#माझ्यातलीमी
#ब्लॉगलेखनटास्क (५/१/२५)
#लघुकथा
#जेहोतंतेचांगल्यासाठीचहोतं
वाक्य : काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही.
दीप्तीला बारावीला एका श्रीमंत वस्तीतील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता. तिथला झगमगाट तिला नेहमीच आकर्षित करायचा. फॅशनेबल कपडे घालून मुलं मुली ऐटीत कारमधून कॉलेजला यायचे. तिने ठरवल्याप्रमाणे ती आणि तिची मैत्रीण दिशा दोघीजणी त्या कॉलेजमध्ये फॉर्म भरायला गेल्या. त्या कॉलेजची अट होती की दहावी आणि अकरावी दोन्ही इयत्तांमध्ये प्रत्येकी किमान पन्नास टक्के गुण असायला हवेत. दीप्तीला दहावीत खूप छान गुण होते पण अकरावीत माध्यम बदलल्यामुळे अठ्ठेचाळीस टक्केच गुण होते. नाईलाजाने दोघींनी दुसऱ्याच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त होतं त्यामुळे सहाजिकच सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ हेही तितकंच महत्त्वाचं मानलं जात होतं.
दीप्तीला अभ्यासाबरोबर या सर्वांमध्ये पण खूपच रस होता आणि ते कौशल्य तिच्यामध्ये होतं. ती दरवर्षी कॉलेजच्या एकांकिका स्पर्धा, खो खो स्पर्धा मध्ये भाग घेऊ लागली. तिचा अभिनय सुंदर असायचा त्यामुळे दरवर्षी एक तरी पारितोषिक तिला मिळायचेच. खो खो मध्ये तिची राज्यस्तरावर निवड झाली. तिच्या नेत्रदीपक यशाच्या बातम्या वर्तमान पत्रात झळकू लागल्या. आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेमुळे तिच्या दिग्गज लोकांशी ओळखी झाल्या. तिच्या अभिनयाला दाद मिळू लागली. त्यानंतर ती व्यावसायिक नाटकांमध्ये, चित्रपटामध्ये दिसू लागली. एक गुणी अभिनेत्री म्हणून तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली. तिची स्वाक्षरी घेण्यासाठी लोक धडपडू लागले.
आपल्या जीवनात मागे वळून पाहताना तिच्या लक्षात आलं कदाचित त्या श्रीमंत कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला असता तर आपण बुजून गेलो असतो. आपल्यातल्या कौशल्याला वाव मिळाला नसता. एकंदरीत हेच खरं आहे की काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही. म्हणूनच म्हणतात की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं.
©️®️ सीमा गंगाधरे
शब्दसंख्या _ २२७
