गाण्याचे रसग्रहण

# माझ्यातली मी
# विकेंड टास्क
#गाण्याचे रसग्रहण

‘ बाबुल की दुआऐं लेती जा ‘

बाबुल की दुआऐं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले.मैके की कभी ना याद आये ससुराल में इतना प्यार मिले.
हे माझ्या आवडीचं गाणं.
हे गाणं ऐकलं आणि रडलं नाही असा व्यक्ती सापडणं कठीण. हे गाणं नीलकमल (१९६८) या चित्रपटासाठी साहिर लुधियानवीने लिहिलंय आणि संगीत दिलंय संगीतकार रवी यांनी. ह्या चित्रपटात राजकुमार, मनोजकुमार आणि वहिदा रहमान हे कलाकार होते. हे गाणं गात असताना म्हणे रफी साहेब खूप भावूक झाले आणि गाण्याच्या रेकॉर्डिग मधे त्यांचे हुंदके ऐकू येत होते. तेव्हा रफी म्हणाले की पुन्हा रेकॉर्डिंग करूया, तर संगीतकार म्हणाले की हेच भावूक गाणं झालंय आणि ते असंच हवं होतं.

असं म्हणतात संगीत हे हृदयस्थ ईश्वराला जागवणारे माध्यम आहे. आर्त आळवणीतून सुद्धा इतरांच्या हृदयास छेदता येतं आणि हो, शब्द देखील तेवढेच प्रभावी असायला हवेत.
हे गीत ज्या साहिर लुधियानवी यांनी लिहीलंय त्यांचं लग्न पण झालेलं नव्हतं. मोहम्मद रफी यांनी गायलं तेव्हा त्यांना खरंच रडू कोसळलं होतं, कारण त्यावेळी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलीचं लग्न झालेलं होतं. येथेच ह्या गीतातील भाव सौंदर्याकडे लक्ष वेधल्या जातंय.
एका कार्यालयातील नवरीची सासरी पाठवणी होत होती. बँडवर हे गाणं लागलं होतं, तेथेच कार्यालय झाडणारी एक बाई डोळे पुसत होती. मी विचारले आजी तुम्ही का रडताय, तर ती म्हणाली मी रोजच नवरीची बिदागी पाहते पण हे गाणं लागलं का आपोआप डोळे भरून येतात. बघा एवढा प्रभाव असतो संगीताचा. कुणाच्याही हृदयाला भिडणारा असाच आशय या गीतात जाणवतो.

आई नसलेल्या मुलीला जेव्हा बाबा वाढवतो ना, तेव्हा तो तिची आई आणि बाबा दोघांचंही प्रेम तिला देतो, म्हणूनच तिला रिती रिवाजानुसार सासरी पाठवताना बापाचं काळीज हेलावतं. हीच मध्यवर्ती कल्पना आहे ह्या गीताची आणि हेच अचूक हेरलंय साहिर च्या लेखणीने.

नाजो से तुझे पाला मैने, कलियों की तरह फूलों की तरह
बचपन में झुलाया है तुझको, बाहो ने मेरी झुलो की तरह ,
मेरे बाग की ए, नाजूक डाली
तुझे हर पल नयी बहार मिले
मैके की कभी ना याद आये ससुराल में इतना प्यार मिले।

मुलीच्या निरामय सुखाची कामना करताना, तिचं ज्या घराशी नातं जुळतंय त्या घरातही सतत ख़ुशी नांदत राहो। म्हणजे आपल्या मुलीच्या सुखासाठी तिचे नातेवाईक देखील सुखी राहोत हीच कामना…. सुंदर सुपर….
तू नेहमी हसती खेळती राहो आणि आनंदाचा संसारी मुकुट सदैव तुझ्या भाळी असू दे. किती प्रेमळ संदेश या गाण्यातून दिला जातोय ना.

जिस घर से बंधे है भाग तेरे, उस घर में सदा तेरा राज रहे
होटो पे हँसी की धूप खिले
माथे पे ख़ुशी का ताज रहे
कभी जिसकी ज्योत ना हो फिकी
तुझे ऐसा रूप सिंगार मिले
मैके की……

तुझं संसारी जीवन इतकं आनंदात असू दे की, किंचित दु:ख देणारी काटेरी अस्वस्थता देखील तुझ्या वाट्याला येऊ नये.
तेथे सुखाची थंड लहर असावी आणि त्यामुळे, तुझ्या सभोवतालची द्वारे देखील सुखी असावीत. त्यांनाही सुखाची शीतलता मिळावी, म्हणजे आपल्या मुलीच्या सुखनैव जीवनासाठी, तिच्या आजूबाजूला सुद्धा दुःखाने वास करू नये. व्वाव किती सुखद, सुंदर कल्पकता आहे मुलीच्या सुखाची.

बीते तेरे जीवन की घड़ियाँ, आराम की ठंडी छाव मे
काटा भी न चुभने पाये कभी, मेरी लाडली तेरे पाँव में
उस द्वार से भी दुःख दूर रहे
जिस द्वार से तेरा द्वार मिले

मंडळी ,शब्द आणि अर्थ मिळून लेखनाचा आत्मा बनतो.असे लेखन जेव्हा आत्म्याला भिडतं तेथेच संगीतातले संजीवन तत्व निर्माण होतं.असं लेखन अनंत पिढ्यांना प्रेरणा देतं.अतिशय साधी पण आशयघन, उत्कट अशी लेखनशैली विकसित केली आहे साहिरजींनी.
लेखन आणि संगीत हे असे साहित्य प्रांत आहेत की जे माणसाला, अनेकदा विवंचनेपासून दूर नेतात.
संगीत ही आजारांना बरी करणारी एक थेरेपी पण आहे.
सुंदर आशयघन संगीत ऐकत रहा.

©®स्वाती संजय देशपांडे

One comment

  1. धन्यवाद संगीता 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!