#माझ्यातलीमी
#लघुकथालेखन
४/८/२५
तिमिरातून तेजाकडे
टाळ्यांचा कडकडाट ,राज्यस्तरीय महिला पुरस्कार घेण्यासाठी दुर्गा स्टेजवर गेली .. दुर्गाने सर्वांचे धन्यवाद मानून भाषणाला सुरवात केली ..
मला ह्या पुरस्काराबद्दल तुम्ही लायक समजलात त्याबद्दल मी तुमची आभारी आहे ..
एका अतिशय गरीब कुटुंबात माझा जन्म झाला . ताईचे कपडे ,पुस्तके वापरून ,चार घरकाम करून मोठी झाले . अठराव्या वर्षी लग्न झालं ,नवरा मिळाला दारूडा ..
एक दिवस , हिंमत केली, घर सोडून दुसऱ्या शहरात गेले .. देवीच्या देवळात आश्रय घेतला. पुजारी भला माणूस, आधी तत्वज्ञान दिलं , एकटी मुलगी , घर सोडू नये वगैरे पण नंतर मंदिर साफसफाईसाठी तिथेच ठेवलं, छोटी मोठी घरकामही घेतली ..
बरं चालू झालेलं पण
कोव्हिड सुरू झाला ,होती ती कामही गेली , सगळं बंद , पैसे होते ते ही संपले ..
वाटलं आत्महत्येशिवाय दुसरा मार्ग नाही ..
त्याच दिवशी एक पन्नास वर्षाचे गृहस्थ , मंदिरात रडत होते . त्याचं रडायचं कारण होत की कोविडमधे त्यांचा एकुलता एक तरुण मुलगा वारला , बायकोही काही वर्षांपूर्वी वारली , फक्त ते, त्याची म्हातारी आई इतकेच घरी ,त्यांच्या आईलाही कोविड झाला , काळजी घ्यायला कोणी नाही , घरची कामवाली सोडून गेली .. मी त्यांना विश्वास दिला की मी आजीची काळजी घेईल ,घरकाम करेल .. पोटातली भूक मला कोविडपेक्षा भयंकर होती .. आजी थोडेच दिवस जगल्या , मी मनापासून त्याचं सगळ केलेलं .आजी गेल्यावर काका म्हणाले , संकट समयी इतके ओळखीचे असूनही कोणी उपयोगी पडलं नाही , तुझी मदत मी कधीच विसरणार नाही . .
आधी मी फक्त त्याचं घरकाम करत होते ..पण जसा लॉकडाउन संपला त्यांनी त्यांचा शर्ट होलसेल व्यवसाय होता ,तिथे मला कामाला ठेवलं.. त्यांच्या मार्गदर्शनाने मी माझ्या पैशात लेडीज कपड्यांचा व्यवसाय सुरू केला .. काकांना हार्ट अटॅक आला ,मी त्यांची सेवा केली ,त्यांनी सांगितलं की माझं घर तुझं,तुला काय करायचं ते कर .. मी म्हटलं मला काही नको , माझ्यासारख्या गरजू ,निराधार मुलींना आपण इथे आश्रय देऊ ,काम देऊ.. मी त्यांच्या घराला मुलींचा आश्रम बनवला ..
पाच वर्षात , कितीतरी मुलींना आश्रय दिला , काम दिलं , जगण्याची उमेद दिली ..मी आयुष्यात खूप झटके,चटके खाल्ले त्यामुळे मला जितक्या निराधार मुलींची ताई बनून त्यांना मार्ग दाखवता येईल ते करायचं आहे ..तिमिरातून तेजाकडे माझं आयुष्य ज्या स्वर्गवासी काकांमुळे झालं , माझा आजचा पुरस्कार त्यांना अर्पण करते ..
सौ स्वाती येवले
शब्दसंख्या 350 टीप सोडून
टीप…
मुलींना पहिल्यापासूनच बाळकडू ,शिकवण ,तत्वज्ञान दिलं जात की दिल्या घरी सुखी रहा ..घराचा उंबरठा ओलांडू नकोस , पण घरातले चटके ,झटके खाण्यापेक्षा , बाहेरच्या जगात त्या हिमतीने,विश्वासाने सामोऱ्या गेल्या तर अनुभवाने , कष्टाने ,मेहनतीने त्याचं व्यवहार ज्ञान नक्कीच वाढू शकेल .अर्थातच झेप घेताना आयुष्यात नीतिमत्तेची कास कोणीच सोडू नये ..
दुर्गा हे त्यातलं उदाहरण आहे.

