दिलेल्या चित्रावरून कथा (२६/९/२५)
ऋतू हिरवा…..
कुमार पुण्यात मामाकडे दहा वर्षा नंतर गणपती बघायला आला होता. तेव्हा मामा रहात होता तो मोठ्ठा सान्यांचा वाडा होता. आता मोठी बिल्डिंग झाली होती. तेव्हा वाड्यात १५/२० भाडेकरू होते. बहुतेक सगळी एकत्र कुटुंब होती. त्यामुळे वाड्यात खूप माणसे असायची, त्यात येणारे पै पाहुणे पण असायचे. त्यामुळे वाडा सतत गजबजलेला असायचा. कुमारची आई व हि चार भावंडे मे महिन्यात व दिवाळी झाल्यावर सुट्टीत नेहमी यायचे. त्यामुळे वाड्यातल्या मुला मुलींची या भावंडांची चांगलीच गट्टी जमली होती. सुट्टीत वाड्यातल्या विहिरीत पोहणे, भाड्याच्या सायकली घेऊन हिंडणे, सिंहगडावर जाणे, पर्वतीवर जाणे, क्रिकेट, पत्ते, कॅरम खेळणे हे ठरलेले होते.
एके वर्षी कुमार एकटाच गणपतीत पुण्याला आला होता. पुण्याच्या गणपती बद्दल व मिरवणूकी बद्दल खूप ऐकले होते. ते त्याला प्रत्यक्ष बघायचे होते व अनुभवायचे होते. मामाकडे गणपती, गौरी होत्या. त्यातही तो मनापासून मदत करत होता. या वर्षी त्याच्या कल्पनेतून साकार झालेली सजावट मामाच्या घरच्या व वाड्यातल्या गणपतीसाठी केली होती. वाड्यात या वर्षी नवीन भाडेकरू, अनिल भावे आले होते. त्यांचा मुलगा पराग व मुलगी प्राची अतिशय उत्साही व आनंदी भावंडे. प्राची रोज हिरव्या रंगाचा ड्रेस घालायची. अगदी ड्रेस हिरवा नसेल तर ओढणी तरी हिरवीच असायची. वाड्यातल्या गणपती समोर रोज करमणुकीचे कार्यक्रम असायचे. प्राचीचा आवाज चांगला होता. तिने गाण्याच्या परीक्षा पण दिल्या होत्या. तिने ऋतू हिरवा हे गाणे खूप छान गायले. कुमार एकदा तिला गमतीने म्हणाला, तूला हिरवा रंग आवडणार आहे हे तूझ्या आईबाबांना आधीच माहीत असते तर त्यांनी तूझे नाव प्राचीच्या ऐवजी, पाचू ठेवले असते. हो ना…. ती लटक्या रागाने म्हणाली, चल… काही तरीच तुझं….
वाड्यातले कार्यक्रम झाल्यावर सर्व मुल मुली सार्वजनिक गणपती बघायला जायचे. यांच्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले होते. दोघेही कोणाचे लक्ष नाही असे बघून हळूच सटकायचे. त्यांचे भेटायचे ठिकाण म्हणजे सारसबाग. तिथला हिरवळीवर एका बाजूला असलेला बाक ठरलेला होता. तिथे आजूबाजूला भरपूर हिरवळ व झाडे असायची. तिच्यामुळे यालाही हिरवा रंग आवडायला लागला होता. गणपती गेल्यावर हा पण घरी परत गेला. दोघे फोनवर बोलायचे. सुट्टीत भेटायचे.
कुमारला पुण्यात येऊन दोन दिवस झाले होते. त्याला सासरबागेत जायचेही होते आणि नाही ही. शेवटी तो सारसबागेत आलाच. गणपतीचे दर्शन घेऊन नेहमीच्या ठिकाणी आला. त्या रिकाम्या बाकाकडे बघून डोळ्यात पाणी आले. तिची शेवटची भेट आठवली. दहा वर्षापूर्वी मे महिन्यात तो एकटाच आला होता. शिक्षण पूर्ण झाले होते. बंगलोरला मोठ्या कंपनीत नोकरी लागली होती. घरातले त्याला लग्न कर म्हणून मागे लागले होते. या विषयावर प्राचीशी एकदा बोलून मगच घरात विषय काढावा म्हणून तो आला होता. तिचेही शिक्षण पूर्ण झाले होते. तिलाही नोकरी लागली होती. दोघेही गणपतीचे दर्शन घेऊन या बाकावर बसले. कुमारने बोलायला सुरुवात केली, प्राचू, आपण लग्न कधी करुया. आता आपण दोघेही सेटल आहोत. घरून लग्न कर म्हणून मागे लागले आहेत. ती रडत रडत सांगू लागली, साॅरी. मी तूझ्याशी लग्न नाही करु शकत. कुमार म्हणाला, का पण? अरे, मागच्या महिन्यात माझी आत्या कॅन्सरने गेली. तिने जायच्या आधी, मी तिच्या मुलाशी, अभयशी लग्न करावे म्हणून शेवटची इच्छा बोलून दाखवली. व तिने माझ्या कडून तसे वचन घेतले. तिची अवस्था बघून व आई बाबांच्या आग्रहाखातर मला तिला वचन द्यावे लागले. व ती असतानाच आमचा साखरपुडा झाला व डिसेंबर मध्ये लग्न आहे. मला खरंतर हे तूला आधीच सांगायचे होते, पण फोनवर कसे सांगणार? मी तू येण्याची वाटच पहात होते. मनावर खुप दडपण होते की, हे ऐकल्यावर तूला किती वाईट वाटेल. तू कसा रियाक्ट होशील. हे सर्व ऐकून कुमारला काय बोलावे कळे ना. तो एवढेच म्हणाला, मी तूझी मनस्थिती समजू शकतो. माझ्या मनात तूझ्या बद्दल राग किंवा नाराजी नाही. तू सुखात रहा. एवढीच माझी इच्छा आहे. काळजी घे. तिला शेकहॅड करून ऑल दि बेस्ट म्हणून डोळ्यातील अश्रू लपवत हसून तिचा निरोप घेतला.
त्यानंतर तो आता दहा वर्षाने आला होता. तो रिकामा बाक जणूकाही त्याला, म्हणात होता की, आता तूझा ऋतू हिरवा संपला.

खुप छान
मस्तच 👌🏻📖✍🏻 कथा
Thanks🙏
सुरेख कथानक
खूप सुंदर कथा
छान