तेहतीस कोटी देव

inbound8880323231695498075.jpg

#माझ्यातलीमी
#ब्लॉगलेखनटास्क (२२/१२/२५)
©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका

लघुकथा तेहतीस कोटी देव

तो उपास करायचा.
सोमवार शिवासाठी मंगळवार गणेशाकरिता
गुरूवार देण्यासाठी शुक्रवार देवीसाठी
शनिवार शनीला भिऊन आणि मारुतीरायालाही विनवणी.

मरताना प्रभुनाम ओठावर यावे ,हे भजन ऐकताना
एक दिवस त्याला वाटलं की खरंच कुणाचं नाव येईल तेव्हा तोंडी??

धावपळीचा रोजचा दिनक्रम. विचार बाजूला पडला.
उपास नित्यनेमाने.
पण उपवास हरीसन्निध..त्याची मात्र उणीव.

कर्मकांड, व्रतवैकल्ये, उपासतापास यांत उपासना,चिंतन, ध्यानधारणा हे होतच नव्हते.

बारा लुगडी सदा उघडी तसं झालं. दात खीळ बसली.
नाव घेणं दूर पण आतनंही सैरभैर अस्वस्थ. प्रभुनामाऐवजी फक्त अतृप्त इच्छा रुंजी घालत होत्या, अपुरी कामे सतावत होती.

एकदाचं तोंड उघडलं,”जातो रे केशवा सांभाळ बरं”
धाकट्या लेकाचं नाव होतं ते.

खरंच, माणसाकडे पर्याय जास्त असले की
त्याला त्याच्यासाठी काय योग्य आहे
याचीही समज रहात नाही.

एकच आराध्य हवं आणि अक्षय नामस्मरण हरेक श्वासासह उस्फूर्तपणे सहज प्रकिया असावी.

शक्य असतं तर जन्म (तसाही अपुरा असतोच)
३३ कोटी देवांना आळवलं असतं.

माहीत आहे का जर कर्जासाठी इन्क्वायरी जरी
खूप ठिकाणी सिबेलवरती दिसली तर कुठेच कर्ज
मंजुरी होत नाही असं घडू शकते.

खूप पर्याय समोर ए. आय. ठेवणार आणि निकष, तुलना, प्राधान्यक्रम आदि फिल्टरदेखील लावणार .
पण,शेवटी निर्णय प्रक्रियेत मानवी मेंदू गोंधळ न उडता काम करेल तरच नैय्या मार्गी लागणार.

जर एखाद्या पुरुषाला पर्याय दिला.. रंभा,मेनका, तिलोत्तमा,उर्वशी सगळ्याच हजर.एक निवडायची तर
त्याचा गोंधळच. ययातिसारखं फिरून यौवन उसने मागायची वेळ येणार.
पण ,समजदार पुरुष अप्सरेसम कुठलेच शाप नसलेली पगार कमावणारी (आखूडशिंगी,दुभती गाय)बऱ्यापैकी सहचरी पाहील. नाहीतर १०० स्थळं पाहिली आणि मुंडावळी बांधायची राहिली असं होतं.बाशिंगबळ
संपून जातं.

खूप साऱ्या पदव्या. मनाला येतील तशा.
पण, स्पेशलायझेशन मास्टरी कशातच नाही तर
पोट भरू शकणार नाही.एक ना धड भाराभर चिंध्या
अशी अवस्था होईल.

मैं इधर जाऊ या उधर जाऊ ? शम्मी कपूरचं गाणं या निमित्ताने आठवलं ना.
तसंही हे फक्त फिल्मीच परवडतं.
तुमचा हॅम्लेट झाला की रंगभूमीवरही पराभवच.
तुमचा रणांगणावर अर्जुन झाला तर प्रत्येकासाठी कृष्ण
धावून येणार आणि थोडाच गीता सांगत बसणार??

मोजके पर्याय,तौलनिक अभ्यास आणि निर्णय हे शेवटी कौशल्यच आणि एकच पर्याय आणि एखाददुसरा बॅकअप यापलीकडे आयुष्य नाही.

©®सीए संगीता मेहता पुणे मधुमक्षिका

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!