#माझ्यातलीमी
#विकएंडटास्क(१९/१२/२५)
#लग्नम्हणजेसोशलस्टेटसशो
@everyone
#शब्दांकन = ~अलका शिंदे
“स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धीदं
बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिंतामणीम् रांजणम् ॥
लेण्याद्री गिरिजात्मजं गणपतीं श्री क्षेत्र ओझरम् ।
देऊनि पदीं वंदनं वधूवरां कुर्वन्तु ते मंगलम् ॥ १ ॥
॥ शुभ मंगल सावधान!
#शुभ मंगल सावधान…
हे शब्द जरी कानी पडले तरी प्रत्येकाला आपले लग्न आठवते किंवा ज्यांचे लग्न झाले नाही त्यांच्या मनी लग्नाचे चित्र उभे राहते. #लग्न… हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहते ते नात्यांचे गोडवे गाणारे, साधेपणाने भरलेला आपुलकीने वाहणारा भावनांचा ओलावा..पण आजचे लग्न म्हणजे
लग्न: वाढते ओझे
पहिली मंगलाष्टके होती पवित्र तो क्षण
परंतु आज लग्नात, का भरते प्रदर्शन?
जुने सारे गेले,विसरले मायेचे ते बंध
आता लग्न म्हणजे, ‘स्टेटस सिम्बॉल’चे दर्शन..
हुंडा कायद्याने गेला पण रूप बदलले
तो ‘शानशौकी’,प्रतिष्ठेत लपून बसला,
सोने, गाडी, घर, झाली अपेक्षांची यादी
व्यवहार-आर्थिक नात्यांमध्ये हुंडा घुसला..
वधूपित्याचे स्वप्न चिंतेत विरले
मुलीचे लग्न करण्यास कर्ज काढले,
दिवसाच्या दिमाखासाठी आयुष्य पणाला,
समाजाच्या टोमण्याचे भय मनात वाढले…
’डेस्टिनेशन वेडिंग’, ‘प्री-वेडिंग शूट’चे सोहळे
लाखांच्या खर्चाने गरिबांचे मन पोळे,
सोन्याचे दर वाढले, तरी प्रदर्शन थाटे
दागिने कमी पडले, तर ‘पत’ कशी कळे?
लग्न म्हणजे ‘प्रदर्शनातून मिळालेली शाबासकी’ नव्हे,
हे दोन जीवांचे मिलन, संस्कारांचा ठेवा
वधू-वरांना ज्ञानाचे, प्रेमाचे धन द्या
अनावश्यक खर्च पंचपक्कवान कशास हवा..
नको ‘स्टेटस सिम्बॉल’ तो डामडौलाचा रोग
कष्टात कमावलेला पैसा भविष्यासाठी ठेवा,
सत्य, प्रेम, विश्वास नात्यांचा आशीर्वाद हवा
वधूपित्याला सन्मानाने आनंदाचा क्षण घेऊ द्यावा!
~अलका शिंदे
“केवळ शब्दांतून मांडलेलं हे वास्तव एखाद्याच्या आयुष्यात किती गंभीर वळण घेऊ शकतं, हे एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या संघर्षातून समजून घेणं गरजेचं आहे. ही व्यथा केवळ कागदावरची नाही, तर ती अनेक वधूपित्यांच्या उरात दडलेली आहे. अशाच एका स्वाभिमानी बापाची आणि प्रगल्भ विचारांच्या मुलीची ही कथा आहे…
#कथा तडजोड : एक स्वाभिमान
विश्रामरावांनी आपल्या जुन्या कपाटातून एक साधी डायरी काढली. त्यावर धुळीचा पातळ थर साचला होता. डायरी उघडताच समोर पानापानांवर मांडलेला हिशोब त्यांच्या डोळ्यांसमोर नाचू लागला. निवृत्तीनंतर मिळालेली सगळी पुंजी आणि आयुषभराची कमाई त्यांनी लेकीच्या, आर्याच्या लग्नासाठी बाजूला काढून ठेवली होती.
विश्रामराव एक मध्यमवर्गीय शिक्षक. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हीच त्यांची ओळख. पण आज काळ बदलला होता. आर्याचं लग्न ज्या घरात ठरलं होतं, ते श्रीमंत नव्हतं पण ‘प्रतिष्ठेचे’ भुकेलं कुटूंब नक्कीच होतं.
”बघा विश्रामराव, आम्हाला हुंडा नकोय. पण लग्न असं व्हावं की तालुक्यात चर्चा झाली पाहिजे. शेवटी आम्हांलाही समाजात मान-मर्यादा आहे,” होणाऱ्या व्याह्यांचे हे शब्द विश्रामरावांच्या कानात घुमत होते.
त्या एका दिवसाच्या ‘गोष्टीसाठी ‘ विश्रामरावांना आपली वडिलोपार्जित जमीन विकण्याची पाळी आली होती. आर्याला हे सगळं बघवत नव्हतं. एके संध्याकाळी ती बाबांच्या खोलीत आली. बाबा हिशोबांची जुळवाजुळव करताना डोक्याला हात लावून बसले होते.
”बाबा,” आर्याने हळूच हाक मारली.
विश्रामरावांनी चटकन डायरी मिटली आणि चेहऱ्यावर खोटं हसू आणलं, “काय झालं गं पोरी? तयारी कशी चाललीये? तो डिझायनर लहंगा पसंत पडला ना तुला?”
आर्या बाबांच्या पायापाशी बसली आणि त्यांचा हात हातात घेऊन म्हणाली, “बाबा, कशासाठी हा सगळा अट्टहास? त्या चार तासांच्या जेवणावळीसाठी तुम्ही तुमची आयुष्यभराची पुंजी आणि ती जमीन का विकताय? ज्या जमिनीवर तुम्ही मला चालायला शिकवलं, ती जमीन माझ्या लग्नाच्या खर्चासाठी विकली जावी? हे मला आयुष्यभर टोचत राहील बाबा.”
विश्रामरावांच्या डोळ्यात पाणी आलं. “अगं पण समाजाचं काय? लोकांनी नाव ठेवली तर?”
आर्या ठामपणे म्हणाली, “लोक जेवून गेल्यावर तृप्तीचा ढेकर देतील आणि दुसऱ्या दिवशी लग्नातल्या उणिवा काढतील. पण त्यानंतर उरलेलं कर्ज फेडताना तुमचं आयुष्य वाया जाईल. मला असा डामडौल नकोय. मला वैदिक आणि साध्या पद्धतीने लग्न करायचं आहे. आपण विधीपूर्वक लग्न करू, जवळच्या नातेवाईकांना बोलावू. आणि जो पैसा तुम्ही वाचवाल, तो माझ्या नावावर मुदत ठेव म्हणून ठेवा, जेणेकरून माझ्या भविष्यात कधी अडचण आली तर मला कोणाकडे हात पसरावे लागणार नाहीत. तोच माझा खरा हुंडा असेल.”
विश्रामरावांना आपल्या लेकीच्या विचारांचा अभिमान वाटला. त्यांनी केलेले संस्कार त्यांना प्रत्यक्षात समोर दिसत होते.त्यांनी व्याह्यांशी स्पष्ट बोलण्याचे धाडस दाखवले. सुरुवातीला थोड्या कुरबूरी झाल्या पण आर्याच्या ठाम निर्णयापुढे सर्वांना झुकावं लागलं.
लग्नाचा दिवस उजाडला. कोणताही बडेजाव नव्हता, ना महागडं डेस्टिनेशन, ना फटाक्यांची आतिषबाजी. एका साध्या मंगल कार्यालयात, वैदिक मंत्रांच्या घोषात आणि सात्विक भोजनाच्या पंक्तीत लग्न पार पडलं. येणारा प्रत्येक पाहुणा त्या वातावरणातील शांतता आणि आपुलकी पाहून तृप्त झाला होता.
समारंभ संपल्यावर विश्रामराव आर्याला निरोप देताना रडले नाहीत, उलट त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. त्यांनी आर्याच्या हातात एक पाकीट ठेवलं.
”हे काय बाबा?” आर्याने विचारलं.
“हे तुझ्या स्वाभिमानाचं फळ आहे आर्या. तू आज माझा ‘भार’ कमी केला नाहीस, तर माझा ‘मान’ वाढवला आहेस. वाचवलेल्या पैशांची ही पावती घे. तुझ्या संसाराची ही पहिली भक्कम पायाभरणी आहे.”
आर्याने बाबांच्या पायाला स्पर्श केला. बाबा मला काही नको होते पण तुमच्या तत्वाशी #तडजोड करताना होणारी घुसमट मला पाहवत नव्हती. तुम्ही पहिल्यापासून साधेपणात वागलात त्याच साधेपणात आयुष्यभर वागावं. तुम्ही कोणापुढे झुकू नये कोणत्याही तत्वाशी “तडजोड ” करू नये इतकंच माझं म्हणणं होतं. म्हणून मी साधेपणाचा हट्ट केला.
सर्व पाहुणेमंडळी आर्याचे विचार ऐकून टाळ्या वाजवत होते.व्याह्यांना आपल्या होणाऱ्या सुनेचा अभिमान वाटला.त्या दिवशी हुंडा दिला गेला नव्हता, पण एका बापाने आपल्या मुलीला ‘आत्मनिर्भरतेचा’ सर्वात मोठा संस्कार दिला होता.
तात्पर्य: लग्न म्हणजे प्रदर्शनाचा बाजार नव्हे, तर तो विश्वासाचा आणि समजुतीचा सोहळा असावा. कोणतीही तडजोड नसावी.
तुम्हाला काय वाटते? लग्नातील हा खर्च टाळून तो पैसा मुलांच्या भविष्यासाठी वापरणे योग्य आहे का नाही??? ~अलका शिंदे

