्पाची मोठी आरती तालासुरात म्हटली जाते. एक तासभर आरती म्हणताना कोणीही थकत नाही. मध्ये मध्ये
बाप्पाकडे नजर जाते तेव्हा तो स्नेहाद्र नजरेने आपल्याकडे बघत असतो.

रात्री जागरणाची मजा काही औरच असते. पत्त्यांचा डाव, गाणी, धम्माल मस्ती चालते. मध्येच कोणी पेढे खातं, एखादी मोठी काकडी मीठ मसाला लावून खायला खूप मजा येते. जागरणानंतर दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी विसर्जनाची वेळ येईपर्यंत सर्वांमध्ये तोच उत्साह असतो. पण जसजशी विसर्जनाची वेळ जवळ येते सर्वांच्या चेहऱ्यावर आपलं खूप जवळचं कोणीतरी दूर जाणार आहे ही भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत असते. माझे डोळे तर पाणावलेलेच असतात. निरोपाच्या आरतीच्या वेळी सर्वांचा आवाजातील स्वर मंदावलेला असतो. बाप्पाला शिदोरी बांधून दिली जाते. रस्त्याने बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत , ” मार्गी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला”, “पंढरपुरात हिरवा मका, गुजनानाला विसरू नका” असा गजर सतत केला जातो. अतिशय जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप दिला जातो. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” असा गजर दशदिशांत गुंजत असतो. बाप्पाकडे पाहिल्यावर त्याची नजर पण खूप व्याकुळ भासते. बाप्पाच्या पाटावर ओली माती घेऊन सगळे घरी परततात. परतत असताना सारे जण शांत असतात. घरी आल्यावर एक आरती म्हटली जाते. त्यानंतर सुरू होतो प्रसाद वाटण्याचा कार्यक्रम. ह्यावेळी कातर झालेला स्वर, नजरेतले उदास भाव काही काळ दूर झालेले दिसतात. माझे वडील म्हणजेच अण्णा, मोठे भाऊजी देवापुढची फळं कापतात. हा मिश्र फळांचा प्रसाद आणि साखर मिश्रित नारळाचे छोटे तुकडे प्रसाद म्हणून वाटले जातात. त्या प्रसादाच्या लहान लहान पुड्या बांधून इतर शेजाऱ्यांना दिल्या जातात. माझी नजर मात्र खिळलेली असते ती हिरव्या रंगाच्या पपनसाकडे. आमच्याकडे किमान दोन तरी पपनस असतात. ते फोडून जेव्हा सुंदर गुलाबी रंगाचा नाजूक गर जेव्हा बाहेर येतो तेव्हा तिकडे बघतच रहावे असं वाटतं. या गरामध्ये थोडे मीठ, चवीपुरती साखर आणि थोडी काळीमिरी पूड मिसळून एकजीव केल्यावर जी भन्नाट चव लागते ती कितीतरी काळ जिभेवर रेंगाळत असते.

मनात अशा कितीतरी आठवणींचे गाठोडे बांधून वर्षभर त्यांचं पारायण करण्यातच धन्यता मानायची. अर्थात पुढच्या वर्षी बाप्पांचे आगमन होईपर्यंत त्या आपल्या मनातील निराशा दूर सारून, प्रसंगी आपल्याला धीर देऊन आपली जीवन नौका तरुन नेण्यास साहाय्य करतात. बाप्पावर असलेली नितांत श्रद्धा मनात कायम आहे. बाप्पा आम्हा सर्वांवर तुझी अखंड कृपादृष्टी राहू दे.

©️®️ सीमा गंगाधरे

17 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!