# विकेंड टास्क
# महिला दिन विशेष (६/३/२०२६)
३) मी जेव्हा स्वतःसाठी उभी राहिले.
हक्काच्या घरा साठी…..
आज मिलिंद व विभाच्या घराची वास्तू शांत व सत्यनारायणाची पूजा होती. नवीन फर्निचर, पडदे, कपाटं, डायनिंग टेबल असे विभाने हौसेने घर छान सजवले होते..विभाचे आईबाबा, दादा वहिनी व त्यांची दोन छोटी जुळी मुले आली होती. सीमा व स्वातीच्या माहेरचे ही आले होते. शिवाय मित्र मैत्रीणी, वाड्यातील सर्वांना त्यांनी आग्रहाने बोलावले होते. रामभाऊ व सीता मावशींना मेहुण म्हणून जेवायला बोलावले होते. घरातील विभाची लगबग बघून सुधाताई सुखावल्या होत्या. तिने घेतलेली त्यांच्या आवडीची साडी त्या नेसल्या होत्या. छोटी स्वरा नवीन फ्राॅक घालून पायातले पैंजण वाजवत घरभर फिरत होती. नवीन घराचा आनंद मिलींदच्या चेहर्यावर दिसत होता. मात्र दोघे दिर व जावा वर वर आनंदी असल्या सारखे दाखवत असले तरी मनातून नाराज होते. विभाला हे माहीत होते पण तीही हसून कळून न कळल्या सारखी दाखवत होती.
तीने दोन्ही जावांना त्यांच्या आवडीच्या भारी साड्या घेतल्या होत्या. व दिरांना ड्रेस, जय व यशला त्यांच्या आवडीचे कपडे व सोनमला तिच्या आवडीचा गुलाबी शरारा घेतला. त्यामुळे त्यांची नाराजी थोडी कमी झाली होती.
सुधाताईंना दोन तीन वर्षा पूर्वीचा प्रसंग आठवला. महेश, मंगेश व मिलींद तिन्ही मुलं व त्यांच्या बायका व सुधाताई, असे देशपांडे कुटुंब अनेक वर्षे सान्यांच्या वाड्यात भाडेकरू म्हणून रहात होते.
वाड्याच्या मालकांनी रामभाऊ साने यांनी वाडा पाडून तिथे पाच मजली इमारत बांधायचे ठरविले. वाड्यात एकूण विस भाडेकरू व स्वतः रामभाऊचे कुटुंब व त्यांच्या दोन मुलांची कुटुंब रहात होते.
रामभाऊंनी पहिले दोन मजले स्वतः साठी व त्यांच्या मुलांसाठी ठेवले. बाकी तीन मजल्यावर एकूण अठरा फ्लॅट्स होते. त्यातील काही भाडेकरू आधीच दुसरीकडे रहायला गेले होते. प्रत्येक घरात किमान दोन तीन कमवणारी मुले होती व प्रत्येकाला स्वतंत्र फ्लॅट हवा होता पण रामभाऊंनी आधीच मिटिंग मध्ये सांगितले की एक तर एक मोठा फ्लॅट मिळेल म्हणजे तुम्हाला एकत्र राहता येईल किंवा दोन लहान फ्लॅट मिळतील. कोणाला कसे हवे ते तुम्ही कुटुंबांतील लोकांनी ठरवा व पंधरा दिवसांत सांगा, म्हणजे त्याप्रमाणे मला प्लॅन तयार करायला सोईचे होईल.
महेश एका बॅंकेत होता त्याचा मुलगा जय या वर्षी बारावीत व मुलगी सोनम दहावीला होती त्यामुळे त्यांना स्वतंत्र फ्लॅट हवा होता. बॅंकेतून त्याला लोन सहज मिळणार होते. त्याची बायको सीमा एका शाळेत शिक्षिका होती. मंगेश एका मोठ्या खाजगी कंपनीत वरच्या पोस्टवर होता. त्याची बायको स्वाती ब्युटिपार्लर चालवत होती. त्यालाही स्वतंत्र फ्लॅट हवा होता. त्यालाही सहज लोन मिळणार होते. त्याचा मुलगा यश पाचवीत होता.
धाकटा मिलिंद सरकारी नोकरीत होता त्याची दर तीन वर्षांनी बदली व्हायची. या दोघांच्या मानाने त्याला पगार कमी होता. त्याची बायको विभा घरी शिकवण्या घेत होती. त्यांना दोन वर्षाची गोड मुलगी स्वरा होती.
आता प्रश्न होता की दोन फ्लॅट घ्यायचे की एकच मोठा फ्लॅट घ्यायचा? महेश व मंगेशनी संगनमताने आधीच ते दोन फ्लॅट आपण दोघांनी घ्यायचे हे ठरवूनच टाकले व मिलींदला गोड बोलून सांगितले की, आम्ही तुला एक प्रपोजल देतो बघ तुला मान्य आहे का? तुझी नाही तरी बदली होत असते तू विभाला व स्वराला जिथे जाशील तिथे घेऊन जा. स्वरा ही अजून लहान आहे तेव्हा तिच्या शाळेचा प्रश्न नाही. हे दोन फ्लॅट आम्ही दोघे घेतो. तुला आम्ही दोघे यावरचा हक्क सोडण्या साठी काही रक्कम देतो. तू हक्क सोडून दे. म्हणजे आम्हाला हे फ्लॅट घ्यायला सोईचे होईल. या दोन भावांचा डाव मिलिंदच्या लक्षात आला नाही पण विभाच्या लक्षात आला. आपला नवरा भोळा व साधा आहे मोठ्या भावांच्या शब्दा बाहेर जाणार नाही. हे लक्षात येताच विभा म्हणाली, महेशदादा व मंगेशदादा मी जरा बोलू का? कारण हे काही बोलणार नाहीत. तुमची मतं पटली नाही तरी ते तुम्ही सांगाल ते मान्य करतील, हे तुम्हांला पण माहीत आहे.
पण तुमचे हे प्रपोजल मला मान्य नाही. इथे आपण बरीच वर्षे रहात असल्याने कमी किंमतीत इथे फ्लॅट मिळेल. बाहेर घेतले तर याच फ्लॅट ची किंमत जास्त असेल. यांची बदली इथे पुण्यात झाल्यावर आम्ही कुठे रहायचे? आम्हाला पण पुण्यात हक्काचे घर हवे. आम्ही पुण्यात येऊ तेव्हा जास्त किंमत देऊन फ्लॅट घ्यावा लागेल. तुम्हा दोघांना जास्त लोन पण मिळेल. पण यांना जास्त लोन नाही मिळणार व लोनचे हप्ते जाऊन हातात फार काही राहणार नाही.
त्यापेक्षा एक मोठा फ्लॅट घेऊन आपण एकत्र राहू. महेश म्हणाला, जय व सोनम आता मोठी आहेत त्यांना अभ्यासासाठी स्वतंत्र खोली हवी. एकत्र राहिलो तर त्यांचा अभ्यास नीट होणार नाही त्यामुळे आम्हाला स्वतंत्र फ्लॅट हवा. मंगेश म्हणाला,यश पण मोठा होतोय. स्वाती म्हणाली, मी माझे ब्युटी पार्लर घरीच सुरू करीन म्हणजे मला घराकडे ही लक्ष देता येईल. विभा म्हणाली, असे असेल तर मी तुम्हांला विनंती करते की, तुमच्या दोघांन पैकी एकाने दुसरीकडे फ्लॅट घ्या. जो जाईल त्याला दोन्ही भाऊ मिळून जास्तीची रक्कम देवू. सुधाताई सर्व ऐकत होत्या. त्या म्हणाल्या की, विभा म्हणते ते मला योग्य वाटते. मिलींदची जरी बदली होत असली तरी, पुण्यात त्यांना पण हक्काचे घर हवे. तुमच्या पेक्षा त्याला पगार पण कमी आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी नीट विचार करून निर्णय घ्या व जो निर्णय घ्याल तो सर्वांना न्याय देणारा हवा.
मिलींद विभाला म्हणाला की, तू कशाला आपल्याला इथे फ्लॅट हवा म्हणून सांगितले. मी माझ्या भावांच्या विरोधात जाणार नाही. तुला इथे फ्लॅट हवा असेल तर सर्व जवाबदारी तुला घ्यावी लागेल. मला आमच्या भावात वितुष्ट नको आहे. विभा म्हणाली, मी दोन्ही दादांना न दुखावता माझे म्हणणे पटवून दिले आहे. आईंना पण माझे मत पटले आहे. आपणही जे बाहेर जातील त्यांना ठरल्याप्रमाणे रक्कम देऊ. कोणाचाही अपमान होणार नाही व कोणावरही अन्याय होणार नाही याची आपण काळजी घेऊ. पण इथल्या जागेत आपलाही हक्क आहे. त्यांनी आपल्याला न विचारता गृहीत धरले की, आपण इथला हक्क काही रक्कम घेऊन सहज सोडून देऊ. ते मला पटले नाही. आपल्याला ही या वास्तूत स्वतःचे हक्काचे घर हवे आहे. आपण पुण्यात आल्यावर कोणाकडे पाहूण्यांसारखे किती दिवस व का रहायचे? त्यासाठी हक्काचे घर हवेच. त्यासाठी मी खंबीरपणे उभी राहिन कारण, मला माहीत आहे याबाबतीत तुम्ही पुढाकार घेणार नाही.
विभाच्या निर्णयाने दोघे भाऊ व त्यांच्या बायका जरा नाराज झाल्या. काही दिवस घरात वादळापूर्वीची शांतता होती. विभाशी कारणा शिवाय चौघेही बोलत नव्हते. दोघी जावा सासूबाई जवळपास नाहीत हे बघून टोमणे मारायच्या पण विभा दुर्लक्ष करायची. हे असे होणार याची तिला कल्पना होतीच. मिलिंदशी मात्र सगळे गोड बोलायचे, त्याचे सारखे ( खोटे) कौतुक करायचे कारण तो साधा भोळा आहे तो आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवेल व आपण जे सांगू ते तो लगेच मान्य करेल. थोडी रक्कम दिली की तो सहज हक्क सोडून देईल व आपल्याला इथे स्वस्तात फ्लॅट मिळतील. पण विभा हुशार होती. ती पण या चौघांशी गोड बोलायची व त्यांना म्हणायची, तुमचे आमच्या सारखे नाही. तुम्ही श्रीमंत आहात मनात आणले तर दोघेही दुसरीकडे यापेक्षा चांगला मोठा फ्लॅट घेऊ शकता. विभाच्या अशा वागण्याने त्यांचा प्लॅन फसला. सुधाताई मात्र पूर्णपणे विभाच्या बाजूने होत्या. त्यामुळे शेवटी महेशने दुसरीकडे फ्लॅट घेतला व विभाला हक्काचे घर मिळाले. पण त्यासाठी तिला स्वतःच्या हक्कांसाठी ठामपणे उभे रहावे लागले.
शब्द संख्या : १०५०
