#माझ्यातलीमी
#वीकेंडटास्क (३१/१/२६)
#गोष्टदुसऱ्यालग्नाची
#डिप्रेशन
डिप्रेशन
बस आली.. गर्दीतून मार्ग काढत राधिका कशीबशी चढली.. एका पायाने अधू असल्यामुळे तिला ही धावपळ खूप जीवघेणी असायची. पण घरासाठी, आजारी वडिलांसाठी, लहान भावासाठी, आईच्या मदतीसाठी तिला रोज तारेवरची कसरत करत तुटपुंज्या पगाराची का होईना पण नौकरी करावी लागत होती. शिक्षण चांगलं असूनही तिच्या अपंगत्वामुळे ती मागे पडली होती.
“अरे, ए.. चला जागा द्या मॅडम ला.. सुशिक्षित नागरिक ना तुम्ही.. या मॅडम इथे बसा ..’ असं म्हणत एका तरुणाने तिला बस मधे बसायला जागा करून दिली.
“थँक यू..” म्हणत ती सावरून बसली.
मग हे रोजचच झालं.. तो तिला बसमध्ये रोज भेटू लागला .. बसायला जागा नाही मिळाली तर जागा करून देऊ लागला.. दोघांची ओळख वाढत गेली.. तिला भेटायला कधी कधी तिच्या ऑफिस ला जाऊ लागला.. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याने तिला लग्नाची मागणी घातली .. तिनेही होकार दिला .. एकच अटीवर .. की लग्नानंतरही ती तिच्या माहेरची काळजी घेईल.. त्याला काहीच प्रॉब्लेम नव्हता.
तिच्या आईवडिलांना एकाच गोष्टीची काळजी होती.. तिचं एका पायाने अधू असणं त्याच्या घरच्यांना चालेल का..!? पायाने अधू असली तरीही ती सगळ्या कामात तरबेज होती .. इतकंच की सामान्यांपेक्षा प्रत्येक काम करायला तिला थोडा जास्त वेळ लागायचा. आपल्याला आपल्या अपंगत्वासकट पियुष ने आपल्याला स्वीकारलं यातच तिला खूप समाधान होतं.
पियुष राधिकाच लग्न यथासांग पार पडलं. राधिका खुप खुश होती .. आणि अर्थातच पीयुष सुद्धा. आपल्या स्वप्नातील मुलगी आपली धर्मपत्नी झाली याचा बहुमोल आनंद होता. सगळे खुश होते. राधिका आपलं घर.. नौकरी.. संसार व्यवस्थित पार पडत होती. पियुषही तिला सगळ्या कामात मदत करायचा.
सगळ सुख समाधान घरी नांदत असताना सुखाला दृष्ट लागली. पियुष आणि राधिका समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले असताना आनंदाच्या भरात त्याने राधिकाला गोल गोल फिरवलं .. उंच उडी मारायला लावली .. तो हे विसरून गेला की ती एका पायाने अधू आहे. तिने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला पण तो वेगळ्याच धुंदीत होता. राधिका असहायपणे तळमळत होती.
त्या नंतर असे प्रसंग वारंवार घडू लागले. तो तिला खूप गृहीत धरू लागला. प्रत्येक गोष्ट वेळेवर आणि तडकाफडकी व्हावी अशी अवाजवी अपेक्षा करू लागला. तिचं काही चुकलं, वेळ लागला तर चिडचिड करू लागला.. राधिकाला कळतच नव्हतं .. हा असं का वागतोय. त्याच्या आई वडिलांनाही तिने विचारलं पण कुणी काही सांगतच नव्हते.
आपल्याच विवंचनेत ती असायची. असच एकदा तिने घराची साफसफाई काढली.. पियुष गावी गेला होता. त्यावेळी त्याचं कपाट आवरताना तिला त्यांच्या लग्नाचा जुना फोटो मिळाला.. त्याचं लग्न तर नुकतंच झालं होतं .. फार फार तर सहा महिने झाले असतील. मग हा जुना फोटो.. सहा सात वर्षापूर्वीचा वाटत होता. राधिकाला काहीच कळेना.. ही काय भानगड आहे.. घरी कुणी काही सांगायला तयार नाही. पियुष लाच कसं विचारायचं .. प्रश्नच होता ..
मग तिने त्याच्या मित्रांचे फोन नंबर शोधून काढले. समीर त्यांच्या लग्नालाही आला होता आणि मधे मधे घरी यायचा. राधिकाने त्याला बोलावून घेतलं. त्याच्यासमोर ते फोटो ठेवून आपली शपथ घालून सगळं सत्य शोधून काढलं.
फोटोतली ती .. अमिषा.. हुबेहुब राधिकासारखी .. जगात एकसारखी दिसणारी सात माणसं असतील तर या सात मधली ती एक असावी. आपल्यात आणि अमिषात असलेलं हे साम्य बघून राधिका चक्रावलीच .. सगळी माहिती तिला समीर कडून मिळाली.
अमिषाचं आणि पियूष च लग्न सहा वर्षापूर्वीच झालेलं. प्रेम विवाह.. पण एका वर्षाच्या आत अमिषा त्याला घटस्फोट देऊन निघून गेली .. परदेशी.. ती श्रीमंताघरची मुलगी असल्याने तिच्या स्वप्नांना पियुषच्या घरी काहीच वाव नव्हता .. घरची काम तिला येत नव्हती .. तिच्या छोट्या अपेक्षा पण पूर्ण करण्याची पियुषची कुवत नव्हती .. पण त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं.. तो धडपडत होताच पण अपेक्षित यश त्याला मिळत नव्हतं.. त्यामुळे वाद वाढत जाऊन गोष्टी घटस्फोटापर्यंत गेल्या. ती निघून गेल्यानंतर पियुष खूप डिप्रेशन मध्ये गेला. तिच्या आठवणीतून बाहेर पडता यावं म्हणून तिच्या सगळ्या आठवणी मिटवून टाकल्या. पण तो एकच फोटो कसा काय राहिला कोण जाणे.
“म्हणजे हे पियुष च दुसरं लग्न होतं तर.. !?” राधिकाने समीर ला विचारलं.
“हो..”
“मला फसवलं.. अंधारात ठेवलं..!”
“तसं नाही वहिनी.. तो तिला विसरला होता .. पण दुसऱ्या लग्नाला तयार नव्हता.. अश्यातच तुमच्याशी भेट झाली.. आणि सगळं घडत गेलं.. ”
“पण मला सांगितलं असतं .. माझ्या घरच्यांना सांगितलं असतं तरीही या गोष्टीवरून मी किंवा माझ्या आईबाबांनी नकार नसता दिला. माझी ही अशी अवस्था.. त्यात माझंही लग्नाचं वय उलटून जात होतं.. आणि माझंही पियूष वर प्रेम होतंच की..”
“होतं..!? म्हणजे आता हे कळल्यामुळे नाही का?”
“नाही. हो.. तसं नाही .. ” राधिका गोंधळली.
आता तिच्या सगळं लक्षात आलं.. पियुष राधिकाला अमिषाच समजतोय .. म्हणून तिच्याशी असं वागत असेल. तो अजूनही डिप्रेस्ड आहे. यावर उपाय शोधायला हवा. तिने आपल्या मैत्रिणीला विचारून एक मानसोपचार तज्ञांची भेट घेऊन सगळा प्रकार सांगितला.
पियुष गावावरून परत आल्यावर त्याच्या नकळत हळूहळू ट्रीटमेंट सुरू केली. नंतर तो थोडा नॉर्मल झाल्यावर डॉक्टर शी भेट करून त्याचे सेशन्स घेण्यात आले. आता सगळ्या प्रयत्नांना यश यायला लागलं. पियुषने अमिषाला विसरून राधिकाला राधिका म्हणूनच आपल्या दुसऱ्या पत्नीच्या रुपात स्वीकारलं.
®️©️ मनिषा चंद्रिकापुरे (३१/१/२६)

