माझ्यातलीमी.
लघकथालेखन
“चुकलेल्या वळणावरची शाळा”
अनिरुद्ध देशमुख – एक प्रतिष्ठित सेवानिवृत्त शिक्षक. तब्बल ४० वर्षं शाळेमध्ये मुलांना शिकवत त्यांनी आपलं आयुष्य chalk-duster मध्ये घालवलं होतं. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले. आजही गावात ते आदराने ‘सर’ म्हणून ओळखले जात.
शिस्त, ज्ञान आणि तत्वज्ञान यांचा आदर्श.
शाळेच्या फळ्यावर त्यांनी नेहमी लिहिलं:
“मुलांनो, अपयश हे शिकण्याचं पहिलं पाऊल असतं…”
“चुकणं म्हणजे संधी…”
“समोरच्याला माफ करा…”
हे त्यांचे नेहमीचे सुविचार.
गावात कुणी भांडण केलं, मतभेद झाले की, लोक सरांकडेच जात.
“सर समजावतील…”
त्यांच्या बोलण्यात गोडवा होता, आणि शब्दात वजन. पण एक गोष्ट मात्र सर्वांना ठाऊक होती – सरांचा स्वतःचा मुलगा ‘संकेत’ – गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याशी कट्टी करून होता.
कारण?
संकेतने इंजिनिअरिंग झाल्यावर नोकरी न करता स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यात तो अपयशी ठरला.
अनिरुद्ध सरांना वाटलं –
“ही चूक नाही, हठधर्मिता आहे!”
आणि त्यांनी त्याच्यावर ताशेरे ओढले –
“तुझं वागणं मूर्खपणाचं होतं. तू स्वतःहून बुडवलंस सगळं!”
मग काय, संकेत गेला… आणि संवाद बंद झाला.
सर मात्र आपल्या तत्वज्ञानात रमले.
“शिकवणं ही जबाबदारी आहे…” असं ते म्हणत.
एक दिवस गावातल्या शाळेने त्यांना आमंत्रित केलं – विशेष व्याख्यानासाठी. विषय होता – “चुका आणि माणूसपण”.
सरांनी व्यासपीठावर उभं राहून मोठ्या आत्मविश्वासाने बोलायला सुरुवात केली.
“मुलांनो, आयुष्यात चुका अपरिहार्य आहेत. पण त्या स्वीकारणं, आणि माफ करणं, हेच खरं माणूसपण आहे…”
“तुम्ही जेव्हा दुसऱ्याला माफ करता, तेव्हा खरं शिक्षण सुरू होतं.”
सर्वांनी टाळ्यांनी दाद दिली.
–
“सर, तुम्ही म्हणता चुकणं माफ करावं… पण तुमचं स्वतःचं कोणी चुकलं, तर तुम्ही माफ करता का?” उपस्थित एकाने प्रश्न विचारला.
ते गडबडले.
त्या रात्री त्यांनी जुना फोटोंचा अल्बम उघडला.
संकेतचा एक फोटो – कॉलेजच्या कार्यक्रमात मिळालेलं प्रमाणपत्र घेऊन तो हसतोय…
ते हसू आज त्यांना खोटं वाटलं. त्यातली चमक हरवली होती.
त्यांनी डोळे मिटले, आणि पहिल्यांदाच मनाशी कबुल केलं —
“मी चुकलो.”
ते थेट फोनजवळ गेले. खूप दिवसांनंतर ते नंबर डायल करत होते.
“संकेत…” – त्यांनी थरथरत बोलायला सुरुवात केली –
“बाळा, मी शिकवताना सगळ्यांना माफ करायला शिकवलं… पण मी स्वतः शिकणारच होतो. आज तू मला शिकवलंस… परत ये.”
फोनच्या दुसऱ्या टोकाला शांतता होती… आणि मग केवळ एक ओळ:
“बाबा, मी उद्या सकाळी निघतो. घराची वाट बघा.”
त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं. त्यांना उमगलं – तत्त्वज्ञान शिकवता येतं, पण माफ करणं शिकायला लागतं.
“शब्द शिकवतात, पण माफ करणं अनुभव शिकवतो…
तत्त्वज्ञान नुसतं उच्चारलं जातं, पण ते हृदयातून जगायला लागतं.”
३५० शब्द
तृप्ती देव

