#माझ्यातलीमी
# ब्लॉगलेखनटास्क(५/१/२६)
#लघूकथा
#तो एक योगायोग
वाक्य -काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही
कॉन्सर्टला गर्दी होती.
आत जाता जाता दोघांची टक्कर झाली.
“इतकं ढकलायचं कशाला?”
“तुम्हीच नीट पाहत नव्हता!”बाचाबाची वाढली दोघे भांडू लागले. मित्रमैत्रिणींनी त्यांना वेगळं केलं आणि आत नेलं. योगायोग असा की तिकीटं शेजारीच होती. आधी नजरेतून राग उमटत होता, पण हळूहळू तो शांत झाला आणि ताल जुळू लागला.
“माफ करा,” ती हळूच कुजबुजली.
“मला पण,” तो म्हणत तिच्याकडे पाहात राहिला.
मोबाईल नंबर दिले-घेतले गेले. बोलणं वाढलं. ओळख झाली आणि ओळख हळूहळू जिव्हाळ्यात बदलली.
कॉफी, फिरणं, गप्पा सार्याने ओढ वाढत गेली. मनाशी एक नाजूक गाठ पडली.
एक दिवस त्यांनी ठरवलं;एकत्र पुढे जायचं.त्या क्षणी वाटलं, आयुष्य आपल्या बाजूने वळवू शकतो आपण !
पण काही गोष्टी फक्त मनाच्या इच्छेवर ठरत नाहीत. वेळ, जबाबदाऱ्या, परिस्थिती हळूहळू वाटेत आल्या. प्रेम होतं, पण टिकवण्यासाठी दोघेही कमी पडले.
ते वेगळे झाले. विरुद्ध वळण आलं आणि दोघे अनोळखी झाले.
आज ती एकटी, शांत बसते. कधी संगीत कानात वाजलं की त्या आठवणी हळूच उजळतात,तो धूसर आशय, ते मृदू स्मित. ती मनाशीच कबूल करते!प्रेमाचा अर्थ फक्त प्राप्ती नाही, तर अनुभवून जाण्याची एक मंद शपथ आहे.
खरंच, प्रेम आयुष्यभर मनात शांत, हिरवं आणि जिवंत राहते.
ती हळूच विचार करते;तो योगायोग फक्त क्षण होता की मन उगाचच तिथे अडखळतं? गोड हसू ओठांवर येतं. ती ते विचार शांतपणे बाजूला ठेवते. कारण जे मिळालं, ते आयुष्य बदलून टाकणार होतं आणि मनात चिरंतर राहणार आहे, असंच चिरतरुण. मनालाच हसून ती विचारते;प्रेम असंच असतं का? मिळालं तरी, नाही मिळालं तरी?
ती कबूल करते!प्रेमात अशी एक ताकद असते, जी आयुष्य व्यापून उरते. मग ते कोणतंही असो; प्रेम मिळालं तरी आणि नाही मिळालं तरी ते आयुष्य निश्चितच बदलतं.
तेव्हा ती ह्याच एका विचारावर येते!
काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात.
मिळाल्या तरीही
आणि नाही मिळाल्या तरी,
त्यात प्रेम अव्वल स्थानावर आहे नक्की!
©® मनगुंजन सीमा
सौ सीमा कुलकर्णी
शब्द संख्या २८६

