गाण्याचे रसग्रहण – मन उधाण वाऱ्याचे

inbound1598272371787218572.jpg

#माझ्यातलीमी
#वीकेंडटास्क (४/१०/२५)
#रसग्रहण_गाण्याचे
#गाणे_मनउधाणवाऱ्याचे

चित्रपट : अगं बाई अरेच्चा
गायक : शंकर महादेवन
गीतकार : गुरु ठाकूर
संगीतकार : अजय – अतुल

गाणे :

“मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे
का होते बेभान, कसे गहिवरते..”

किती सुंदर गाणे आहे हे..! ऐकताना वाटतं की आपण उडतोय आकाशात, अगदी स्वच्छंदपणे, पाखराप्रमाणे, सगळीकडे आनंदी आनंद पसरलाय.. कसली फिकीर, चिंता नाही.. कितीही टेन्शन मधे असलं आणि हे गाणं कानावर पडलं की आपण आपोआपच आनंदित होतो, नाही का ..?

पहिल्याच कडव्यात गीतकार गुरु ठाकूर यांनी किती छान लिहिलं आहे ..

“मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते,
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते..”

मायेच्या स्पर्शाने मन खुलत जाते, मायेचा स्पर्श तो आई – वडिलांचा, मोठ्यांच्या आशीर्वादाचा, पती – पत्नीच्या प्रेमाचा, मुलांच्या नाजूक हातांचा .. स्पर्श बरंच काही सांगून जातो, नात्यांचे बंध दृढ करतो, आणि मन विहरत राहते, त्या स्पर्शात, जाणिवेत, आनंदात पण कधी दुःखातही .. पण इथे कवी फक्त सुखाची आणि आनंदाची जाणीव करून देतो.

पुढे किती छान लिहिलंय ..

“आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते
सावरते, बावरते, घडते, अडखळते का पडते
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन् क्षणात फिरुनी आभाळाला भिडते”

आपले मन कसे असते तर कधी ते स्वप्नात हरवते, आकाशात विहार करते, भान हरपून जाते, तर कधी बावरते, अडखळते, कधी उमेद संपते पण ते सावरते, स्वतःला सावरून पुढे जाते, नव्या उमेदीने वाटचाल करते. मनात आशा निर्माण होते आणि ते या आशेच्या हिंदोळ्यावर वेडे होऊन म्हणजेच धुंद होऊन झुलत राहते. मनाच्या किती छान अवस्था आहेत, आशा, उत्साह निर्माण करणाऱ्या.. या ओळी ऐकताना बहिणाबाईंच्या ओळी देखील आठवून जातात ..

बहिणाबाई म्हणतात –
मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात ..

क्षणार्धात जमिनीवर असलेलं मन आकाशात विहार करते, अर्थात सुन्न, उदास झालेलं मन क्षणार्धात उंच भरारी मारू लागते, नवनव्या कल्पना करू लागते. हेच गुरू ठाकूर यांनीही किती सुंदर शब्दात मांडलंय..! हेच मन कधी पाण्यावर तरंगते तर कधी ढगांमध्ये विहार करते. या ओळी ऐकताना आपलं मनही असाच स्वच्छंदीपणे विहार करायला लागते. आपण आनंदून जातो.

तिसऱ्या कडव्यात गुरू ठाकूर लिहितात ..

रुणझुणते, गुणगुणते, कधी गुंतते, हरवते
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते
कधी मोहाचे चार क्षणांना मन वेडे भुलते
जाणते जरी हे पुन्हा का चुकते
भाबडे तरी भासाच्या मागून पळते .

या ओळींतून मानवी मनाची चंचलता, चपळता “रुणझुणते, गुणगुणते” या शब्दांतून दिसून येते. मनाच्या विविध वृत्ती प्रेम, मोह, आकर्षण गहिऱ्या डोळ्यात दिसून येतात. त्याच प्रमाणे मानव अगतिकता, असहायता सुद्धा इथे चित्रित केली आहे. अशा वेळी ते तळमळत राहते, भरकटत राहते, संधी दिसून आली की त्या मोहाच्या क्षणांना बळी देखील पडते, पण लगेच परत उठते, सावरते, पुढे जाते.. पुन्हा कधी भावनिक होऊन आभासी जगात विहरते, सारे जाणून असेल तरीही भासांमागे धावते, कारण ते भाबडे असते, अवखळ आणि चंचल असते. किती खरे आहे ना. आपण पदोपदी याचा अनुभव घेतोच. पण हे गाणं ऐकतांना आपण मंत्रमुग्ध होऊन जातो. आपल्या जवळचे, आपल्या मनातले गाणे वाटते हे ..!!

प्रत्येक कडव्यानंतर ध्रुवपद एक ऊर्जा निर्माण करते .. किती छान लिहिलंय .. “मन उधाण वाऱ्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान, कसे गहिवरते ..!!”

गुरू ठाकूर यांचे लयबद्ध शब्द, पाऊस, वारा, आभाळ, पाणी स्वप्न, मनाची चंचलता, कोमलता, असहायपणा, खंबीरपणा अशा विविध प्रतिमांचा वापर, मनाचे आणि निसर्गाचे अतिशय खोल असे नाते यामुळे हे गाणं कविमानाच्या कल्पकतेच्या उंचीवर पोहचतं. या गाण्यात प्रेम, ओढ, माया, नात्यांचा गोडवा यातून श्रृंगार रस दिसून येतो. मनाचा आत्मभाव आणि अंतर्मुखता यातून शांत रसाची प्रचिती येते, तर मायेच्या नात्यांमधून वात्सल्य आणि भावूकता दिसून येते.

भावस्पर्शी, मधुर अशी गीतात्मक लय, साधी परंतु अत्यंत भावपूर्ण भाषा, अनुप्रास – रूपक अलंकारांचा वापर यामुळे कविता अधिक लयबध्द आणि भावनिक वाटते. मनाच्या नाजूक भावविश्वाचा प्रवास या गाण्यातून अनुभवताना आपण एका वेगळ्याच जगात आहोत असे वाटून जाते.

इतक्या सुंदर लेखणीला अजय – अतुल सारख्या नामवंत आणि आघाडीच्या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केल्याने त्याची गाण्याची मधुरता आणखीनच वाढते. शंकर महादेवन सारख्या जादुई गळ्याच्या आवाजाने हे गाणं थेट मनाला भिडतं.

गीतकार, संगीतकार, गायक ही तिघांची टीम या गाण्याला अर्थपूर्णता देऊन आपल्याला मंत्रमुग्ध करतात. थकलेल्या, उदास, असहाय मनाला उभारी देतात, आणि पुढे जाण्याची स्फूर्तीही देतात. म्हणूनच हे गाणे कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही. आपल्या डोक्यात, मनात ते घर करून राहतं

©️®️ मनिषा चंद्रिकापुरे

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!