#तान्हापोळा
शिंगे रंगविली बाशिंगे बांधली
चढविल्या झुली ऐनेदार
राजा परधान्या रतन दिवाणा
वजीर पठाण तो मस्त
किती छान कविता होती आपल्या लहानपणी. पोळ्याच्या बैलांचं सुंदर वर्णन कवितेत केलं होतं. किती छान बालपण होतं आपलं. जश्या सुंदर कविता होत्या तसं बालपण खूप मस्त होतं.
श्रावण महिना म्हणजे धमाल असायची. सणांची रेलचेल असायची त्यामुळे शाळेला भरपूर सुट्ट्या. सोमवारी अर्धा दिवस शाळा. आणि सारखं छान गोडाधोडाच जेवण..,..मस्त मजा असायची.
पोळ्याला तर बैलांची लोणी आणि हळद लाऊन मालिश करायची. बैलांची शिंगे रंगवून त्यांना रंगीबेरंगी गोंडे लावायचे आणि सुंदर सुंदर झुली पांघरून द्यायच्या. बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा घास भरवायचा. गोड धोड खायला मिळायचं म्हणून मजाच असायची.
दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा असायचा. त्यासाठी मुले लाकडी बैल आणायची. ते छानपैकी रंगवले जायचे. त्याला छान ताज्या फुलांचा हार आणि झिरमिळ्यांनी सजवायचे. सगळ्या मुलांना सजवलेले बैल घेऊन शाळेत बोलवायचे. तिथे मैदानात एक तोरण बांधलेले असायचे. मुले तोरणा मग बाजूला आपापले बैल घेऊन उभे राहायचे. सगळ्या बैलांची पूजा केली जायची सगळ्यांना भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि काकडीचा प्रसाद दिला जायचा. ज्यांचा बैल छान सजवला असेल त्यांना पहिला नंबर आणि बक्षीस दिले जायचे. मग शिट्टी वाजवली की मुले तोरण तोडून आपापले चाकाचे बैल ओढत जवळच्या मारुतीच्या मंदिरात पळत जायची. मारुतीचं दर्शन घेऊन मुले घरोघरी बैल घेऊन फिरायची. घरोघरी गेली की तिथे त्यांच्या बैलांची पूजा करून त्यांना चार आठ आहे आणि खाऊ दिला जायचा.
मोहल्ल्यात सगळीकडे फिरून पैसे गोळा करण्याची धूम असायची. सगळीकडे रस्त्या रस्त्यावर लहान मुले चाकाचे सुंदर सुंदर बैल घेऊन मिरवत मिरवत रात्री पर्यंत फिरायचे. खूप मज्जा करायची मुले. रात्री किती पैसे जमले ते मोजण्यात पण वेगळाच आनंद असायचा.
तान्हा पोळा झाला की बैल परत पुढच्या वर्षी पर्यंत जपून ठेवले जायचे. आणि मग गणपतीच्या तयारीला लागायचं. गणपतीची धमाल वेगळीच असायची. बालपणाचा काळ सुखाचा हेच खरं.
सौ. मंजुषा गारखेडकर ©®
