ठकास महाठक

#माझ्यातलीमी
#विकेंडटास्क(२/१/२०२६)
#पुणेरीपाट्या
#विनोदीकथा
#ठकासमहाठक

पुणेरी पाटी : “आम्ही रस्त्यात मुक्काम करत नाही, कृपया हॉर्न वाजवू नये”

श्रीकांत बर्वे मूळचा पुण्याचाच परंतु नोकरी लागल्यानंतर दहा वर्ष परदेशात वास्तव्य करून पुन्हा पुण्यात परतला होता. त्याने त्याच्या “ऑडी” गाडीच्या मागे, “आम्ही रस्त्यात मुक्काम करत नाही, कृपया हॉर्न वाजवू नये” हे अगदी सुंदर रंगीत हस्ताक्षरात लिहून ठेवलं होतं. आता परदेशामध्ये पाट्या वाचून लोक वागत असतील तसे. पण इथे पुण्याला लोक बऱ्याच प्रकारच्या पाट्या लावत असतात. त्या पाट्या वाचून त्यांना तसे इरसाल नमुने सुद्धा भेटतात.

असंच एकदा श्रीकांत बर्वेने आपली गाडी कामानिमित्त पुण्यामध्ये जास्त वर्दळ असलेल्या रस्त्यावर काढली होती. त्याच्या गाडीच्या मागे चार तरुण मुलं असलेली एक गाडी येत होती. त्या गाडीमध्ये अनिल, निलेश, रमेश आणि सुजय असे चार मित्र बसले होते. अनिल गाडी चालवत होता आणि निलेश त्याच्या बाजूच्या सीटवर बसला होता. त्याने पुढच्या गाडीवर ही नमुनेदार पाटी वाचली आणि त्याने त्याच्या मित्राला दाखवली. मागे बसलेले दोघं सुजय आणि रमेश सुद्धा पुढे झुकून त्यांनी ती पाटी वाचली. अनिल म्हणाला,

“चला रे आता आपण याला सोडत नसतो. आज आपण त्याला पार्टी काढायलाच लावूया.”

अनिलने लेन तोडून कोणी मध्ये घुसू नये म्हणून त्यांच्या गाडीच्या अगदी जवळूनच तो गाडी चालवत होता. पहिल्या सिग्नलला गाडी थांबल्यावर सिग्नल सुरू झाला आणि लगेचच अनिल जोरजोरात हॉर्न वाजवायला लागला. श्रीकांतने रागाने आरशातून मागच्या गाडीकडे पाहिले तेव्हा अर्थात तो काही बोलला नाही. दुसऱ्या सिग्नलला परत तेच झालं. श्रीकांतने गाडी थांबवली. त्याच्यामागे अनिलने पण गाडी थांबवली. श्रीकांत उतरून त्यांच्याकडे आला आणि तावातावाने म्हणाला,

“सिग्नल सुरू झालेला मला सुद्धा कळतो इतक्या जोरजोरात हॉर्न कशाला वाजवता.”

“अहो तुम्ही गाडी उचलायला इतका वेळ लावल्यावर मागच्या गाडीवाले हॉर्न वाजवतात मग मी हॉर्न वाजवणारच. इथे कुणाला रेंगाळत बसायला वेळ नसतो.”

“पुन्हा हॉर्न वाजवला तर खबरदार!”

“पुढचं पुढे बघूया आपण.”

पुढच्या वेळेस सिग्नलला गाडी उभी असतानाच अनिलने जोरजोरात हॉर्न वाजवायला सुरुवात केली. परत श्रीकांत खाली आला,

“तुम्ही मुद्दामहून हॉर्न वाजवत आहात बघा याचे परिणाम वाईट होतील.”

“अहो काका आता ते कुत्र्याचं पिल्लू गाडीच्या समोरच उभं राहिलं मग त्याने तिथून जावं म्हणून मी हॉर्न वाजवत होतो.”

“काय रे काका कोणाला म्हणतो! कोणत्या अँगलने मी तुला काका दिसतोय. फुकटच्या फाकट नाती जोडू नकोस. तुम्ही लोक आता जास्त शहाणपणा करायला लागलेत.” तो चिडल्यावर सर्वांना हसू आवरत नव्हतं.

“तुम्हाला काका नाही म्हणायचं मग नाव काय तुमचं. तुम्ही इथे पुण्याला नवीन आले का. पुण्याच्या रस्त्यावर आपलेच नियम चालतात बरं का.”

“ए तू जो कोण असशील तो. मी पुण्याला नवीन नाहीये इथेच माझा जन्म गेला फक्त दहा वर्षे परदेशात गेलो होतो.”

“हा तरीच. पुण्यात काय चालतं ते तुम्हाला माहिती नाही.” सगळे जोरजोरात हसायला लागले. सिग्नल सुरू होत होता म्हणून श्रीकांत जाऊन गाडीत बसला.

त्याने हा वात्रट मुलांचा ससेमीरा चुकवण्यासाठी लेन बदलली. लगेच अनिलने पण त्याच्या पाठोपाठ लेन बदलली. आता ही मुलं मुद्दाम मुद्दाम हॉर्न वाजवायला लागली. श्रीकांत आता खूपच चिडला. पुन्हा तो गाडीतून उतरला,

“तुम्ही माझा पाठलाग करता का. मी आता तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जाईन.”

“अहो भाऊ काय करणार तुम्ही जाताय तिथेच आम्हाला जायचं आहे. बरं भाऊ मला एक सांगा तुम्ही ती पाटी लावली आहे, तुम्ही रस्त्यात मुक्काम करत नाही म्हणजे ज्याने अशी पाटी लावली नाही ते रस्त्यात मुक्काम करतात की काय!”

“तुझ्यासारख्या सगळ्या वात्रट मुलांशी बोलण्यात काहीच अर्थ नाही.”

श्रीकांत जोरात पाय आपटत जाऊन गाडीत बसला. त्याने गाडी सुरू केली रे केली की ही मुलं हॉर्न वाजवायला सुरुवात करायची. श्रीकांत मनातल्या मनात चडफडत होता. ही पाटी लावली आहे तरी या लोकांना काय मॅनर्स नाहीत. या सारख्या हॉर्न वाजवण्याला कंटाळून त्याने गाडी साईडला घेतली. अनिलने पण त्याच्या मागे गाडी उभी केली. श्रीकांत परत त्यांच्या गाडीकडे आला.

“आता तर सिद्ध झालं तुम्ही मला मुद्दाम चिडवण्यासाठी माझ्या गाडीच्या पाठी येत आहात. आता मी गाडी थांबवल्यावर तुम्ही का गाडी थांबवली”

“अरे आमची मर्जी, आमची गाडी. आमची गाडी गरम झाली म्हणून आम्ही थांबवली.”

“ही पाटी लावायला मी खूप खर्च केलाय. तुम्हाला सर्वांना वाचता येतं ना.”

“चांगलंच वाचता येतं आणि म्हणूनच जोपर्यंत तुमच्या गाडीवर ही पाटी आहे तोपर्यंत आम्ही सारखे हॉर्न वाजवत राहणार. तुम्हाला आमच्या हॉर्नची कटकट नको असेल तर ही पाटी आताच्या आता झाकून टाका आणि नंतर ती कायमची काढून टाका कारण रोजच तुम्हाला आमच्यासारखे इरसाल नमुने भेटतील एवढे लक्षात ठेवा.”

श्रीकांतने विचार केला या वात्रट पोरांकडे वेळच वेळ असेल आपण यांच्याशी हुज्जत घालण्यात काही अर्थ नाही. त्याने गाडीतून कपडा काढून ती पाटी कपड्याने झाकून टाकली. अनिल आणि त्याच्या मित्रांना खूपच हसायला यायला लागलं. अनिलने गाडी सुरू केली चौघही एकदम जोरात हुर्यो करून ओरडले,

“अहो काका बाय बाय. पुण्यात आहात ना तोपर्यंत कायमची पाटी पुसून टाका. आजचा हा दिवस तुमच्या लक्षात राहील.”

असे हे पुणेरी पाट्या लावणारे आणि त्यांना भेटणारे इरसाल नमुने. पुणेरी पाट्या म्हणजे वाचताना हसून हसून पोटात दुखायला लागतं, नाही का!

©️®️सीमा गंगाधरे

error: Content is protected !!